
मुंबई: जगाला चार दशकांहून अधिक काळ संगीत ऐकवणारी 'एमटीव्ही' टीव्ही वाहिनी लवकरच बंद होणार आहे. या बाबत पॅरामाउंट ग्लोबलने अधिकृत घोषणा केली आहे. पॅरामाउंट ग्लोबलने केलेल्या घोषणेमध्ये सांगण्यात आले की, ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत जागतिक स्तरावर एमटीव्हीच्या पाच वाहिन्या बंद करण्यात येतील. यामध्ये एमटीव्ही हिट्स, एमटीव्ही 80s आणि एमटीव्ही 90s, क्लब एमटीव्ही आणि एमटीव्ही लाईव्हचा समावेश आहे.
ज्याकाळात मोबाईलवर म्युझिक व्हिडीओ पाहणे अशक्य होते, तेव्हा एमटीव्हीवर प्रेक्षक तासांनतास गाणी ऐकत आणि त्यांचे व्हिडीओ पाहत. मात्र मागील अनेक वर्षांत मनोरंजन क्षेत्रात मोठा बदल झाला आहे. युट्यूब, स्पॉटिफाय आणि अॅपल म्युझिकसारख्या माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने टीव्हीच्या प्रेक्षकांमध्ये घट झाली आहे. एमटीव्हीबाबतचा हा निर्णय भारतामध्ये लागू होणार का याबाबत कोणतीच अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.
भारतामध्ये एमटीव्हीची सुरुवात १९९६ साली झाली. यावेळी एमटीव्हीवर केवळ संगीत आणि त्याच्याशी संबंधित कार्यक्रम प्रसारीत व्हायचे. मात्र प्रेक्षकांच्या आवडींचा विचार करुन रिअॅलिटी शो आणि पॉप कल्चर आधारीत कंटेट प्रसारीत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता प्रेक्षक टीव्हीपेक्षा मोबाईलचा वापर अधिक करत असल्यामुळे टीव्हीवरील वाहिनी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे पूर्वी एमटीव्हीवर गाणी ऐकणारा आताचा नेटकरी वर्ग भावूक झाला आहे.