Tuesday, October 14, 2025

पुणे मनपासाठी भाजपचे 'टार्गेट १२५'

पुणे मनपासाठी भाजपचे 'टार्गेट १२५'

पुणे महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचेनंतर अंतिम प्रभाग रचनेतही भाजपचा वरचष्मा राहिला आहे. अंतिम प्रभाग रचनेतील बदलही भाजपसाठी अनुकूल ठरणार असल्याचे बोलले जात असल्याने भाजपचे आता १०० नगरसेवकांचे टार्गेट वाढवून आता १२५ नगरसेवक निवडून आणण्याचे नियोजन आहे. १२५ नगरसेवक निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून काही प्रभागांमधून भाजपमध्ये इनकमिंगही जोरात होणार असल्याची चर्चा आहे.

मनासारख्या प्रभाग रचना झाल्याने भाजपला आत्मविश्वास निर्माण झाला आहे. प्रभाग रचना अनुकूल झाल्याने भाजपने आता १०० चा आकडा न ठेवता आपला आकडा वाढवला असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपने १२५चा आकडा गाठण्यासाठी काही प्रभागांमधून मातब्बर असे मोहरे निवडले असून निवडणुकीपूर्वीच त्यांचा पक्षप्रवेशही घडवून आणणार असल्याचे बोलले जात आहे. महापालिका निवडुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग होणार आहे. मात्र या इनकमिंगमुळे पक्षामध्ये नाराजीचे वातावरण पसरले असल्याचे पाहायला मिळत आहे. निष्ठावंतांना संधी द्या अशी मागणी होताना दिसत आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक पुण्यामध्ये घेतली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने इनकमिंगबाबत चर्चा करण्यात आली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या पुण्यातील पश्चिम महाराष्ट्राच्या बैठकीवर भाजपकडून महापालिका निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांचा आणि भाजपामध्ये प्रवेश करू इच्छिणाऱ्या इतर पक्षातील नेत्यांचं बारीक लक्ष होतं. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या या बैठकीमध्ये भाजप इच्छुक आणि प्रवेशासाठी वेटिंगवर असलेल्या नेत्यांचं भवितव्य ठरणार होतं.

शहरात ज्या जागा कठीण आहेत. त्या ठिकाणी इतर पक्षातील सक्षम कार्यकर्त्यांना पक्षांमध्ये सामावून घेता येईल, असं देखील सांगितलं आहे. एक प्रकारे गेल्या अनेक दिवसांपासून भाजपमध्ये प्रवेशासाठी वेटिंगवर असलेल्या प्रवेश इच्छुकांना याद्वारे भाजपाच्या वरिष्ठांनी फडणवीस यांच्या माध्यमातून ग्रीन सिग्नलच मिळून दिले असल्याच्या देखील चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. या सगळ्या गोष्टींमुळे भाजपमधील निष्ठावंत कार्यकर्ते जे अनेक वर्षांपासून उमेदवारीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्यामध्ये मात्र नाराजी पसरली आहे. वरिष्ठांनी निष्ठावंतांना संधी द्यावी अशी भूमिका मुख्यमंत्र्यांना समोर घेतील आणि फडणवीस देखील त्याला दुजोरा देतील अशीच काहीशी अपेक्षा घेऊन बसलेल्या भाजप इच्छुकांचा मात्र अपेक्षाभंग झाला असल्याचं दिसून येत आहे. युतीचा निर्णय स्थानिक पातळीवर सोपवण्यात आल्याने पुण्यात भाजप हे स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीही १२५ उमेदवार निश्चित निवडून येतील असे स्पष्ट करताना युती नको असेच संकेत दिले आहेत. २०१७ मध्ये भाजपने ९७ जागा पटकावत एकहाती महापालिकेची सत्ता मिळवली होती.

या निवडणुकीत राष्ट्रवादीने ४०, शिवसेनेने १०, काँग्रेसने ११, मनसेने २ जागा पटकावल्या होत्या. या खेपेला शतप्रतिशत यश मिळवण्यासाठी भाजपने आत्तापासून कंबर कसली आहे. याशिवाय २०१७ मध्ये १५ ते २० नगरसेवक २०० पेक्षाही कमी मतांनी पराभूत झाले होते. त्यातच काहीजण पक्षात येण्यासाठी तयार असल्याचे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थीतीत सध्याच्या १६५ जागांमध्ये युती शक्य नसल्याचेही म्हटले जात आहेत. आता पाच नगरसेवक हे शिवसेनेतून भाजपमध्ये आले आहेत, तर काँग्रेसचेही काही नगरसेवक हे भाजपमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे भाजपची निवडणूक जिंकून महापालिका ताब्यात ठेवण्याची तयारी पाहता भाजपचे पुण्यात ‘एकला चलो रे’ची भूमिका स्पष्ट आहे. महापालिका निवडणुका तोंडावर आल्याने भाजपमध्ये इतर पक्षांचे अनेक माजी नगरसेवक येण्याकरिता इच्छुक आहेत. यामुळे पक्षात नाराजीही आहे. भाजपमध्ये कोणताही मोठा कार्यकर्ता आला, की त्याला पक्षात घेण्याची तयारी असते. त्यामुळेच पक्ष मोठा झाला आहे. त्यावेळीच नाराजीही मोठ्या प्रमाणात निर्माण होते. त्याठिकाणी कार्यकर्त्यांना समजावले जाते. त्यामुळे आगामी काळात भाजपमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इनकमिंग होणार असल्याचे स्पष्ट संकेतही दिले गेले आहेत.

प्रभाग रचना हवी तशी करून भाजपने पहिली लढाई जिंकल्याचे पाहायला मिळते. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. पुणे मेट्रो, सिंहगड रोड उड्डाणपूल यांसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्पही मार्गी लागले आहे. त्याचा लाभ उठविण्यासाठी भाजपवाले पुढे सरसावले आहेत. केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील, माधुरी मिसाळ, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांच्यासह अन्य नेत्यांनी फ्रंटवर राहून पुणे शहराच्या विकासावर लक्ष्य केंद्रित केले आहे. विकासकामांचा धडाका लावून शहर भाजपमय करण्याचा विडाच पक्षाने उचलला आहे. वॉर्डावॉर्डात वेगवेगळ्या योजना, उपक्रम राबवले जात आहेत. मुख्य म्हणजे पक्षाला सध्या कशाची कुठलीच कमी नाही. त्यामुळं मुक्तहस्ते नेते, कार्यकर्ते कार्य करताना दिसतात. पुणे शहरात रा. स्व. संघाचे वलय मोठे आहे. लोकसभा, विधानसभेप्रमाणे पालिका निवडणुकीतही संघाच्या नेटवर्कचा फायदा करून घेण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. शहरात ब्राह्मण समाजाची लोकसंख्याही लक्षणीय आहे. त्याचबरोबर ओबीसी समाजही मोठ्या प्रमाणात आहे. ब्राह्मण समाजाप्रमाणे ओबीसी समाजबांधवही आता भाजपशी घट्टपणे जोडले गेले आहेत. त्यामुळे पालिका निवडणुकीतही या समीकरणाचा पक्षाला फायदा होण्याची चिन्हं आहेत. काही मतदारसंघांवर निश्चितपणे विरोधी पक्षांचा प्रभाव आहे. मात्र, हे पक्ष एकत्रित नसल्यानं भाजपची लढाई सोपी होऊ शकते.

अजितदादांच्या राष्ट्रवादीचंही पुण्यात चांगलं जाळं आहे. काही भागात शरद पवार यांची राष्ट्रवादीही पॉवरफुल्ल आहे. पण, प्रभाग रचना व स्ट्रॅटजीतून राष्ट्रवादीसह काँग्रेस व ठाकरे सेनेला रोखण्याचा प्लॅन भाजपनं राबवला आहे. शिंदे गटासाठी काही ठिकाणी अनुकूल स्थिती दिसते. पण, भाजप त्यांच्यासोबत युती करणार का, हा प्रश्नच आहे. पुण्यात भाजपचं स्वत:च वर्चस्व आहे. त्यामुळं स्वबळावर लढून शंभरावर जागा जिंकण्याचा त्यांचा प्लॅन असेल.

Comments
Add Comment