Tuesday, October 14, 2025

येसूबाई' फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड तुळजापुरात

येसूबाई' फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड तुळजापुरात

धाराशिव : 'स्वराज्यरक्षक संभाजी' या लोकप्रिय मराठी मालिकेतील महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध सिनेअभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी आज महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी विधिवत पूजा-अर्चा करत नुकसानीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी आईच्या चरणी प्रार्थना केली.

गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा आणि विशेषतः धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि जमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर प्राजक्ता गायकवाड यांनी शेतकऱ्यांप्रति आपली सहानुभूती व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “या कठीण काळात आपण सर्वांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी आर्थिक आणि मानसिक आधार बनून उभे राहिले पाहिजे. तसेच शेतकऱ्यांनीही खचून न जाता नव्या उमेदीने पुन्हा कामाला लागावे.”
 
View this post on Instagram
 

A post shared by Prajakta Gaikwad (@prajaktaa.gaikwad)

आई तुळजाभवानीकडे साकडे घालताना त्या भावूक झाल्या. त्यांनी प्रार्थना केली की, “आई, माझ्या बळीराजावर पुन्हा अशी पूरस्थिती येऊ देऊ नकोस. हे सर्व शेतकरी तुझीच लेकरं आहेत, त्यांच्या दुःखाचा अंत कर आणि त्यांना या महासंकटातून बाहेर पडण्याची शक्ती दे.” यावेळी मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मंदिर संस्थानच्या वतीने महंत वाकोजी बुवा, यांनी प्राजक्ता गायकवाड यांचे स्वागत केले. त्यांना देवीचे प्रसादरूप वस्त्र आणि श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.

  “शेतकरी हेच या मातीतले खरे नायक आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलावा, हीच माझी आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
Comments
Add Comment