Monday, November 24, 2025

लढाऊ रेवती

लढाऊ रेवती

दी लेडी बॉस : अर्चना सोंडे

राजेशाही आयुष्य पाहिल्यानंतर सामान्य जीवन जगण्यास आले तर कोणीही आपल्या नशिबाला दोष देऊन कोलमडून जाईल. ती मात्र तशी नव्हती. कपाळी वैधव्य आलं, आर्थिक विपन्नता आली; परंतु ती लढत राहिली. निव्वळ स्वतःसाठी नव्हे तर हजारो महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी. ही गोष्ट आहे, ‘हे दीदी’च्या रेवती रॉय यांची.१९६० मध्ये रेवतीचा जन्म कर्नाटकात झाला. मुंबईतील एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात ती वाढली. तिची आई गृहिणी होती आणि वडील रबर उद्योगावर आधारित रबर न्यूज नावाचे मासिक चालवायचे. प्रभादेवी येथील कॉन्व्हेंट शाळेत तिचं शालेय शिक्षण झालं. सेंट झेवियर्स महाविद्यालयामधून तिने अर्थशास्त्राची पदवी पूर्ण केली. ती एकुलती एक मुलगी असल्याने रेवतीच्या आई-बाबांनी तिचे खूप लाड केले. तिच्यावर कोणतेही बंधन नव्हते. मनाप्रमाणे अभ्यास करण्यास किंवा आवडेल ते काम करण्यास तिला मोकळीक होती.

पदवीधर झाल्यानंतर, ती १९८२ मध्ये करंट वीकलीमध्ये मार्केटिंग विभागात प्रशिक्षणार्थी म्हणून सामील झाली. त्यानंतर इंडिया टुडेमध्ये नोकरी करू लागली. पुढे टाइम्स ऑफ इंडियाच्या मार्केटिंग विभागात तिने तीन वर्षे काम केले. त्यानंतर तिने राजीनामा दिला.

१९८५ मध्ये रेवतीचा सिद्धार्थ रॉय या तरुणासोबत विवाह झाला. तिच्या पतीचा प्रिंटिंग प्रेस आणि लेदर फॅक्टरीचा व्यवसाय होता. ती आपल्या पतीला व्यवसायात मदत करू लागली. पुढे तिने काही कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये काम केले. २००४ मध्ये ती चेस्टरटन मेघराज या रिअल इस्टेट फर्ममध्ये मार्केटिंग प्रमुख होती. ती आणि तिचे पती आपल्या तीन मुलांसह ब्रीच कँडीमध्ये आलिशान जीवन जगत होते. मात्र या सुखी संसाराला जणू दृष्ट लागली. २००४ मध्ये अचानक रेवतीच्या आयुष्यात एक दुःखद घटना घडली. तिच्या पतीला, सिद्धार्थला हृदयविकाराचा झटका आला आणि ते कोमात गेले. तीन वर्षांच्या प्रदीर्घ आजारानंतर त्यांचे निधन झाले. रेवतीवर जणू आकाश कोसळले. भावनिक आधार तर गेलाच पण आर्थिक आधार सुद्धा गेला. सिद्धार्थच्या उपचारांवर जवळजवळ ३ कोटी रुपये खर्च झाले होते. सिद्धार्थ रुग्णालयात असताना उपचार खर्चासाठी पैसे उभारण्याकरिता रेवतीला घरासह त्याची मालमत्ता विकावी लागली. त्याच्या मृत्यूनंतर तिच्याकडे त्यांच्या मुलांशिवाय काहीही उरले नव्हते.

रेवती आर्थिकदृष्ट्या एवढी कोलमडली की पुण्यात एमआयटीमध्ये शिकणाऱ्या मुलाची कॉलेजची फी भरण्यासाठी पैसे नसल्याने त्याला शाळा सोडावी लागली. पण रेवती निराश झाली नाही. ती एक खंबीर पत्नी, खंबीर आई होती. स्वतःच्या आणि मुलांच्या भविष्याबद्दल विचार करण्याची वेळ आली होती. तिने तिच्या भावनांवर नियंत्रण ठेवले. आपल्या समोर असलेल्या आर्थिक पर्यायांचा विचार केला. तिचा एकमेव छंद गाडी चालवणे होता. तिने अनेक रॅलींमध्ये भाग घेतला होता. तिला गाडी चालवायला आवडते. आपल्या या आवडीचा आणि ड्रायव्हिंग कौशल्याचा वापर करून काही पैसे कमवण्याचा निर्णय घेतला.

रेवतीने एका मैत्रिणीकडून एक टुरिस्ट टॅक्सी घेतली. त्यानंतर तिने मुंबई विमानतळ चालवणाऱ्या जीव्हीके कंपनीसोबत संपर्क साधला. रेवतीची एकूण परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी तिला विमानतळावर एक जागा दिली. रेवतीने प्रवाशांना घेऊन जाण्यास सुरुवात केली. २००७ मध्ये एका महिलेने टॅक्सी चालवणे ही मोठी गोष्ट होती. तिने वर्तमानपत्रात जाहिरात दिली की ती टॅक्सी सेवा सुरू करत आहेत आणि तिला महिला ड्रायव्हर्सची आवश्यकता आहे. या जाहिरातीस तीन मुलींनी प्रतिसाद दिला. रेवतीने तीन इंडिका कारने सुरुवात केली. ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनी, ‘फॉर शी’ ही नावाची कंपनी सुरू केली. कॉर्पोरेट्स कंपन्यांचे अधिकारी, क्लायंट यांना विमानतळावरून आणणे व त्यांना पुन्हा पोहोचवणे आदी सेवा कंपनी पुरवू लागली. प्रसारमाध्यमांनी देखील या घटनेची दखल घेऊन बातम्या दिल्या. परिणामी आयएल अँड एफएस या वित्त कंपनीने त्यात गुंतवणूक केली.

या काळात तिच्या मित्रांनीही तिला खूप पाठिंबा दिला. काही वर्षांत, जपानस्थित ओरिक्सने तिच्या कंपनीला अतिरिक्त निधी दिला. त्यामुळे रेवतीने तिचा व्यवसाय ६० पेक्षा जास्त गाड्यांपर्यंत वाढवला. २००९ मध्ये, रेवतीने ‘फॉर शी’ सोडली आणि २०१० मध्ये तिने विरा कॅब्स ही एक नवीन पूर्णपणे महिला कॅब सेवा सुरू केली. दोन वर्षांत तिने तो व्यवसायही सोडला. तिचे मन आणखी एका मोठ्या कल्पनेवर काम करत होते. तिला महिलांना बाईक आणि स्कूटर चालवण्याचे प्रशिक्षण देऊन सक्षम बनवायचे होते.

तिने फूड आउटलेट्स आणि इतर कंपन्यांसाठी डिलिव्हरी सेवा देणारी कंपनी सुरू करण्याचा विचार केला. २०१६ मध्ये, तिने फेब्रुवारीमध्ये झाफिरो लर्निंग आणि मार्चमध्ये ‘हे दीदी’ असे दोन स्टार्ट अप सुरू केले. या स्टार्ट-अपमागील कल्पना वंचित महिलांना सक्षम बनवण्याची होती. प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांपैकी १,००० हून अधिक महिला दारिद्र्यरेषेखालील पार्श्वभूमीतून आल्या होत्या. त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. यापैकी अनेक महिला पहिल्या दिवसानंतर पुन्हा आल्या नाहीत कारण त्यांचे कुटुंब त्यांना बाहेर जाऊ देत नव्हते. ‘हे दीदी’ भेटवस्तूंपासून ते किराणा सामान, कागदपत्रे, अन्न, कुरिअरपर्यंत सर्व काही गोष्टी पोहोचवते. स्कूटर आणि बाईक घेण्यासाठी महिलांना कर्ज देण्यास कंपनी मदत करते. पैसे त्यांच्या पगारातून दरमहा कापले जातात जेणेकरून स्कूटर आणि बाईकच्या त्या मालक बनतील.

सुमारे १०० महिलांना दरमहा १०,००० रुपये पगारावर कंपनी रोजगार देते. आतापर्यंत २,८२३ महिला प्रशिक्षणात सहभागी झाल्या आहेत. हे दीदीमध्ये सामील होण्यापूर्वी वाहन चालकाचे प्रशिक्षण अनिवार्य दिले जाते. या प्रशिक्षणासाठी नोंदणी करणाऱ्या महिलांना १,५०० रुपये शुल्क भरावे लागते. प्रत्यक्षात प्रशिक्षण खर्च प्रति व्यक्ती ११,५०० रुपये आहे. १०,००० रुपयांची तूट भरण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी सरकारचा स्किल इंडिया उपक्रम, आरपीजी फाउंडेशन आणि टेक महिंद्रा वित्तपुरवठा करते. हे प्रशिक्षण मुंबई, बंगळूरु आणि नागपूर येथे होते. हे दीदीकडे अॅमेझॉन, पिझ्झा हट आणि सबवे यासारखे अनेक प्रतिष्ठित क्लायंट आहेत, तसेच द करी ब्रदर्स आणि द बोहरी किचन सारखे रेस्टॉरंट्स देखील आहेत. सामान्य महिलांना वाहन चालक प्रशिक्षणाद्वारे आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हे रेवती रॉय यांचे स्वप्न आहे.हे दीदीच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या झटत आहेत. रेवती रॉय यांच्यासारख्या लेडी बॉस मोठ्या संख्येने समाजात निर्माण झाल्या तर महिला सक्षमीकरण वेगाने होईल.

Comments
Add Comment