सध्या जागतिक हवामानबदलाची चर्चा सुरू आहे, मात्र यानंतर हिमयुग अवतरण्याची शक्यता आहे. अलीकडेच कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या संशोधकांनी पृथ्वीच्या नैसर्गिक कार्बनचक्रातील एक मोठी त्रुटी शोधून काढली. ही त्रुटी पृथ्वीच्या तापमानात असामान्य बदल कसे होऊ शकतात आणि दीर्घकालीन जागतिक तापमानवाढीनंतर हिमयुगासारखे अत्यंत थंडीचे युग कसे येऊ शकते, हे स्पष्ट करण्यास मदत करते.
पृथ्वीचे तापमान प्रामुख्याने खडकांच्या नैसर्गिक क्षरणामुळे नियंत्रित होते. या प्रक्रियेत पाऊस वातावरणातून कार्बन डायऑक्साइड शोषून घेतो. पावसामुळे तो खडकात मिसळतो. खडक हळूहळू विरघळतात आणि कार्बन आणि कॅल्शियमच्या रूपात समुद्रात पोहोचतात. समुद्रात हे कार्बन साठे एकत्र होऊन शंख, कोरल आणि चुनखडीचे खडक तयार होतात. त्यामुळे समुद्राच्या तळावरील कार्बन दीर्घकाळ स्थिर राहतो. शास्त्रज्ञांनी या कार्बनचक्राचा एक नवीन पैलू शोधला आहे. तो पृथ्वीला अत्यंत थंड वातावरणाकडे ढकलू शकतो. पृथ्वी गरम होताना खडकांची झीज वेगाने होते. त्यामुळे जास्त कार्बन डायऑक्साइड शोषले जाते आणि वातावरणातून ते बाहेर पडते. यामुळे पृथ्वी थंड होते. संशोधकांनी म्हटले आहे, की पृथ्वी गरम होताना खडक कार्बन जलद शोषून घेतात आणि पुन्हा थंड करतात. जुने भूगर्भीय पुरावे दर्शवतात, की पृथ्वीचे सुरुवातीचे हिमयुग इतके तीव्र होते की संपूर्ण ग्रह बर्फाने झाकलेले होते. संशोधकांना आढळून आले आहे, की समुद्रातला कार्बनसंचयदेखील या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतो.
वातावरणातील कार्बन डायऑक्साइड वाढत असताना आणि पृथ्वी गरम होत असताना फॉस्फरससारखे अधिक पोषक घटक समुद्रात जातात. हे पोषक घटक प्लॅक्टनच्या वाढीस चालना देतात. प्लॅक्टन सूर्यप्रकाशाच्या मदतीने कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात. प्लॅक्टन मरतात, तेव्हा त्यांचे शरीर कार्बनसह समुद्राच्या तळाशी पडते आणि कार्बन कायमचा साठवला जातो; पण उष्ण, पोषकतत्त्वांनी समृद्ध महासागरांमध्ये ऑक्सिजनची पातळी कमी होते. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे समुद्राच्या तळाशी जमा होण्याऐवजी फॉस्फरसचा समुद्रात पुनर्वापर केला जातो. अधिक पोषक तत्त्वे, अधिक प्लॅक्टन, अधिक कार्बन संचय, अधिक थंड होणे ही प्रक्रिया हळूहळू संतुलित होण्याऐवजी पृथ्वीला अत्यंत थंड होण्यास कारणीभूत ठरू शकते. या प्रक्रियेचे स्पष्टीकरण देताना संशोधक सांगतात की, तुम्ही आपल्या घरात एअर कंडिशनर (एसी) चालू करून तापमान २५ अंश सेल्सिअसवर ठेवू इच्छिता. बाहेरील तापमान वाढल्यास एसी अधिक थंडी निर्माण करतो. काही प्रकरणांमध्ये ही थंडी जास्त असू शकते.
