
कोल्हापूर : कोल्हापूर येथील ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड गोविंद पानसरे (Govind Pansare) हत्या प्रकरणासंदर्भात आज एक मोठी आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपींपैकी असलेल्या डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, अमोल काळे आणि शरद कळसकर या तिघांनाही मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर येथील सर्किट बेंचकडून जामीन मंजूर झाला आहे. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात आजपर्यंत एकूण १२ संशयित आरोपींना अटक करण्यात आली होती. यापैकी ९ जणांना यापूर्वीच जामीन मंजूर झाला होता, मात्र डॉ. वीरेंद्र तावडे, अमोल काळे आणि शरद कळसकर हे तिघे जामीन न मिळाल्यामुळे कळंबा कारागृहात होते. आज (मंगळवार) या तिघांच्याही जामीन अर्जावर सर्किट बेंचकडून सुनावणी झाली आणि न्यायालयाने तिघांनाही जामीन मंजूर केला. या निर्णयामुळे कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आजपर्यंतचे एकूण सर्वच १२ संशयीत आरोपींना आता जामीन मंजूर झाला आहे. या निकालामुळे पानसरे हत्या प्रकरणाच्या पुढील तपासावर आणि न्यायालयीन प्रक्रियेवर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
साडे नऊ वर्षांची भरपाई कोण करणार?
तिन्ही संशयित हिंदुत्वनिष्ठांना जामीन मिळाल्यावर सनातन संस्थेने विचारले आहे की, "निरपराध हिंदुत्वनिष्ठांची साडे नऊ वर्षांची भरपाई (Compensation) कोण करणार?" पानसरे हत्या प्रकरणात निष्पाप हिंदुत्वनिष्ठांना अटक करण्यात आली होती आणि त्यांना साडे नऊ वर्षांचा कालावधी कारागृहात घालवावा लागला. या कालावधीत झालेले त्यांचे मानसिक, सामाजिक आणि आर्थिक नुकसान भरून काढण्याची जबाबदारी कोणाची, असा थेट सवाल संस्थेने केला आहे. डॉ. तावडे, अमोल काळे आणि शरद कळसकर यांना जामीन मंजूर झाल्यामुळे सनातन संस्थेने आनंद व्यक्त केला आहे, परंतु त्याच वेळी त्यांना झालेल्या त्रासाबद्दल सरकारकडे स्पष्टीकरण मागितले आहे. यामुळे आता जामीन मिळालेल्या संशयित आरोपींच्या अटकेच्या प्रक्रियेवर आणि तपासाच्या पद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

प्रतिनिधी:पॅकेज्ड फूड उत्पादनांसाठी ओळखल्या जाणाऱ्या जागतिक एफएमसीजी कंपनी एलटी फूड्स लिमिटेडने हंगेरी-आधारित ग्लोबल ग्रीन युरोप केएफटीमधील १००% ...
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरण: काय आहे घटनाक्रम?
२० फेब्रुवारी २०१५ रोजी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांची कोल्हापुरात त्यांच्या राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पानसरे यांच्या हत्येचा संबंध त्याच दरम्यान झालेल्या इतर विचारवंतांच्या हत्यांशी जोडला गेला होता. यात प्रामुख्याने अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर (Narendra Dabholkar), दक्षिणेतील विचारवंत एम. एम. कलबुर्गी (M. M. Kalburgi) आणि जेष्ठ पत्रकार गौरी लंकेश (Gauri Lankesh) यांच्या हत्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील तपास यंत्रणांना सुरुवातीला या हत्येचा तपास करताना यश आलेलं नव्हतं. गौरी लंकेश हत्या प्रकरणात काही संशयितांना अटक झाल्यानंतर, त्या तपासातील धागेदोरे पकडून गोविंद पानसरे हत्या प्रकरणात तपास यंत्रणांना यश मिळण्यास सुरुवात झाली होती. अनेक वर्षांच्या तपास आणि न्यायालयीन लढ्यानंतर, या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या सर्वच्या सर्व १२ संशयितांना आज (डॉ. वीरेंद्र तावडे, अमोल काळे आणि शरद कळसकर यांच्यासह) जामीन मंजूर झाला आहे. या जामीन मंजूर होण्याच्या निर्णयामुळे, पानसरे आणि इतर विचारवंतांच्या हत्यांच्या तपासातील पुढील दिशा काय असेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.