Wednesday, October 15, 2025

विराट कोहली आणि रोहित शर्मा वनडेतून निवृत्ती घेणार? बीसीसीआयने सांगितले सत्य...

विराट कोहली आणि रोहित शर्मा वनडेतून निवृत्ती घेणार? बीसीसीआयने सांगितले सत्य...

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी, वरिष्ठ फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होतील, या अफवा फेटाळून लावल्या आहेत.

भारत १९ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय आणि पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेपूर्वी, रोहित आणि विराट यांच्या एकदिवसीय क्रिकेटमधील निवृत्तीबद्दल जोरदार चर्चा सुरू होती. या दोन्ही खेळाडूंनी यापूर्वीच टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे आणि आता ते केवळ ५० षटकांच्या फॉर्मेटमध्ये खेळत आहेत.

मात्र, राजीव शुक्ला यांनी निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना शुक्ला म्हणाले की, "रोहित आणि विराटचा एकदिवसीय संघात असणे आमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण ते दोघेही महान फलंदाज आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत मला वाटते की आम्ही ऑस्ट्रेलियाला हरवण्यात यशस्वी होऊ."

ते पुढे म्हणाले, "आणि ही त्यांची शेवटची मालिका असेल, असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. आम्ही या गोष्टींमध्ये पडू नये. खेळाडूंनी कधी निवृत्त व्हायचे हे त्यांच्यावर अवलंबून आहे. ही त्यांची शेवटची मालिका असेल, असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे."

रोहित आणि विराट हे दोघेही ऑस्ट्रेलिया दौऱ्याद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहेत, त्यांनी यापूर्वी मे महिन्यात कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

या मालिकेपूर्वी निवड समितीने एकदिवसीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडून युवा शुभमन गिलकडे सोपवले आहे. पुढील एकदिवसीय विश्वचषक दोन वर्षांनी होणार असल्याने, गिलला मोठ्या स्पर्धेसाठी तयार करण्यासाठी नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

दरम्यान, मालिकेसाठी रोहित आणि कोहली दोघेही दिल्लीत दाखल झाले असून, १५ ऑक्टोबरच्या पहाटे ते संघासोबत ऑस्ट्रेलियासाठी रवाना होतील. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना १९ ऑक्टोबर रोजी पर्थ येथे होणार आहे.

Comments
Add Comment