Wednesday, October 15, 2025

महाराष्ट्रात मतदार याद्या अपडेट करण्यासाठी SIR होणार ?

महाराष्ट्रात मतदार याद्या अपडेट करण्यासाठी SIR होणार ?

मुंबई : बिहारमध्ये मतदार यादी सुधारण्यासाठी निवडणूक आयोगाने सखोल मतदार यादी तपासणी प्रक्रिया अर्थात Special Intensive Revision (SIR) राबवली. काँग्रेससह अनेक विरोधक सुरवातीला या एसआयआरला विरोध करत होते. पण नंतर त्यांचा विरोध मावळला. महाराष्ट्रात थोडं वेगळं चित्र आहे. महाराष्ट्रात अद्याप एसआयआर झालेले नाही. पण मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षांच्या प्रतिनिधींनी राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम आणि राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेतली. या प्रसंगी आधी मतदार यादी सुधारा आणि त्यानंतर निवडणुका घ्या, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे म्हणाले. सर्व विरोधी पक्षांच्या प्रतिनिधींनी राज ठाकरेंच्या सूरात सूर मिसळले. यामुळे राज्यात मतदार यादी सुधारण्यासाठी निवडणूक आयोग लवकरच एसआयआर करण्याची शक्यता आहे.

निवडणूक आयोगाने त्यांच्या अधिकारांचा वापर करुन तयारी पूर्ण करावी यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावा. आम्ही राजकीय पक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जाऊ, अशी स्पष्ट भूमिका राज्यातील सत्ताधारी महायुतीने घेतली आहे. आता महायुती आणि विरोधक दोघांचे एकमत असल्यामुळे निवडणूक आयोग लवकरच महाराष्ट्रात एसआयआर करण्याची शक्यता आहे.

याआधी मंगळवारी राज ठाकरे यांनी मतदार यादीत काही ठिकाणी नोंदी करताना चुका झाल्याचे सांगितले आणि उदाहरण पण दिले. एके ठिकाणी मतदार यादीमध्ये वडिलांपेक्षा मुलाचे वय जास्त दाखवण्यात आले आहे. हा मतदार यादीतील घोळ दुरुस्त करणे आवश्यक आहे. यामुळे आधी मतदार यादी सुधारा आणि त्यानंतर निवडणुका घ्या, अशी मागणी राज ठाकरेंसह सर्व विरोधकांनी घेतली. सोमवारी विरोधकांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींची भेट घेतली तर मंगळवारी केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगाच्या दोन्ही प्रतिनिधींची भेट घेतली. यावेळी त्यांनी मतदार यादीच्या सुधारणेसाठी आग्रह धरला. यामुळेच राज्यात एसआयआर लवकरच राबवले जाण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >