Tuesday, October 14, 2025

मुंबई दिवाळीच्या सणापूर्वीच अधिक स्वच्छ राखण्यावर महापालिकेचा भर, बुधवारपासून असा घेतला हाती उपक्रम

मुंबई दिवाळीच्या सणापूर्वीच अधिक स्वच्छ राखण्यावर महापालिकेचा भर, बुधवारपासून असा घेतला हाती उपक्रम

मुंबई (खास प्रतिनिधी) : दिवाळीचा सण आला की आपण घरातील जळमटे काढून घरात स्वच्छता करतो, नको असलेल्या वस्तू फेकून देता आणि रंगरंगोटी करून दिवाळीच्या सणाचे स्वागत करत असतो. त्याप्रमाणे दिवाळीच्या सणात मुंबईची स्वच्छता हाती घेतली जाणार आहे. दिवाळीच्या सणाचे औचित्य साधून या सणापूर्वीच मुंबई शहर आणि उपनगरातील सर्व प्रमुख व अंतर्गत रस्ते, दुभाजक, पदपथ यासह बाजारपेठ परिसरांमध्ये संपूर्ण स्वच्छता करण्याच्या अनुषंगाने महानगरपालिकेकडून दिनांक १५ ते १९ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत दिवाळीपूर्व विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व परिमंडळांचे उपायुक्त तसेच सर्व प्रशासकीय विभाग स्तरावरील सहायक आयुक्त यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात अधिक दक्षतेने स्वच्छता मोहीम राबवावी. तसेच, कर्मचारी-अधिकाऱ्यांसोबतच नागरिकांनाही या स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले आहेत.

मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात, उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्या देखरेखीखाली ‘स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई’ हा ध्यास घेऊन विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर, मुंबईत व्यापक स्वच्छतेच्या अनुषंगाने वेळोवेळी विशेष स्वच्छता मोहीम राबविली जात आहेत.

येत्या१५ ते १९ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत दिवाळीपूर्व विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. दिवसाच्या दुसऱ्या सत्रात स्वच्छतेसाठी नेमण्यात आलेल्या ‘पिंक आर्मी’च्या सहाय्याने ही मोहीम सायंकाळी व रात्रीच्या वेळेत राबविण्यात येईल. यामध्ये प्रामुख्याने सर्व प्रमुख व अंतर्गत रस्ते, दुभाजक, पदपथ, चौक व बाजारपेठ परिसरांची संपूर्ण स्वच्छता केली जाईल. या अंतर्गत रस्ते तसेच गल्लीबोळातील कचरा, माती, राडारोडा आदी संकलित करुन त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात येईल.

येत्या शनिवारपासून दिवाळी सणाला प्रारंभ होत आहे. त्यामुळे, सण साजरा करण्याच्या उत्साहासोबतच मुंबईतील सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ आणि नीटनेटकी राहावीत, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी महानगरपालिकेच्या वतीने ‘पिंक आर्मी’चा सहभाग, वाढीव मनुष्यबळ आणि आवश्यक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध परिमंडळांचे उपायुक्त तसेच सर्व प्रशासकीय विभाग स्तरावरील सहायक आयुक्त यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात अधिक दक्षतेने आणि स्वच्छता मोहीम राबवावी, असे निर्देशही दिले आहेत. - डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, महापालिका अतिरिक्त आयुक्त (शहर)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >