मोरपिस : पूजा काळे
व्यक्तिमत्त्व विकासाच्या टप्प्यात साहित्याच्या योगदानाचा विषय महत्त्वाचा ठरतो. भाषा चळवळीद्वारे वैचारिक प्रगल्भतेतून समृद्धी स्त्रोताचा उगम होत असता, दुसरीकडे व्यक्तिमत्त्व विकासाच्या पायघड्या वाट पाहत असतात, ज्याच्या प्रभावाने आपल्या जीवनाचा ऊष:काल चिरायू होतो. जगभरात कुठल्याही भाषेचा प्रचार, प्रसार आणि संचार होण्याची मूळ कारण म्हणजे विकसित आणि वैकल्पिक तंत्रज्ञान होय. साहित्य क्षेत्रात आपल्या मराठी भाषेला सर्वोत्तम दर्जा प्राप्त झाला आहे. नामांकनाने तिच्या अस्तित्वाची जगमान्य मोहोर उठली आहे, ज्यात भाषेवरील शोध प्रबंध, त्याला लाभलेले रत्नजडित अलंकार, प्रतिमा, प्रतीक आणि विशेषणांचे बहुमोल संस्कार आहेत. यास्तव त्यावरील जतन, संवर्धनातून अति महत्त्वाच्या गोष्टी आपल्या प्रतीक्षेत आहेत. साहित्याची धुरा सांभाळणारा समाजातील मोठा घटक अर्थात पंडित, साहित्यिक, वैचारिक बैठकीतले दिग्गज जे भाषेला तिच्या साहित्याला पुढे नेण्याचं काम करतील. त्यातून कविता, कथा, कादंबऱ्या, ललित, व्यक्तीचारित्र्य विशेष संपादित साहित्य, पत्रलेखन, ऐतिहासिक, सामाजिक आणि न्यायविषयक साहित्याची या न त्या कारणाने झालेली ओळख साथ करेल. साहित्य हे जीवनाचे दर्शन घडवणारे असल्याने ते माणसाच्या रंजनाचे, उद्बोधनाचे, मार्गदर्शनाचे प्रमुख साधन आहे. व्यक्तिमत्त्व विकासाच्या जडणघडणीत भाषेतल्या विविध साहित्याचा फार मोठा वाटा आहे. साहित्य हे कलेसाठी कला नसून जीवनासाठी मानणारे वि. स. खांडेकर म्हणतात की, पाणबुड्यांना उत्कृष्ट मोत्यांसाठी समुद्राचा तळ गाठावा लागतो, पण चांगल्या वाड्.मयातले मोती नेहमी पृष्ठभागावर तरंगत असतात. साहित्य विषयावर होणारी जाणकारांची व्याख्याने, संवाद, भाषणे आपलं मनोधैर्य वाढवतात. विचारधारेचं समर्थन करण्याची ताकद विशिष्ट साहित्यात असल्याने कुठल्याही व्यक्तिमत्त्वावर ती छाप पाडतात जी उत्तम दिशादर्शकाचे काम करतात. साहित्याची उंची छोटी अथवा मोठी नसते. ती प्रत्यक्ष जीवनरूपी आरशाचं काम करते. जीवनात साक्षात्कार घडविण्याचे महत्त्वपूर्ण काम करताना मानवी हृदयावर सौंदर्याचे संस्कार कोरीत साहित्यातून कला जोपासली जाते. यालाच कलेतल्या साहित्याचा उगम असे म्हटले जाते. एखाद्या व्यक्तीवर आसपास घडणाऱ्या गोष्टींचा प्रभाव असतो. तो दिसतोही. म्हणजे बघा स्वत:चे वा समोरील व्यक्तीचे अंतर्मन जाणण्यासाठी त्याचं कौशल्यपूर्ण बोलणं अतिशय तारक ठरतं, जे गोष्टी विकसित करण्यासाठी प्रत्यक्ष जीवनात साहित्यिक योगदान फळाला येतं. मानव जन्माला येताना शारीरिक वाढीसह मानसिक उन्नयन त्यायोगे व्यक्ती आणि व्यक्तिमत्त्व विकासाची वाढ होते. व्यक्तीच्या जीवनातील पहिले ग्रंथालय म्हणजे त्याचे घर आणि जीवनातील पहिले वहिले साहित्यिक म्हणजे त्याचे आई आणि वडील होत. इथून पुढे प्रत्यक्ष जीवन प्रवासात साहित्यविषयक योगदानाचा प्रभावपडायला लागतो. घरात असलेली ज्येष्ठ मंडळी, आई, वडील आणि आनंद निर्मितीसाठी पूरक-पोषक असलेले वातावरण, याचा विचार हा पुढील बाजू भक्कम करतो. चारभिंती, खिडक्या, दारासह कुटुंबातील सदस्यांना पुढे नेणाऱ्या परंपरा, त्याला सुसंस्कृत आणि सुसंगत ठरणारे आचार, विचार, संस्कार या सगळ्या गोष्टींनी सुरू होतो प्रापंचिक साहित्य प्रवास. पुढे शालेय जीवनात विद्यार्थी रूपात गुरुशिष्याच्या नात्यामध्ये जडलेला व्यासंग. ज्ञानार्जनासाठीचे अध्ययन. पुस्तकांशी मैत्री होण्याच्या काळात मनावर कोरलेले संस्कार कायम रुजतात, जे मानवी मनात आनंद वृत्ती निर्माण करणारे ज्ञान, साहित्य, विद्या, विचार आत्मसात करताना दिसतात. मनन, वाचनाने संकलीत ज्ञान प्राप्त करण्याची सगळी दालनं खुली होतात. दरवेळी ‘अभ्यासोनी प्रगटावे’ चा जीवन मंत्र लक्षात घेता, आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार ठरू हे निश्चित होय. थोडसं धाडस दाखवून, कष्टाने, मेहनतीने मशागत होऊ लागली की कस्तुरीचा दरवळ आपसूक येऊ लागतो. व्यक्तिमत्त्व विकासाची पहिली पायरी अवघड नसली तरी विचारांचे कुंपण मजबूत असावे लागेल.
मोठ्या विचारवंतांची नाळ साहित्याशी जोडली असल्याने एका महान व्यक्तिमत्त्वाची उपाधी त्यांना सहज मिळते. त्यामागचा व्यासंग, प्रयत्नाची पराकाष्ठा पराकोटीची असते हे विसरून चालता कामा नये. हरेक वाचनाची फलश्रुती म्हणजे व्यक्तिमत्त्व विकासाची पायाभरणी होय. मनन, वाचन, संकलन यातून अभिव्यक्त होत जगणं आणि कृतिशील बनणं या व्यक्तिमत्त्व विकासाच्या उन्नत पायऱ्या आहेत. महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे जीवनात साहित्य अभ्यासामुळे आपल्यात स्वागतार्ह बदल घडतो. ज्यातून विकास घडतो. आगंतुकासारखी झालेली प्रगती आपल्या टप्प्याची दिशा ठरवते. आपलं मन आपणास एक पावती देते त्यावेळी अनंत परिश्रमात दडलेली प्रतिमा ही प्रतिभेच्या रूपात अवतरते. तेव्हा सत्य, शिव, सौंदर्य याचं संमेलन म्हणजे अवघे साहित्यविश्व संमेलन मानून व्यक्तिमत्त्व विकासाची कला सगळ्यांना अवगत होओ या शुभेच्छा. व्यक्तिमत्त्व विकासासाठी आपलं लेखन पुस्तक संचात, दिवाळी अंकात लेखन रूपाने बहरत राहो.