Wednesday, October 15, 2025

घाटकोपरमध्ये भरदिवसा दरोडा : सराफाच्या दुकानावर चाकूने हल्ला करून सोन्याची लूट, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण

घाटकोपरमध्ये भरदिवसा दरोडा : सराफाच्या दुकानावर चाकूने हल्ला करून सोन्याची लूट, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण

मुंबई : घाटकोपरमधील अमृत नगर परिसरात आज सकाळी (१५ ऑक्टोबर) घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. भरदिवसा, गर्दीच्या वेळी, ३ अज्ञात दरोडेखोरांनी 'दर्शन ज्वेलर्स'च्या दुकानावर हल्ला चढवला. त्यांनी दुकानात घुसून मालक दर्शन मेटकरी यांच्यावर चाकूने हल्ला करत गंभीर जखमी केलं आणि त्यानंतर दुकानातील दागिने लुटून पसार झाले.

ही धक्कादायक घटना सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास घडली. नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी आलेले दर्शन मेटकरी हे दुकानात कामकाज सुरू करत असताना दुचाकीवरून आलेल्या ३ व्यक्तींनी अचानक दुकानात प्रवेश केला. त्यांनी चाकूचा धाक दाखवून दुकानातील दागिने देण्याची धमकी दिली. मात्र मेटकरी यांनी धाडस दाखवून विरोध केल्याने आरोपींनी त्यांच्यावर चाकूने वार केले.

प्रत्यक्षदर्शींनुसार, या हल्ल्यानंतर दरोडेखोरांनी हवेत गोळीबार करून परिसरात दहशत पसरवली आणि दागिने घेऊन फरार झाले. या सगळ्या प्रकारामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. व्यापाऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे, विशेषतः दिवाळीच्या तोंडावर अशा प्रकारच्या घटनेमुळे सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

जखमी दर्शन मेटकरी यांना तत्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. घाटकोपर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सहा विशेष तपास पथकं तयार करून परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.

घटनेनंतर अपर पोलीस आयुक्त, डीसीपी, आणि गुन्हे शाखेचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली आणि स्थानिक नागरिक व साक्षीदारांकडून माहिती गोळा केली. पोलीस अधिकारी म्हणाले की, "ही घटना अत्यंत गंभीर असून आरोपी लवकरात लवकर पकडले जातील. आम्ही ठोस पुरावे गोळा करत आहोत आणि लवकरच आरोपींना अटक केली जाईल."

ही घटना दिवाळीसारख्या मोठ्या सणाच्या तोंडावर घडल्यामुळे व्यापारी वर्गात मोठा असंतोष आणि असुरक्षिततेची भावना आहे. स्थानिक व्यापाऱ्यांनी पोलिसांकडे सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे.

मुंबईसारख्या शहरात भरदिवसा सराफाच्या दुकानावर चाकू आणि गोळीबारासह लूट होणं ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. पोलीस आता या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा