
नवी दिल्ली: देशभरात अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ होत असून, विशेषतः महिलांच्या अपहरणाच्या प्रकरणांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदवही ब्युरोच्या (एनसीआरबी) 2023 च्या अहवालानुसार, महिलांचे अपहरण हे पुरुषांच्या तुलनेत 5 पट अधिक झाले आहे.
एनसीआरबीच्या अहवालात नमूद केल्यानुसार, उत्तर प्रदेश राज्यांमध्ये एकूण अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर कोलकाता शहरात अपहरणाच्या घटनांमध्ये काहीशी घट झाली असली तरी, दिल्ली ही शहरांमध्ये अजूनही आघाडीवर आहे. पश्चिम बंगालमध्ये 2023 मध्ये एकूण 8,233 अपहरणाची प्रकरणं नोंदवण्यात आली, ज्यामध्ये महिलांच्या विरोधातील 6,920 घटना होत्या, तर पुरुषांच्या विरोधात 1,590 प्रकरणं नोंदली गेली. म्हणजेच, महिलांचे अपहरण हे पुरुषांच्या तुलनेत जवळपास 5 पट अधिक आहे.2022 मध्ये ही संख्या 8,088 होती, म्हणजेच एका वर्षात राज्यात 145 प्रकरणांनी वाढ झाली आहे.
उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी
क्राईम इन इंडिया 2023 या अहवालात सांगितलं आहे की देशभरात एकूण 1,06,584 अपहरणाच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या. यात उत्तर प्रदेशमध्ये 16,663 प्रकरणं, बिहारमध्ये 14,371, तर महाराष्ट्रात 13,106 प्रकरणं नोंदली गेली आहेत.एनसीआरबीच्या अहवालानुसार, अपहरणाच्या घटनांमध्ये मिझोराम राज्यात सर्वात कमी - फक्त 5 प्रकरणं नोंदवली गेली. तर लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशात 2022 आणि 2023 दोन्ही वर्षांत एकही अपहरणाची नोंद झालेली नाही.
कोलकाता आणि देशातील प्रमुख शहरांची स्थिती
कोलकातामध्ये 2023 मध्ये 281 अपहरणाची प्रकरणं नोंदवण्यात आली. 2022 मध्ये ही संख्या 452, तर 2021 मध्ये 346 होती. याचा अर्थ शहरात अशा गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे.पण याउलट, दिल्ली शहरात अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. 2022 मध्ये 5,585 प्रकरणं, तर 2023 मध्ये ती संख्या 5,681 वर पोहोचली. मुंबई दुसऱ्या क्रमांकावर असून तेथे 1,798 अपहरण प्रकरणं नोंदली गेली आहेत.
त्याचवेळी, केरळमधील कोची आणि तमिळनाडूमधील कोयंबतूर या शहरांमध्ये फक्त 16-16 अपहरणाची प्रकरणे नोंदली गेली असून, ती देशातील शहरांमध्ये सर्वात कमी आहेत.