
संपूर्ण भारतात दीपावलीचे दिवे प्रज्वलीत केले जात असताना, वर्तमानाशी सुसंगत रामायणातील एक कालातीत दृश्य आपल्या समोर तरळत आहे. हनुमान समुद्राच्या काठावर उभा आहे, आपल्या सामर्थ्याबद्दल अनभिज्ञ, मात्र जांबुवंताने त्याला त्याच्या सामर्थ्याची जाणीव करून दिल्यानंतर त्याने केलेले उड्डाण, हा काही चमत्कार नव्हता; ही झेप म्हणजे त्याच्या आत्मविश्वासाचे कृतीत झालेले परिवर्तन होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील, जागतिक अडथळ्यांवर मात करण्यासाठी स्वतःचे अंतर्गत सामर्थ्य ओळखू शकतील अशा प्रकारे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये याच आत्मविश्वासाचे प्राण फुंकत आहेत. जगभरात व्हिसा निर्बंध आणि आयात शुल्कांच्या नव्या भिंती उभ्या राहत असताना, मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक स्तरावर आत्मविश्वासाने वाटचाल करत, प्रतिकूलतेला झपाट्याने अनुकूलतेत परिवर्तीत करत आहे.
अलीकडच्या महिन्यांमध्ये, अमेरिकेने नवीन H-1B व्हिसा अर्जांसाठी १,००,००० अमेरिकी डॉलर्स एवढे शुल्क तसेच ब्रँडेड आणि स्वामित्व हक्क (पेटंट) प्राप्त औषध आयातीवर १००% शुल्क लादले आहे. स्थानिकांचे रोजगार हिरावले जाऊ नयेत या नावाखाली आखल्या जाणाऱ्या या धोरणांमागे खरं कारण आर्थिक नसून समाजातील असुरक्षितता, लोकसंख्येच्या रचनेत होणाऱ्या बदलाची भीती आणि ‘आपलं गमावण्याची’ मानसिकता आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारताचे यावरचे उत्तर म्हणजे तीन आधारस्तंभ बळकट करणे, ज्यांना कोणतेही शुल्क हलवू शकत नाही आणि ते आहेत. उत्पादन क्षमता, कौशल्य आणि आत्मनिर्भरता (सेल्फ-रिलायन्स). जगातील परिस्थितीच्या तुलनेत भारताचं चित्र अगदी वेगळं, आहे आणि म्हणूनच आश्चर्यकारक आहे. चीनमध्ये वृद्धांची संख्या वाढत आहे आणि अर्ध्या लोकसंख्येचे वय ४० वर्षांहून अधिक झालं आहे, तर भारतात निम्मी लोकसंख्या अजूनही २९ वर्षांखाली आहे. याशिवाय, आपल्या देशातील दोन तृतीयांश लोकसंख्या ३५ वर्षांखालील आहे, म्हणजेच भारत प्रचंड तरुण आणि ऊर्जावान देश आहे. तरुणाईची ही ऊर्जा, जर योग्य रीतीने कौशल्यविकास, शिक्षण आणि उद्यमशीलता या मार्गांनी वापरली, तर ती भारताला जगाच्या अर्थव्यवस्थेचे इंजिन बनवते म्हणजेच जागतिक वाढीचं नेतृत्व भारत करत आहे. जागतिक संस्थांनी गेल्या वर्षी भारताने जागतिक वाढीमध्ये सोळा टक्क्यांहून अधिक योगदान दिले असल्याचे अहवाल देणे, ही निव्वळ एक घोषणा नाही. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील गेल्या दहा वर्षांच्या सुधारणा, गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा या सर्वांचे हे फलित आहे.
ताजी आकडेवारी, ही वेगवान वाटचाल अधोरेखित करते. भारतीय रिझर्व्ह बँकेने, आर्थिक धक्के पचवू शकणारी देशांतर्गत मागणी, स्थिर गुंतवणूक प्रवाह आणि चांगल्या मान्सूनच्या अंदाजामुळे वित्तीय वर्ष २६ साठी भारताचा सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा (जीडीपी) अंदाज ६.८ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. GST संकलनाने सप्टेंबरमध्ये १.८९ लाख कोटी रुपयांचा टप्पा पार केला. हे संकलन १.८ लाख कोटींच्या वर राहिलेला हा सलग नववा महिना आहे. यातून हे दिसून येते, की लोकांकडून खरेदी आणि कर भरणाऱ्यांची संख्या, दोन्ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परकीय चलन साठा ७०० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे, जो जवळपास अकरा महिन्यांच्या आयातीसाठी पुरेसा आहे, तर जूनला संपलेल्या तिमाहीतील परदेशस्थ भारतीयांनी पाठवलेला पैसा ३३.२ अब्ज डॉलर्स होता, जो मागील वर्षाच्या पातळीपेक्षा खूप जास्त आहे.
उत्पादन खरेदी व्यवस्थापकीय निर्देशांक (पीएमआय), ५७.७ वर आणि सेवा खरेदी व्यवस्थापकीय निर्देशांक (पीएमआय) ६०.९ वर असा मजबूत राहिला आहे. त्यामुळे जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताच्या दर्जाची पुष्टी होत आहे. सणासुदीच्या पहिल्या पंधरवड्यात केवळ ऑनलाइन खरेदीद्वारे, वाहन, इलेक्ट्रॉनिक्स, सोने आणि वस्त्रे यांच्या मागणीमुळे सकल माल मूल्यात ९०,००० कोटी रुपयांहून अधिकची कमाई झाली. दिवाळीत मागील सर्व विक्रम मोडण्याची अपेक्षा आहे. अर्थव्यवस्थेचा पाया भक्कम आहे. गेल्या दशकात, भारताचा जीडीपी जवळजवळ दुप्पट होऊन भारताची अर्थव्यवस्था जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे आणि लवकरच जर्मनीला मागे टाकण्याची अपेक्षा आहे. २०२४-२५ मध्ये, वस्तू आणि सेवांची भारताची एकूण निर्यात सुमारे ८२५ अब्ज अमेरिकी डॉलर्स इतक्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली, तर केवळ वस्तूंची निर्यात सुमारे ४३७ अब्ज अमेरिकी डॉलर्स होती. हे कटू सत्य आहे, की काही विरोधाला विरोध करणारे टीकाकार पंतप्रधान मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या दृष्टिकोनाचा चुकीचा अर्थ लावत, राजकीय फायद्यासाठी त्याचा अपप्रचार करत आहेत आणि अजूनही २०व्या शतकाच्या दृष्टिकोनातून त्याकडे पाहत आहेत. आत्मनिर्भरता-स्वावलंबन म्हणजे अलिप्तपणा-अप्पलपोटेपणा नाही.
‘आत्मनिर्भर भारत’ म्हणजे देशाचे स्वत्त्व जागतिक पातळीवर सिद्ध करणे आहे. हे स्वत्त्व, भारताला जागतिक बाजारपेठेत तोडीसतोड उभे राहण्यास सक्षम करते. ५०,००० कोटी रुपयांचा निधी राखून ठेवण्यात आलेली अनुसंधान नॅशनल रिसर्च फाऊंडेशन ही राष्ट्रीय संशोधन संस्था आपल्या संशोधन आणि विकास परिसंस्थेला नवचैतन्य देणार आहे. मोदींच्या मार्गदर्शनाखाली, भारताने जगातील सर्वात समावेशक डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा निर्माण केली. यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस आता, दररोज व्हिसापेक्षा ही जास्त ६५० दशलक्षाहून अधिक दैनिक व्यवहार हाताळत आहेत. आधार, डिजी-लॉकर आणि ओएनडीसी हे डिजिटल वाणिज्य व्यवहारांसाठीचे खुले जाळे, हे तिन्ही डिजिटल उपक्रम एकमेकांशी जोडलेले आहेत आणि एकत्र मिळून एक मोठी डिजिटल परिसंस्था तयार करतात. या माध्यमातून सामान्य नागरिक, छोटे व्यावसायिक आणि नवउद्योजक सर्व एकाच डिजिटल मंचावर जोडले जातात, म्हणजेच देशातील कोट्यवधी लोकसंख्येपर्यंत सेवा आणि संधी पोहोचतात. सिंगापूर, संयुक्त अरब अमिरात आणि इतरांशी असलेल्या यूपीआयच्या जागतिक भागीदारीतून हे दिसून येते, की भारतीय नवोन्मेष जागतिक मापदंड निर्माण करू शकतात. हेच तंत्रज्ञान, राज्यकारभार, सक्षमीकरण आणि निर्यात म्हणून कार्य करते. या कथेचा केंद्रबिंदू लोक आहेत. लोकसंख्येनं ३२ दशलक्षाहून अधिक असलेला आपला बलवान परदेशस्थ भारतीय समुदाय, जगातील सर्वात यशस्वी आणि प्रतिष्ठित समुदायांपैकी एक आहे. आज अकरा, फॉर्च्यून ५०० कंपन्यांचे नेतृत्व भारतीय वंशाचे मुख्य कार्यकारी अधिकारी करत आहेत. यांचे एकत्रित बाजारपेठ भांडवल मूल्य सहा ट्रिलियन (६ लाख कोटी) डॉलर्सपेक्षा जास्त आहे. त्यांचा आजवरचा प्रवास नवीन भारताच्या आकांक्षांचे प्रतिबिंब आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वाने या विखुरलेल्या जागतिक ऊर्जेला भारतात एक ठोस आधार दिला आहे.
