अँटानानारिवो : नेपाळनंतर आता आफ्रिकन देश मादागास्करमध्ये जेन-जी च्या उग्र आंदोलनाने वातावरण ढवळून निघाले आहे. या आंदोलनामुळे परिस्थिती इतकी बिघडली की मादागास्करचे राष्ट्रपती अँड्री राजोइलिना यांनी देश सोडून पलायन केले. त्यांनी सांगितले की, लष्करी बंडखोरीनंतर त्यांचा जीव धोक्यात होता आणि म्हणूनच त्यांनी देश सोडला.
राजोइलिना यांनी देश सोडल्यानंतर एका अज्ञात स्थळाहून राष्ट्रीय दूरदर्शनवरून देशवासीयांना संबोधित केलं. देशात निर्माण झालेल्या अराजकतेच्या पार्श्वभूमीवर, त्यांनी म्हटलं, “हिंद महासागरातील या बेटावर सत्ता बळकावण्याचा एक बेकायदेशीर प्रयत्न केला जात आहे.” राष्ट्रपतींनी मध्यरात्री दिलेल्या भाषणात सांगितले, “माझ्या जीवाचे रक्षण करण्यासाठी सुरक्षित स्थळी जाणे माझ्यासाठी भाग पडले.” लष्करी युनिट ‘कॅपसॅट’ च्या बंडखोरीच्या प्रयत्नांनंतर आणि राजधानी अंतानानारिवोच्या मुख्य चौकात हजारो निदर्शकांसोबत झालेल्या रॅलीनंतर, ही राष्ट्रपतींची पहिली सार्वजनिक प्रतिक्रिया होती.
राष्ट्रपती अँड्री राजोइलिना यांनी आपल्या भाषणात राजीनामा देण्याचा उल्लेख केलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून देशात सरकारविरोधी जेन-जी चं आंदोलन सुरू आहे. जेव्हा शनिवारी लष्कराचा काही भाग आंदोलनात सामील झाला आणि या दरम्यान, लष्करी कर्मचाऱ्यांनी देखील राष्ट्रपती आणि मंत्र्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. त्यावेळी परिस्थिती अधिक गंभीर झाली.
राष्ट्रपतींनी या गंभीर परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी संवादाचा मार्ग स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांनी सांगितले की, घटनाबद्ध मार्गाचा सन्मान केला गेला पाहिजे. मात्र राष्ट्रपतींनी हे उघड केलेले नाही की ते देशातून कसे बाहेर गेले किंवा सध्या कुठे आहेत. मात्र एका वृत्तानुसार, त्यांना फ्रान्सच्या लष्करी विमानातून देशाबाहेर नेले गेले. दुसरीकडे, फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
मादागास्कर पूर्वी फ्रान्सचा वसाहतवादाचा भाग होता आणि राजोइलिना यांच्याकडे कथितपणे फ्रेंच नागरिकत्व आहे, यामुळे अनेक नागरिकांमध्ये असंतोष होता. सरकारविरोधी आंदोलन २५ सप्टेंबर रोजी पाणी आणि वीज पुरवठ्यातील वारंवार खंडिततेविरोधात सुरू झाले होते.