मायभाषा : डॉ. वीणा सानेकर
अनुवाद हा विषय भाषिक आदान-प्रदानाशी अत्यंत जवळचा विषय आहे.
भारत हा या अर्थाने अतिशय समृद्ध देश आहे. लोककथांपासून परीकथांपर्यंत आणि कवितांपासून नाटक कादंबरीपर्यंत प्रत्येक भाषेत अतिशय समृद्ध असे संचित आहे.
एका भाषेतली कलाकृती दुसऱ्या भाषेत अनुवादित होणे हा व्यापक अर्थाने वाड्.मयीन परंपरा समृद्ध होण्याचा भाग आहे. आमच्या सोमैया विद्याविहार विद्यापीठात नुकतेच ‘सामाजिक, सांस्कृतिक परिप्रेक्ष्यातून अनुवादाचे महत्त्व - या विषयावरील चर्चसत्राचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने मराठीतील विविध अनुवादकांशी सुसंवादाचा योग आला.
अनुवादक एखाद्या कलाकृतीतले सारे दुसऱ्या भाषेत आणायचा प्रयत्न करीत असला तरी त्याला सगळे काही पकडता येत नाही. कारण प्रत्येक भाषेतील शब्दांना त्या त्या मातीतील संस्कृतीचे संदर्भ असतात. डॉ. माया पंडित यांनी त्यांच्या बीजभाषणात ‘आखाडसासू’ या शब्दाचे समर्पक उदाहरण दिले.
कन्नड आणि मराठी भाषेत खूप जवळचे नाते आहे. डॉ. शोभा नाईक यांनी या चर्चसत्रात एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. मराठीतला स्त्रीवाद कन्नड भाषिकांना फारसा पटत नाही, पण स्त्रियांच्या जगण्यातले विचारातले परिवर्तन कन्नड साहित्यात यायचे थांबले आहे काय ?
खूप दिवसांपूर्वी मी केलेल्या मीना कुमारीच्या कवितांच्या अनुवादाची मला आठवण झाली. अभिनेत्री म्हणून सर्वपरिचित असलेल्या या स्त्रीने आपल्या वेदनांना तिच्या कवितांतून वाट मोकळी करून दिली आहे. आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी यांच्या आत्मकथनाचा काही भाग मी पूर्वी अनुवादित केला होता. त्यातील राधेश्यामी विधवांचे दुःख वाचताना अंगावर काटा उभा राहिला.
अमृता प्रीतमच्या कवितांचा अनुवाद करणे सोपे नाही. त्यातली आदिम काळापासूनचे स्री-पुरुषांचे नाते करणारी मालिका पुन्हा पुन्हा आठवते आहे. चर्चासत्रातील एका सत्रात प्रफुल्ल शिलेदारांकडून हिंदीचे विविध संदर्भ ऐकताना सर्वेश्वरदयाल सक्सेना, कुमार अंबुज, निर्मला पुतूल यांच्या कवितांचे मी केलेले मराठी अनुवादआठवत राहिले.
चर्चासत्रातील उत्तरार्धाच्या भागात आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राचा बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार अभिजित रणदिवे यांना दिला गेला. त्यांची मुलाखत ऐकताना एखाद्या परकीय भाषेतील पुस्तकाचा अनुवाद आपल्या भाषेतून करताना दोन्ही भाषांची लय कशी सांभाळावी लागते, हे नेमकेपणाने जाणवले.
कवयित्री नीरजा यांच्या सहकार्यशील प्रतिसादामुळे आमचे सोमैया विद्यापीठ आणि आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्र या दोन संस्था एकत्र येऊ शकल्या. असा सुसंवादही मराठी इतकीच सर्व भाषांची
गरज आहे.