त्याचप्रमाणे पृथ्वीचा थर्मोस्टॅट कधी कधी जास्त थंडी निर्माण करतो. संशोधनात असेही आढळून आले आहे, की प्राचीन काळात वातावरणातील ऑक्सिजनची पातळी खूपच कमी होती. त्यामुळे हे थर्मोस्टॅट आणखी अनियमित आणि अस्थिर बनले. म्हणूनच मागील हिमयुग इतके तीव्र होते. आज उच्च ऑक्सिजन पातळी बदलाचा परिणाम कमकुवत करेल; परंतु तरीही पुढील हिमयुगाच्या प्रारंभास काही प्रमाणात विलंब होऊ शकतो. याचा अर्थ असा आहे का, की मानववंशीय जागतिक तापमानवाढीनंतर पृथ्वी पुढील हिमयुगात प्रवेश करू शकतात? याबाबत संशोधकांचे म्हणणे हो असे आहे; परंतु ते लवकर होणार नाही. त्यांचे मॉडेल असे सूचित करते, की जास्तीत जास्त थंडी असा परिणाम नक्कीच निर्माण करेल; परंतु सध्याचे हवामान संकट कमी करण्यासाठी हे पुरेसे नाही. संशोधन पत्रात म्हटले आहे, की पुढील हिमयुग पन्नास हजार वर्षांमध्ये सुरू होईल की दोन लाख वर्षांमध्ये हा खरा प्रश्न आहे. पृथ्वीचे नैसर्गिक थर्मोस्टॅट या आयुष्यात आपल्याला मदत करू शकत नाही.
या संशोधनातून स्पष्ट होते, की पृथ्वीवरील नैसर्गिक प्रक्रिया गुंतागुंतीच्या आहेत. जागतिक तापमानवाढीच्या सध्याच्या युगात आपल्या क्रियाकलापांवर आणि कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण ठेवणे आपल्यासाठी अत्यावश्यक आहे. नैसर्गिक प्रणाली अखेरीस ग्रह थंड करतील; परंतु ही प्रक्रिया खूप मंद आहे आणि त्याचे परिणाम आपल्या आयुष्यात जाणवणार नाही. म्हणूनच सतत प्रयत्न आणि जागरूकता ही आजची सर्वात तातडीची
गरज आहे.
शास्त्रज्ञांचा विश्वास आहे, की आपल्याला अजूनही आपल्या उत्सर्जनावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. हे खरे आहे, की उष्ण झालेली पृथ्वी पुन्हा कधी तरी थंड होईल; परंतु ती इतकी मंद असेल, की या पिढीला त्याचा काहीही उपयोग होणार नाही. म्हणून आपल्याला आजच कृती करण्याची गरज आहे, कार्बन उत्सर्जन कमी करणे, पर्यावरणपूरक वातावरण निर्माण करणे आणि शाश्वत ऊर्जास्रोतांकडे वाटचाल करणे. जागतिक तापमानवाढ उलटवल्याने थेट हिमयुग सुरू होण्याची शक्यता नाही. त्याऐवजी, पृथ्वीचे नैसर्गिक चक्र आणि हरितगृह परिणाम पुढील हिमयुग सुरू होण्यास विलंब करू शकतात, जे पुढील दहा हजार ते एक लाख वर्षांमध्ये अपेक्षित आहे. काही सिद्धांत सूचित करतात, की जागतिक तापमानवाढ समुद्राच्या प्रवाहांना, विशेषतः गल्फ स्ट्रीमला विस्कळीत करून हिमयुग सुरू करू शकते. त्यामुळे युरोपमध्ये नाट्यमय थंडी पडते.
कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन ताबडतोब थांबले, तरी सध्याच्या जागतिक तापमानवाढीचे आणि महासागरातील बदलांचे परिणाम पुढील हजार वर्षांमध्ये अपरिवर्तनीय असतील. आपल्या आयुष्यात हिमयुग सुरू होणे अशक्य होईल. १९७० दशकाच्या सुरुवातीला सलग अनेक वर्षी थंडी जास्त होती, तेव्हा काही शास्त्रज्ञांनी तापमानातील घट ही पृथ्वी एका नवीन हिमयुगात प्रवेश करत असल्याचे लक्षण आहे, असा अर्थ लावला; परंतु त्या दशकाच्या अखेरीस भाकिते उलटली आणि तज्ज्ञ वाढत्या तापमानाबद्दल काळजी करू लागले. तेव्हापासून सरकारे आणि पर्यावरणीय गट वातावरणातील हरितगृह वायू आणि जागतिक तापमानवाढ कमी करण्यासाठी सार्वजनिक ऊर्जेच्या वापरात नियम आणि बदल करण्यासाठी दबाव आणत आहेत. आपण आपल्या ऊर्जावापराच्या सवयी बदलण्याचा प्रयत्न करताना काही शास्त्रज्ञ प्रश्न विचारत आहेत, की जागतिक तापमानवाढ खरोखरच काही उद्देश पूर्ण करत आहे का? ही वाढती उष्णता आपल्याला दुसऱ्या हिमयुगात प्रवेश करण्यापासून रोखत आहे का आणि आपण ही प्रक्रिया उलट केली, तर पुन्हा एकदा बर्फाने झाकले जाऊ का? अतिथंडी आणि उष्णता पृथ्वीच्या इतिहासात नवी नाही. एक अब्ज वर्षांपासून पृथ्वीने उष्णता आणि थंडीच्या कालावधीत तापमानात आलटून पालटून मंद चढ-उतार अनुभवले आहे. समुद्राचे प्रवाह, सूर्याभोवती पृथ्वीच्या कक्षेत बदल आणि वातावरणीय रचना यासह अनेक घटक याला जबाबदार आहेत. यापैकी काही कालखंड इतरांपेक्षा जास्त तीव्र होते.
हिमयुग नावाच्या तीव्र शीतलहरीही येऊन गेल्या आहेत. त्या दरम्यान विशाल हिमनद्यांनी पृथ्वीचा बराचसा भाग व्यापला होता. हिमयुगांदरम्यान पृथ्वी सामान्यतः सापेक्ष उष्णतेच्या काळात प्रवेश करते, त्याला आंतरहिमयुग म्हणतात, जे आपण गेल्या बारा हजार वर्षांपूर्वीच्या हिमयुगाच्या समाप्तीपासून अनुभवत आहोत. आता दिसते की आपण तापमानवाढीच्या ट्रेंडमध्ये आहोत. अनेक शास्त्रज्ञांच्या मते तो पृथ्वीच्या वातावरणात उष्णता अडकवणाऱ्या हरितगृह वायूंचा परिणाम आहे. एका विचारसरणीच्या मते तापमानवाढ करणारा ग्रह म्हणजे असा ग्रह, जो हिमयुगात संपण्याची शक्यता कमी असते. पृथ्वी नेहमीच उष्ण आणि थंड चक्रातून
जात असते.
शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे, की पुढील दहा हजार ते एक लाख वर्षांमध्ये कधी तरी आपल्याला आणखी एका मोठ्या थंडीचा सामना करावा लागेल. असे झाले तर युरोप आणि उत्तर अमेरिकेसह जगाचा बराचसा भाग बर्फाच्या जाड चादरीने झाकला जाईल. काही संशोधकांच्या मते हरितगृह वायूच्या परिणामामुळे पृथ्वीच्या वातावरणात अडकलेली उष्णता या थंडीची भरपाई करेल. ती पृथ्वीला दुसऱ्या हिमयुगात प्रवेश करण्यापासून रोखेल. हिमयुग टाळणे ही चांगली बातमी वाटत असली तरी संशोधकांच्या इशाऱ्यानुसार जागतिक तापमानवाढ ही सोपी कामगिरी नाही. त्याचे पृथ्वीवर इतर गंभीर आणि अप्रिय परिणाम
होऊ शकतात.