Wednesday, October 15, 2025

ई-केवायसीसाठी लाडक्या बहिणींसमोर अडचणींचा डोंगर!

ई-केवायसीसाठी लाडक्या बहिणींसमोर अडचणींचा डोंगर!

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थी महिलेला ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ई-केवायसीसाठी लाडक्या बहिणींसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. संकेतस्थळावर वारंवार एरर येत असून, ओटीपी येत नसल्याने लाडक्या बहिणींच्या अडचणीत वाढ झाली आहे.

ई-केवायसीच्या माध्यमातून पात्र लाभार्थी महिलांची राज्य सरकारने पडताळणी सुरू केली आहे. यासाठी राज्यभरातील लाखो महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी केली. आता केवायसीसाठी दोन महिन्यांची मुदत शासनाने दिली आहे. यात ई-केवायसी करण्यासाठी प्रत्येक स्तर सविस्तरपणे सांगितला जात आहे. मात्र, संकेतस्थळ सुरळीत चालत नसल्याच्या अनेक तक्रारी वाढल्या आहेत.

ई-केवायसीच्या संकेतस्थळावर क्लिक केल्यावर त्याला सुरू व्हायला खूप विलंब लागतो. कसेतरी सुरू झाले तर साईडवरून ओटीपी पाठविला असता मोबाइलवर ओटीपी येत नाही. त्यामुळे अनेक महिला तासनतास आपल्याजवळ मोबाइल घेऊन ओटीपीची वाट बघत बसतात. त्यामुळे लाडक्या बहिणींची गैरसोय होत आहे. अनावधानाने मोबाइलवर ओटीपी आला तर तो ओटीपी टाकायचा कुठे? हा प्रश्न निर्माण झाला आहे. ओटीपी टाकण्यासाठी संकेतस्थळावर बॉक्स उपलब्ध नाही. यामुळे लाडक्या बहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

महिलांना ई-केवायसी प्रक्रिया करण्यास विलंब लागत आहे. ई-केवायसी प्रक्रिया करताना ओटीपी येत नसल्याच्या तक्रारीही मोठ्या प्रमाणात समोर येत असून, या समस्या सोडवून ही प्रक्रिया सुलभ करावी आणि ई-केवायसीची तारीख वाढवावी, अशी मागणी लाडक्या बहिणींकडून केली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >