Tuesday, October 14, 2025

सिंधुदुर्गात एसटी बसच्या संख्या वाढवा

सिंधुदुर्गात एसटी बसच्या संख्या वाढवा

मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाच्या पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करावे. जिल्ह्याच्या भौगोलिक विस्ताराचा विचार करून त्या प्रमाणात बसेस देऊन परिवहन सेवा सक्षम करावी, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

मंत्रालयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एस. टी. महामंडळाशी सबंधित विविध विषयांबाबत बैठक झाली. त्यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक बोलत होते. बैठकीस आमदार निलेश राणे, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, वेंगुर्ला आणि कुडाळ आगाराला पाच बसेस देण्यात याव्यात. ओरोस येथील प्रवासी संख्या व शासकीय कार्यालये लक्षात घेता बस स्थानकाचा विस्तार करावा. बस स्थानकाचा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) तत्त्वावर विकास करून प्रशस्त बसस्थानकाची निर्मिती करावी.

कार्यरत कर्मचारी संख्या आणि बसेसची संख्या लक्षात घेऊन नियोजन करावे. कर्मचाऱ्यांअभावी बसेस थांबून प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विभागीय नियंत्रक रिक्त पदावर अधिकारी देण्यात यावा, असे निर्देशही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

Comments
Add Comment