
मुंबई: बी. आर. चोप्रा यांच्या महाभारत या टीव्ही मालिकेत कर्णाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांचे आज १५ ऑक्टोबर रोजी मुंबईत निधन झाले. मागील अनेक दिवसांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. मात्र वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांनी कर्करोगामुळे शेवटचा श्वास घेतला. पंकज धीर यांच्यावर आज सायंकाळी ४:३० वाजता पवन हंस स्मशानभूमी, विलेपार्ले (पश्चिम) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पंकज धीर हे सिने आणि टीव्ही कलाकार संघटनेचे (CINTAA) चे माजी सरचिटणीस होते. धीर यांनी १९८८ मध्ये महाभारत मालिकेत केलेल्या कर्णाच्या भूमिकेमुळे त्यांची ओळख घराघरात पोहोचली. कर्णाचा संदर्भ देण्यासाठी धीर यांचे मालिकेतील फोटो पुस्तकांमध्ये वापरण्यात आले होते. तसेच कर्नाल आणि बस्तरमधील मंदिरांमध्ये कर्ण म्हणून त्यांच्या पुतळ्यांची पूजा केली जाते. याव्यतिरिक्त त्यांनी अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये छोट्या-मोठ्या महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.