Tuesday, October 14, 2025

Diwali 2025 : जाणून घ्या यंदाच्या दिवाळीतील लक्ष्मीपूजनाची तारीख, वेळ आणि शुभ मुहूर्त

Diwali 2025 : जाणून घ्या यंदाच्या दिवाळीतील लक्ष्मीपूजनाची तारीख, वेळ आणि शुभ मुहूर्त

मुंबई : दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण मानला जातो. हा सण पाच दिवसांचा असून प्रत्येक दिवशी वेगवेगळे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व आहे. दिवाळीतील सर्वात मुख्य दिवस म्हणजे आश्विन अमावास्या, ज्याला लक्ष्मीपूजन म्हटले जाते.

या दिवशी धन, समृद्धी आणि सुख-शांतीची देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. प्रत्येकजण आपल्या घरावर आणि आपल्यावर लक्ष्मीचा आशीर्वाद मिळावा यासाठी घर स्वच्छ करून, रांगोळ्या काढून आणि दिवे लावून देवीचे स्वागत करतात.

लक्ष्मीपूजन केवळ धार्मिक विधी नसून, आर्थिक स्थैर्य, नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात आणि घरगुती सौख्य टिकवण्यासाठी केले जाणारे पूजन आहे. त्यामुळे लक्ष्मीपूजनाची योग्य तारीख आणि मुहूर्त जाणून घेणे अत्यंत आवश्यक असते.

लक्ष्मीपूजन कधी करायचं?

लक्ष्मीपूजन आश्विन वद्य अमावास्या या दिवशी केलं जातं. खासकरून प्रदोष काळात पूजा केली जाते. प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्तानंतरचा सुमारे दोन तासांचा कालावधी. या काळात देवी लक्ष्मीचं पूजन केल्यास धन, संपत्ती आणि सौख्य लाभतं, असा विश्वास आहे.

लक्ष्मीपूजन तारीख व तिथी

अमावास्या तिथी सुरू: २० ऑक्टोबर २०२५, दुपारी ३:४४ वाजता

अमावास्या तिथी समाप्त: २१ ऑक्टोबर २०२५, संध्याकाळी ५:५४ वाजता

या वेळांनुसार, २० ऑक्टोबरला दुपारीच अमावास्या सुरू होत असल्याने त्या दिवशी उगवत्या सूर्याच्या वेळी अमावास्या नसेल. मात्र, २१ ऑक्टोबरला उगवत्या सूर्याच्या वेळी अमावास्या असल्याने, धार्मिक दृष्टिकोनातून लक्ष्मीपूजनासाठी २१ ऑक्टोबर ही तारीख अधिक योग्य मानली गेली आहे.

लक्ष्मीपूजनचा शुभ मुहूर्त

२१ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ६:१० ते रात्री ८:४० या वेळेत लक्ष्मीपूजन करण्याचा शुभ मुहूर्त आहे. हा मुहूर्त प्रदोष काल व अमावास्या-प्रतिपदा योगात येतो, ज्यामुळे पूजन अधिक फलदायी मानले जाते. एकूण २ तास २४ मिनिटांचा हा मुहूर्त लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी उत्तम आहे.

स्थानिक परंपरा आणि पंचांगांनुसार भारतात दिवाळी साजरी करण्याच्या तारखांमध्ये थोडा फरक पडतो. उत्तर भारतात दिवाळी आणि लक्ष्मीपूजन २० ऑक्टोबर २०२५ रोजी साजरी केली जाईल. तर महाराष्ट्रात लक्ष्मीपूजन २१ ऑक्टोबर २०२५ रोजी साजरं केलं जाणार आहे.

लक्ष्मीपूजन विधी

लक्ष्मीपूजन करताना घरातील देवघर स्वच्छ करून त्यात चौरंगावर लाल कापड अंथरावे. कळस, नारळ, विड्याची पानं, नाणी आणि लक्ष्मी-गणपतीची मूर्ती किंवा फोटो ठेवून पूजा करावी. तांदळावर मूर्ती ठेवून त्या भोवती हिशोबाची वही, पेन, आणि पैशांची पूजा करावी. फराळाचे पदार्थ, लाह्या-बताशे यांचा नैवेद्य दाखवावा. लक्ष्मीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या झाडूचीही पूजा करावी.

दिवाळीत लक्ष्मीपूजन का करतात?

ऐतिहासिक आणि धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी देवी लक्ष्मी बली राजाच्या बंदिवासातून मुक्त झाली होती, अशी आख्यायिका आहे. याच आनंदासाठी लक्ष्मीपूजनाची परंपरा सुरू झाली. या दिवशी पूजन केल्याने देवी लक्ष्मीचं घरात कायमस्वरूपी वास्तव्य होतं आणि धन-धान्य, सुख-समृद्धी प्राप्त होते, असं मानलं जातं. व्यापारी वर्गही या दिवशी त्यांच्या कार्यालयात लक्ष्मीपूजन करून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात करतो.

लक्ष्मीपूजनासाठी योग्य तारीख २१ ऑक्टोबर २०२५ असून, सायंकाळी ६:१० ते ८:४० या वेळेत पूजा करावी. योग्य मुहूर्तात आणि श्रद्धेने केलेल्या पूजेमुळे देवी लक्ष्मीचं आशीर्वाद मिळतो आणि घरात आनंद, समाधान आणि समृद्धीचं वातावरण निर्माण होतं.

Comments
Add Comment