
मुंबई (खास प्रतिनिधी) : विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली- २०३४ च्या विनियम १५ व ३३ (२०) (ब) अन्वये प्राप्त ४२६ सदनिकांच्या विक्रीसाठी मुंबई महानगरपालिकेकडून गुरुवारी १६ ऑक्टोबर २०२५ ते २१ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ऑनलाइन लॉटरी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यात अत्यल्प आणि अल्प गटासाठी या सदनिका उपलब्ध असतील.
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली- २०३४ च्या विनियम १५ व ३३ (२०) (ब) अन्वये प्राप्त ४२६ सदनिकांच्या विक्रीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://bmchomes.mcgm.gov.in या संकेतस्थळावरुन अर्ज मागविण्यात येत आहेत. १६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेपासून ऑनलाइन अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया सुरू होईल. अर्जदारांना १४ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज भरता येतील. तर, अर्ज शुल्क आणि अनामत रक्कम १४ नोव्हेंबर २०२५ रात्री ११.५९ वाजेपर्यंत स्वीकारण्यात येईल. पात्र अर्जदारांची अंतिम यादी १८ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता जाहीर करण्यात येईल आणि सोडत प्रक्रिया २० नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता पार पडेल. या सोडतीतून निवड झालेल्या यशस्वी व प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नावे २१ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
या सोडतीसंदर्भातील माहिती पुस्तिका १६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेपासून संकेतस्थळावर उपलब्ध होईल. प्रक्रियेसंदर्भातील विविध प्रकारची माहिती तसेच अटी व शर्तींबाबत पुस्तिकेमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. या प्रक्रियेतील सदनिकांसंदर्भात आवश्यक बदल करण्याचा अधिकार बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे आहेत. तसेच, माहिती पुस्तिकेतील सर्व अटी व शर्ती (वेळोवेळी होणाऱ्या सुधारणांसह) लागू राहतील, असे प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.
दरम्यान, या सोडतीसंदर्भात माहिती व मदतीसाठी ०२२-२२७५४५५३ या मदतसेवा क्रमांकावर किंवा bmchomes@mcgm.gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधावा. अथवा, ‘सहाय्यक आयुक्त (मालमत्ता), चौथा मजला, विस्तारित इमारत, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय, महापालिका मार्ग, मुंबई – ४०० ००१’ या पत्त्यावर कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी आणि कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत संपर्क साधावा, असे प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.