वैभववाडी : मंदार सदाशिव चोरगे
ग्रंथ कोंडून ठेवू नका, कपाटात सुरक्षित... जिथे ग्रंथ कोंडले जातात तिथे राष्ट्र कोंडले जाते, कपाटाच्या कबरीत गाडले जातात विचारांचे मुडदे. वाचनालय असते एक बाग न कोमेजणाऱ्या असंख्य फुलांनी बहरलेली...
अलीकडे वाचनाची आवड कमी होऊ लागली आहे असे अनेकजण म्हणतात, ते थोडेफार खरे असले तरी दूरदर्शनमुळे वाचण्याऐवजी ऐकण्यात आणि पाहण्यातच अनेकांचे मन गुरफटून जाते. असे असले तरी केवळ प्रेक्षक वा श्रोता होण्याने सर्वांच्या मनाची भूक भागत नाही. एकदा लहानपणी पुस्तकांशी मैत्री झाली की, ती संगत कधी सुटत नाही. जीवनातले अनुभव अधिक डोळसपणे देण्याची शक्ती पुस्तक आपल्याला देतात. आपलं व्यक्तिमत्त्व अधिक सुजाण संपन्न करतात. 'वाचनालयाविना शाळा म्हणजे शस्त्रगाराविना किल्ला होय' पूर्वीच्या काळी देशाभिमानाने प्रेरित होऊन समाज शिक्षण देण्याच्या उद्देशाने स्थापन केलेली ही ग्रंथालये म्हणजे स्वातंत्र्यप्रेमाची व जागृतीची प्रतीकेच आहेत. 'पुस्तक वाचल्यावर मस्तक तयार होतं आणि मस्तक तयार झाल्यावर माणूस कुठेही नतमस्तक होत नाही,' असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. आज विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक तथा समाजातील सर्वच घटकांचे वाचन कमी होत आहे हे वास्तव आपल्याला नाकारता येणार नाही. वाचनाद्वारे व्यक्तिमत्त्व विकासासाठी अनेक गोष्टी सहाय्यभूत ठरतात. हे जवळपास प्रत्येक यशस्वी क्षेत्रातील तज्ज्ञ तथा अनुभवी व्यक्तींचे मत आहे. आज विद्यार्थी वर्ग केवळ मिळेल त्या साधनांद्वारे फक्त माहिती गोळा करीत आहे. अभ्यासक्रमाशी पूरक असणाऱ्या उपयुक्त वाचनाकडे अनेकांचा कल आहे; परंतु मूळ कलाकृतीचा अभ्यास करण्याकडे, वाचन वाढवण्याकडे अनेकांचे दुर्लक्ष होत आहे. देशाला महासत्ता बनवण्याचे ज्यांनी प्रथम स्वप्न पाहिले ते आपले राष्ट्रपती भारतरत्न भारताचे मिसाईल मॅन डॉक्टर ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या राष्ट्रीय कार्याची दखल म्हणून त्यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिनाच्या रूपात आज सर्वत्र सर्व शाळांमध्ये साजरा करण्यात येतो; परंतु हा एक दिवसाचा कार्यक्रम न राहता त्यात सातत्य राहणे गरजेचे आहे.
'वाचाल तर वाचाल, ग्रंथ हेच गुरू, पुस्तक मस्तक घडवतात, प्रसंगी अखंडित वाचीत जावे अशी अनेक वाक्य कानावर येतात. पण कोण लक्षात घेतो? मोबाइल, इंटरनेटच्या जमान्यात वाचन दुर्लक्षित झाले का? अन् असेल तर तो खजिना आजच्या विद्यार्थ्यांना कसा उपलब्ध करून देता येईल. आज जे काही विद्यार्थ्यांकडून वाचले जाते ते केवळ पाठ्यपुस्तकांमधीलच. शिक्षक आपले अभ्यासक्रमामध्ये, तर विद्यार्थी त्यांच्या परीक्षेच्या अभ्यासात गुंग, कुणालाच दोष देता येणार नाही. पण जेवण जसे चौरस असावं तसं वाचन देखील चौफेर असावे. सार्वजनिक तसेच महापालिकेची वाचनालये आज ओस पडत असल्याचे दिसते.
ज्येष्ठ नागरिक सोडता तरुणांनी वाचनालयाकडे पाठ फिरवली आहे. हा सोशल मीडियाचा परिणाम आहे. काही ठिकाणी वाचक आहेत पण वाचनालयात दर्जेदार पुस्तके, साहित्य ग्रंथ, उपलब्ध नाहीत. बऱ्याच वेळा भरमसाट पुस्तके प्रसिद्ध होतात. त्यातील ठरावीक पुस्तकांची विक्री होते मग वाचन कमी झाले अशी ओरड सुरू होते. या ओरडण्याला तसा अर्थ नाही. हा निराशावादी दृष्टिकोन आहे. असे मला वाटते वाचनाचे अनेक पर्याय सध्या आपल्याकडे आलेले आहेत. पारंपरिक छापील पुस्तकांबरोबर आधुनिक अशा ई-बुक सारख्या पुस्तकांमुळे पुस्तकांचे विश्व अधिकच रुंदावले आहे. किंबहुना यामध्ये रोजच भर पडत आहे. आधुनिक साधनांमुळे कमी जागेत, कमी खर्चात जास्त संख्येने पुस्तकं साठवली जातात. आज ऑनलाईन पुस्तकांच्या माध्यमातून अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. विविध पुस्तकांवर भरपूर सूट, प्रदर्शन व ऑनलाइन विक्रीमध्ये मिळत असल्याने वाचक पुस्तक खरेदी करणे पसंत करत आहेत. सध्या वाचकांच्या घरी स्वतःची छोटी छोटी वाचनालये उदयास येत आहेत, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. सध्या वाचन संस्कृतीने आपल्या पारंपरिक ढाचा बदलून नवा ढाचा तयार केला आहे. जोपर्यंत मानवाला ज्ञानलालसा आहे तोपर्यंत वाचन संस्कृती लयास जाणे कदापिही शक्य नाही. आताचे जग ऑनलाइन वाचनालयाचे आहे. विविध लेखकांचे ब्लॉग, विविध लेख, पेज, ई-पेपर याद्वारे लेखन वाचकांसाठी उपलब्ध होत आहे. विविध ऑनलाईन अॅप्स, पीडीएफ स्वरूपात उपलब्ध पुस्तके मोबाइलवर उपलब्ध आहेत. यामुळे वाचनालय आपल्या सदैव सोबती अशा परिस्थितीमुळे ग्रामीण व शहरी भागातील वाचनालये सुनी सुनी झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. दुसरीकडे मात्र आजही मुंबई-पुणे यांसारख्या शहरात लोकल ट्रेन, एसटी यामध्ये पुस्तके वाचणारी अनेक मंडळी आपल्याला निदर्शनास पडतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त एसटी बसमध्ये वाचनालयाची संकल्पना सध्या पाहायला मिळते. त्याशिवाय पुस्तकांचे गाव भिलार ही याची आदर्श उदाहरणे सांगण्यात येतील.
सध्याचे पालक आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालणे पसंत करतात. त्यामुळे मराठी विषयाची आवड नसल्याने मराठी वाचनालयाकडे त्यांनी पाठ फिरवली आहे. दुर्दैवाने आपली मराठी अन्य भाषेच्या तुलनेत काहीशी मागे पडत आहे. ती पुढे येणे गरजेचे आहे. आजच्या इंटरनेटच्या आभासी युगात वाचनासाठी उसंत थोडीफार कमी झाली आहे. मोबाइल, फेसबुक, व्हाॅट्सअॅप विविध मनोरंजनात्मक गेम्स, टीव्हीचे शेकडो चॅनल्स यामुळे मनोरंजनाची अनेक माध्यमे उपलब्ध झाली आहेत. यातून साहित्याची गरज संपुष्टात येईल का? या प्रश्नाचे उत्तर देताना ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोतोपल्लींनी म्हटलंय... उद्या विज्ञान तंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या गुंतागुंतीतून सुटकेच्या धडपडीसाठी उन्नत अर्थव्यवस्थेने कोंडलेल्या श्वासाला विरोध करण्यासाठी निर्मळ जगण्यास शेवटी माणसाला साहित्याच्या आश्रयाला यावे लागणार. दुसरा आश्रय कोणता असणार आहे. गुगलमुळे पडलेल्या प्रश्नांना क्षणात उत्तर शोधणे सोपे झाल्यामुळे चिकित्सा व चिकिस्तकवृत्ती कमी झाली आहे. गेल्या काही वर्षांत रेडिओ, इंटरनेट, दूरचित्रवाणीचा विकास आणि वापर झपाट्याने वाढला पण वृत्तपत्रे आणि पुस्तकांना जगातून हद्दपार करण्यात माध्यमांना यश आलेले नाही, रेडिओद्वारे ऐकू येणारे शब्द व दूरचित्रवाणीवरील चित्रे यांचा मनावर तत्काळ परिणाम होतो पण तो वरवरचा असतो टिकाऊ नसतो. आजही कमी खर्चाचे व चटकन उपलब्ध होणारे ज्ञानाचे साधन म्हणजे पुस्तकेच आहेत.
पुस्तके वाचून मोठमोठ्या चळवळी उभ्या केलेल्या व्यक्ती वर्तमानकाळात सुद्धा आपल्यासमोर आहेत. साहित्य संमेलन, प्रबोधनवादी मेळावे यात पुस्तकांची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री होतच असते व आजही अनेक पुस्तके जन्माला येत आहेत. त्यांचा वेग मंदावलेला नाही यावरून जरी वाचनालय सुनी सुनी झाली तरी वाचन कमी झालेले नाही हे लक्षात येते. आजच्या काळात 'वाचाल तर वाचाल' हे बाबासाहेबांचे शब्द सार्थ वाटतात व अनेक वेळा मार्गदर्शक ठरतात. सध्या प्राथमिक शिक्षण स्तरावर विद्यार्थ्यांच्या वाचन, लेखन, क्षमता विकसित करण्यासाठी अनेक प्रकारचे उपक्रम देखील शासनाने हाती घेतले आहेत. आपणही सर्वांनी एक पाऊल पुढे टाकत वाचन संस्कृती जोपासण्यासाठी नियमित वाचन करणे गरजेचे आहे.