Tuesday, October 14, 2025

मुंबईतील राडारोडा प्रक्रिया केंद्राला अल्प प्रतिसाद, प्रशासनासमोर ही आव्हाने

मुंबईतील राडारोडा प्रक्रिया केंद्राला अल्प प्रतिसाद, प्रशासनासमोर ही आव्हाने

मुंबई (सचिन धानजी) : मुंबईत घरगुती व लहान स्तरावर निर्माण होणारा राडारोडा (डेब्रीज) संकलित करणे, वाहून नेणे व त्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करणे, यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प विभागाच्या माध्यमातून दहिसर आणि शीळफाटा या दोन ठिकाणी राडारोडा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आले आहेत. या दोन्ही प्रक्रिया प्रकल्पांमध्ये प्रतिदिन १२०० मेट्रीक टन डेब्रीजची क्षमता असली तरी वर्ष उलटत येत असतानाचही या हे टार्गेट पूर्ण होताना दिसत नाही. दोन्ही प्रकल्पांमध्ये दिवसाला केवळ ५०० ते ६०० मेट्रीक टन डेब्रीजच उपलब्ध होत असल्याने महापालिकेची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे मुंबईत बांधकामे जोरात असून मोठ्याप्रमाणात जुन्या इमारतींसह इतर बांधकामे तोडली जात असतानाही या प्रकल्पांमध्ये हा राडारोडा येत नाही का असा सवाल उपस्थित होत आहे.

मुंबईतील घरगुती स्तरावरील बांधकाम आणि पाडकाम यातून निर्माण होणारा राडारोडा (डेब्रीज) उचलून वाहून नेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून ‘डेब्रीज ऑन कॉल’ ही सेवा सन २०१४ पासून पुरवली आहे . रस्त्यावर तसेच इतरत्र टाकून देण्यात येणारे डेब्रीजचे प्रकार टाळण्यासाठी सुरु केलेली ही सेवा सुरु केली आहे. यासाठी महापालिकेने मुंबई शहर (कुलाबा ते शीव) व पूर्व उपनगरांसाठी (कुर्ला ते मुलूंड) मेसर्स मेट्रो वेस्ट हॅण्डलिंग प्रा. लि. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा प्रकल्प हा शिळफाटा, डायघर गाव येथे पाच एकर जागेवर हा प्रकल्प आहे. या प्रकल्पाची प्रक्रिया क्षमता ६०० टन प्रति दिन एवढी आहे.

तर पश्चिम उपनगरांसाठी (वांद्रे ते दहिसर) मेसर्स एजी एनव्हायरो इन्फ्रा प्रा. लि. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा प्रकल्प हा दहिसर कोकणीपाडा येथे पाच एकर जागेवर आहे. या प्रकल्पाची प्रक्रिया क्षमता ६०० टन प्रतिदिन एवढी आहे. त्यामुळे दोन्ही कंत्राटदारांची एकत्रित सेवा ही प्रतिदिन १२०० टन डेब्रीजवर प्रक्रिया करण्याची असून महाराष्ट्रातील सर्वात मोठा असा हा राडारोडा प्रक्रिया प्रकल्प आहे.

मुंबईतील सर्व बांधकामांचा राडारोडा हा दरदिवशी १२०० मेट्रीक टन एवढा उपलब्ध होणे आवश्यक असतानाही प्रत्यक्षात या प्रकल्पाला अल्प प्रतिसाद लाभत आहे. सध्या या दोन्ही प्रकल्पांमध्ये मिळून दिवसाला केवळ ५०० ते ६०० मेट्रीक टन राडारोड्यावरच प्रक्रिया केली जात आहे. या प्रकल्पाला अधिक गती मिळावी आणि मुंबईतील सर्व राडारोड्याची विल्हेवाट लावली जावी म्हणून महापालिकेने ‘डेब्रीज ऑन कॉल’ ही सेवा सुरु केली. महानगरपालिकेने मुंबई शहर व पूर्व उपनगरांसाठी १८००-२०२-६३६४ आणि पश्चिम उपनगरांसाठी १८००-२१०-९९७६ हा टोल फ्री क्रमांक सकाळी ८.०० ते सायंकाळी ८.०० या वेळेत उपलब्ध करुन दिले. तसेच, 'मायबीएमसी' मोबाईल ऍपच्या माध्यमातून ऑनलाईन पर्याय कार्यान्वित देत ही सेवा २४ तास उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केल्यानंतरही मुंबईतील राडारोडा प्रक्रिया केंद्रात काही डेब्रीज उपलब्ध होत नाही. त्यामुळे या प्रकल्पाला गती देण्यासाठी महापालिका प्रशासनाला आता कडक पावले उचलावी लागणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >