Wednesday, October 15, 2025

मेट्रो १ ताब्यात घेण्याच्या एमएमआरडीएच्या हालचाली

मेट्रो १ ताब्यात घेण्याच्या एमएमआरडीएच्या हालचाली

मार्गिकेचे सखोल निरीक्षण करणार

मुंबई : मुंबईतील सर्वात पहिली मेट्रो १ (वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर) ताब्यात घेण्याच्या हालचाली मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पुन्हा सुरू केल्या आहेत. मेट्रो प्रवाशांना अधिक सुरळीत आणि आरामदायी सेवा मिळावी म्हणून एमएमआरडीए मार्गिकेच्या देखरेखीसाठी स्वतंत्र अभियांत्रिकी कंपनीची नेमणूक करणार आहे. या कंपनीच्या अहवालाच्या आधारे मार्गिका ताब्यात घेणे सोपे होईल, असे सांगितले जाते.

रिलायन्स इन्फ्रा कंपनी ही मार्गिका 'एमएमआरडीए'कडे सोपवण्यास तयार असून, त्यासाठी ४१०० कोटी रुपयांचा खर्च करण्यास राज्य सरकारने मागील वर्षी 'एमएमआरडीए'ला मंजुरी दिली होती. मात्र विधानसभा निवडणुकीआधी तो निर्णय मागे घेण्यात आला. आता पुन्हा 'एमएमआरडीए'ने स्वतंत्र इंजिनीअरकडून मार्गिकेचे सखोल निरीक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी 'एमएमआरडीए'ने निविदा काढली आहे. मेट्रो १ (वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर) या मार्गिकेच्या संचालन व देखभालीच्या देखरेखीसाठी इंजिनीअरची निवड' या उद्देशाने ही निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. नियुक्त कंपनी मार्गिकेच्या सर्व तांत्रिक आणि संचालनाशी निगडित बाबींचा सविस्तर अभ्यास करेल. हे कंत्राट ३६ महिन्यांसाठी असेल. मात्र मार्गिका ताब्यात घेण्याची प्रक्रिया याआधी पूर्ण झाल्यास कंत्राट आपोआप संपुष्टात येईल, असे स्पष्ट केले आहे. ही निविदा मेट्रो १ ताब्यात घेण्याच्या हालचालींचाच एक महत्त्वाचा भाग आहे.

२०१४ मध्ये सुमारे २६०० कोटी रुपयांचा खर्च करून ही मार्गिका सुरू झाली. मागील वर्षभरापासून दररोज सरासरी पाच लाख प्रवासी या मार्गिकेचा वापर करत आहेत. तरीही परिचालनात्मक खर्च प्रचंड असल्याने मार्गिका सातत्याने तोट्यात आहे. त्यामुळे एमएमओपीएलने मार्गिकेची मालकी राज्य सरकारकडे सोपवण्याची विनंती केली आहे. त्यासाठी कंपनीने ४४०० कोटी रुपयांची मागणी केली होती. विशेष समितीच्या अभ्यासानंतर राज्य सरकार ४१०० कोटी रुपयांना मार्गिका खरेदी करण्यास तयार होते. मात्र, हा निर्णय तीन महिन्यापूर्वी घेतला. आता या प्रक्रियेतील हालचाली पुन्हा सुरू झाल्या आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >