Tuesday, October 14, 2025

डॉक्टरांनी लाच घेऊन मुलांच्या जीवाशी खेळ केला, पोलिसांचा कोल्ड्रिफ प्रकरणात गंभीर आरोप

डॉक्टरांनी लाच घेऊन मुलांच्या जीवाशी खेळ केला, पोलिसांचा कोल्ड्रिफ प्रकरणात गंभीर आरोप

छिंदवाडा : खोकल्यावरचे औषध म्हणून कोल्ड्रिफ कफ सिरप प्यायलेल्या मध्य प्रदेशमधील अनेक लहान मुलांचा मृत्यू झाला. या प्रकरणात कोल्ड्रिफ कफ सिरप निर्मात्या श्रीसन फार्मा कंपनीचा परवाना रद्द करण्यात आला आहे. कंपनीसाठी कार्यरत असलेल्या डॉ. प्रवीण सोनी यांच्या विरोधात मध्य प्रदेशमधील छिंदवाडाच्या सत्र न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी पोलिसांनी डॉक्टरांवर लाच घेऊन मुलांच्या जीवाशी खेळ केल्याचा गंभीर आरोप केला. सुनावणीअंती सत्र न्यायालयाने डॉ. प्रवीण सोनी यांचा जामीन अर्ज फेटाळला.

औषधात लहानग्यांना अपायकारक असे रसायन मिसळले होते. कंपनीच्या व्यवस्थापनाला याची माहिती होती. डॉक्टरांनाही सर्व माहिती होते. पण व्यवस्थापनाकडून मोठी रक्कम घेऊन डॉ. प्रवीण सोनी यांनी तोंड बंद ठेवले. खोकला झालेल्या अनेक मुलांना कोल्ड्रिफ कफ सिरप लिहून दिले, असा आरोप छिंदवाडाच्या सत्र न्यायालयात पोलिसांनी केला. किती मुलांना कोल्ड्रिफ लिहून दिल्यास किती पैसे मिळणार याबाबत डॉ. सोनी आणि कंपनीचे व्यवस्थापन यांच्यात व्यवहार ठरला होता. प्रत्येक कफ सिरपच्या बाटलीमागे डॉक्टरांना दहा टक्के कमिशन निश्चित होते, असाही आरोप पोलिसांनी केला.

न्यायालयात सादर अहवालानुसार, डायरेक्टोरेट जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेसने सर्व राज्यांसाठी औषधांसंदर्भात मार्गदर्शक नियमावली जारी केली आहे. त्यामध्ये चार वर्षांच्या खालील मुलांना फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन अर्थात FDC दिले जाऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे मुलांना लघवीस न होणे आणि किडनी खराब होणे अशा व्याधी होत असल्याचे माहिती असूनही सोनी यांनी कोल्ड्रिफचे डोस मुलांना लिहून दिले. डॉ. सोनी यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप न्यायालयासमोर फेटाळून लावले आहेत. पण सुनावणीअंती सत्र न्यायालयाने डॉ. प्रवीण सोनी यांचा जामीन अर्ज फेटाळला.

Comments
Add Comment