Wednesday, October 15, 2025

जिल्हा परिषदेत ५, तर पंचायत समितीत २ स्वीकृत सदस्य घेणार?

जिल्हा परिषदेत ५, तर पंचायत समितीत २ स्वीकृत सदस्य घेणार?

महसूलमंत्री बावनकुळे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिल्याची माहिती

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांतर्गत जिल्हा परिषदेत ५ आणि पंचायत समितीमध्ये २ सदस्यांची स्वीकृत सदस्य म्हणून नेमणूक करण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमात सुधारणा करण्यात यावी, अशी विनंती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी या विषयावर सकारात्मक प्रतिसाद देत ग्रामविकास विभागाला कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे, या सुधारणेनंतर ग्रामविकासात्मक प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी समाजाभिमुख कार्यकर्त्याला मिळेल, असा विश्वास देखील बावनकुळे यांनी व्यक्त केला. दरम्यान, सरकारने हा निर्णय लागू केल्यास नगरपालिका, महापालिकां प्रमाणे झेडपी अन् पंचायत समितीमध्येही स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा होणार आहे.

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांतर्गत जिल्हा परिषदेतील ५ आणि पंचायत समितीमधील २ सदस्यांची स्वीकृत सदस्य म्हणून नेमणूक करण्यासाठी अधिनियमात सुधारणा करण्याबाबत निर्णय घेण्याची मागणी बावनकुळे यांनी पत्राद्वारे केली आहे.

ग्रामीण स्तरावर सक्रिय कार्य करणाऱ्या कार्यकत्यांना योग्य प्रतिनिधित्व आणि संधी मिळावी या दृष्टिकोनातून, विद्यमान महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियमामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे.सदर अधिनियमातील तरतुदीनुसार स्वीकृत सदस्यांची नियुक्ती करता येते; परंतु सध्याच्या धोरणानुसार ह्या संधी मर्यादित स्वरूपात उपलब्ध आहेत. त्यामुळे, राज्य शासनाने सदर अधिनियमानुसार सुधारणा करून जिल्हा परिषदेसाठी पाच आणि पंचायत समितीसाठी दोन स्वीकृत सदस्य नेमण्याची तरतूद करावी, असे बावनकुळे यांनी पत्रात म्हटले आहे. त्यामुळे समाजाभिमुख कार्य करणाऱ्या; परंतु निवडणूक लढविण्याची क्षमता नसलेल्या पात्र कार्यकर्त्यांना विकास प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध होईल, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार अधिक प्रभावी होईल. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेऊन कार्यकर्त्यांना योग्य प्रतिनिधित्वाची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी बावनकुळेंनी पत्राद्वारे केली आहे.

Comments
Add Comment