Tuesday, October 14, 2025

"हे लज्जास्पद आहे" : गौतम गंभीरने हर्षित राणाच्या टीकेवर फटकारलं

मुंबई : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झालेल्या वेगवान गोलंदाज हर्षित राणा याच्या निवडीवर सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. काही माजी खेळाडूंनी आणि क्रिकेट तज्ज्ञांनी त्याच्या निवडीवर टीका केली असून, काहींनी तर थेट आरोप केला आहे की, गौतम गंभीरच्या शिफारशीमुळेच त्याला संधी मिळाली आहे.

विशेषतः माजी कर्णधार के. श्रीकांतने त्याच्या यूट्यूब चॅनलवर हर्षितच्या निवडीवर संशय व्यक्त केला होता. यावर प्रतिक्रिया देताना टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर पत्रकार परिषदेत संतापला.

"एक २३ वर्षांच्या मुलावर अशा प्रकारे टीका करणे लाजिरवाणे आहे" गंभीरने स्पष्टपणे सांगितले की, "एका तरुण खेळाडूला वैयक्तिकरित्या लक्ष्य करणे हे चुकीचे आहे. सोशल मीडियावर असे ट्रोलिंग त्याच्या मानसिकतेवर वाईट परिणाम करू शकते. हर्षित कुठल्याही प्रभावाशिवाय, केवळ आपल्या मेहनतीच्या जोरावर इथपर्यंत पोहोचला आहे. त्याचे वडील कोणते माजी खेळाडू किंवा क्रिकेट बोर्डाचे अधिकारी नाहीत. त्यामुळे केवळ आपला यूट्यूब चॅनल चालवण्यासाठी असे आरोप करणं अयोग्य आहे."

"टीका करा, पण कामगिरीवर; खेळाडूच्या वैयक्तिक आयुष्यावर नाही" गंभीर म्हणाला की, "जर टीका करायचीच असेल, तर ती खेळाडूच्या कामगिरीवर असावी. कोणाच्या पाठिंब्यावर तो संघात आला, अशा मुद्द्यांवर नव्हे. तुम्ही मला टीका करा, मी सांभाळून घेईन. पण एक २३ वर्षांचा मुलगा अशा गोष्टी सहज पचवू शकत नाही."

ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या आगामी वनडे आणि टी-२० मालिकेसाठी हर्षित राणाची पुन्हा निवड झाल्यानंतर काही चाहत्यांनी आणि टीकाकारांनी ही निवड चुकीची असल्याचे म्हटले. इंग्लंड दौऱ्यावर हर्षितची कामगिरी ठोस नव्हती, आणि त्यानंतरही त्याला संधी दिल्याने निवड समितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

गंभीरने अप्रत्यक्षपणे श्रीकांतला दिले उत्तर यावर बोलताना गंभीरने कोणाचेही नाव न घेता श्रीकांत यांना टोला लगावला. तो म्हणाला, "आपण सर्वांनी भारतीय क्रिकेटसाठी नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे. खेळाडूंवर प्रश्न विचारायचे असतील, तर त्याच्या खेळावर विचारा – वैयक्तिकरित्या त्याला लक्ष्य करून नाही."

रोहित आणि कोहलीच्या भविष्यावरही गंभीरचं विधान ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचंही पुनरागमन होणार आहे. त्यांच्या 2027 च्या विश्वचषक योजनेत स्थान असेल का, या प्रश्नावर गंभीरने स्पष्ट केलं की, "आत्ता वर्तमानावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. दोघंही अनुभवी आणि दर्जेदार खेळाडू आहेत. मला खात्री आहे की, ते यशस्वी ठरतील."

थोडक्यात, हर्षित राणाच्या निवडीवरून निर्माण झालेला वाद सध्या चांगलाच गाजत असून, गंभीरने स्पष्ट केलं आहे की, वैयक्तिक आरोप न करता खेळाडूंच्या कामगिरीवर चर्चा व्हायला हवी. त्याने स्पष्ट शब्दात सोशल मीडियावरील ट्रोलिंग आणि असंवेदनशील टीकेवर नाराजी व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment