
नवी दिल्ली : डीआरडीओने अर्थात भारतीय संरक्षण संशोधन प्रबोधिनीने अस्त्र क्षेपणास्त्राची आधुनिक आवृत्ती विकसित केली आहे. भारतीय हवाई दलासाठी ही आवृत्ती विकसित करण्यात आली आहे. हे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या विमानांचा नायनाट करण्यास सक्षम आहे.
भारताने आधी विकसित केलेले अस्त्र क्षेपणास्त्र १६० किलोमीटर पर्यंत कुठेही अचूक आणि भेदक हल्ला करण्यास सक्षम होते. अस्त्र क्षेपणास्त्राची डीआरडीओने विकसित केलेली नवी आवृत्ती २०० किलोमीटर पर्यंत कुठेही अचूक आणि भेदक हल्ला करण्यास सक्षम आहे. भारताच्या लढाऊ विमानांतून अस्त्र क्षेपणास्त्र प्रक्षेपित करता येते. यामुळे भारताची लढाऊ विमानं सुरक्षित अंतरावर राहून पाकिस्तानमध्ये खोलवर अचूक आणि भेदक हल्ला करू शकणार आहे. भारतीय हवाई दल लवकरच २०० किलोमीटरचा पल्ला असलेले आधुनिक अस्त्र क्षेपणास्त्र खरेदी करणार आहे. हवाई दल ७०० अस्त्र क्षेपणास्त्र खरेदी करणार आहे. ही क्षेपणास्त्र सुखोई, तेजस एलसीए या लढाऊ विमानांवर बसवली जातील.
अस्त्र हे BVR (बियाँड व्हिज्युअल रेंज) क्षेपणास्त्र आहे, हे नजरेच्या पलीकडील लक्ष्यांचे अचूक भेद करु शकते. हे विशेषतः शत्रूच्या रडार-आधारित टोळधाडी करणाऱ्या विमानांवर आणि फायटर जेट्सवर प्रभावी ठरण्यासाठी डिझाईन केले गेले आहे. भविष्यात पाकिस्तान-चीन या दुहेरी शत्रुच्या फायटर जेट्सचा सामना करावा लागेल त्या दृष्टीने भारताने हे क्षेपणास्त्र तयार केलं आहे. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी भारत आणि पाकिस्तानात मर्यादीत हवाई संघर्ष झालेला.
दूरूनच हवाई हल्ले केले
ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने पाकिस्तानी एअर बेस आणि दहशतवादी तळांवर लांबूनच हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी एअर फोर्सच मोठं नुकसान झालं होतं. त्यांची अनेक फायटर विमानं, अमेरिकी बनावटीच F-16, आणि चिनी जेट्स जमिनीवर, हवेतच नष्ट झाली होती. त्यांचे ड्रोन्स आणि हेरगिरी करणारी विमान दक्षिण पाकिस्तानात पडली.
पाकिस्तानकडे असलेले एअर टू एअर मिसाईल
पाकिस्तानने प्रत्युत्तर म्हणून हल्ला करताना PL-15 एअर टू एअर मिसाइल डागली होती. मात्र, त्यांना त्यात य़श मिळालं नाही. भारतीय वायुसेनेचं अस्त्र मार्क-1 अतिशय सक्षम आहे. नवे अस्त्र क्षेपणास्त्र प्रचंड प्रभावी आहे. यात अॅडव्हान्स गाइडेन्स व नेव्हिगेशन सिस्टिम बसवण्यात आली आहे. या अत्याधुनिक अस्त्र प्रकल्पात डीआरडीओच्या अनेक प्रयोगशाळांनी आणि ५० हून अधिक सार्वजनिक व खासगी कंपन्यांनी, त्यातही हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ने महत्त्वाचं योगदान दिलं आहे.
चीनकडून विकत घेतलेल्या मिसाइल्स
पाकिस्तानी एअर फोर्सकडे अस्त्र सारख्या क्षेपणास्त्रांची संख्या कमी आहे. त्यांच्या विमानातून डागण्याच्या क्षेपणास्त्रांची रेंज १२० ते १४५ किमी. पर्यंत आहे. तर अस्त्र मार्क-2 ची रेंज 200 किलोमीटर असल्याने भारताची मारक क्षमता वाढली आहे.