‘मेक इन इंडिया’, ‘स्टार्टअप इंडिया’ आणि ‘स्किल इंडिया’ या योजना म्हणजे वेगवेगळे समांतर मार्ग नाहीत तर त्या एकमेकांशी जोडलेल्या मूल्यसाखळीचा भाग आहेत. त्यांचा उद्देश स्पष्ट आहे. संधी ओळखणे, उद्योजकतेला बळ देणे आणि तरुणांना कौशल्ययुक्ततेने सज्ज करणे. आता पुढचे पाऊल म्हणजे, या सर्व उपक्रमांना एका एकसंध चौकटीत एकत्र आणणारी एक संपूर्ण जागतिक कौशल्य मोहीम उभारणे. यामुळे भारतीय कामगार आणि व्यावसायिक जगभरात सर्वाधिक पसंतीचे ठरतील. ही केवळ एक संकल्पना नाही, तर मोदींच्या राजनैतिक प्रयत्नांमुळे, अनेक देशांसोबत सरकार ते सरकार भागीदाऱ्यांच्या माध्यमातून आधीच सुरू झालेली एक जागतिक मोहीम आहे. म्हणूनच हनुमान उडी हे प्रतीक अगदी सार्थ आहे. ती उडी ही बंडखोरीची कृती नव्हती, तर स्वतःची शक्ती ओळखून कर्तव्य पूर्ण करण्याची कृती होती. पंतप्रधान मोदींच्या राज्यकारभाराच्या तत्त्वज्ञानाचा पाया याच विश्वासावर आधारित आहे, की भारताचं यश हे त्याच्या लोकांच्या जागृत शक्तीत आहे. हनुमान उडी ही स्वसामर्थ्य ओळखण्याचा एक दाखला होती. पंतप्रधान मोदी यांचा प्रयत्नही हाच आहे.आपल्याला आपल्या क्षमतेची जाणीव करून देणाऱ्या भारताच्या त्या सामर्थ्यवान राष्ट्रीय स्मृतीला पुनरुज्जीवित करणे जेव्हा इतर देश विविध बागुलबुवांच्या भिंतीच्या भिंती उभारतात, तेव्हा भारत क्षमतेच्या इमारती निर्माण करतो. जेव्हा इतर देश संधींवर मर्यादा घालतात, तेव्हा भारत त्या संधींचा विस्तार करतो.
आपल्या संस्कृती, परंपरा आणि मूल्यांमधून आलेला आत्मविश्वास आता फक्त इतिहासात नाही, तर आजच्या आधुनिक अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि जागतिक स्पर्धेत भारताला पुढे नेणारा प्रेरणास्त्रोत ठरतो. हनुमानाची उडी, समुद्र लहान झाला म्हणून नव्हे, तर त्याच्या आत्मविश्वासाची झेप विस्तारली म्हणून यशस्वी झाली आणि हेच दीपावली जवळ येत असताना स्मरणात ठेवण्याजोगे आहे. आज जग नवीन अडथळे उभे करत असेल, पण भारताकडे द्रष्टे नेतृत्व, संकटाला न डगमगता तोंड देण्याची ताकद आणि यशोशिखरे गाठण्याची ठाम ध्येयभावना आहे. पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या दृष्टिकोनाने प्रेरित आजचा भारत किनाऱ्यावर थांबून राहणारा देश नाही…. तो स्वतःचे सामर्थ्य ओळखतो आणि पुढे झेप घेतो.
हरदीपसिंग पुरी (लेखक हे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री आहेत.)