
मुंबई (खास प्रतिनिधी) : कला आणि चित्रांच्या माध्यमातून प्रत्येक देशाची संस्कृती, सामाजिक जाणीव, इतिहास आणि भावविश्व उलगडते. या कलाकृतींमुळे देशादेशांतील लोकांमध्ये परस्पर समज, आदर आणि आत्मीयता वाढते. एकमेकांच्या परंपरा, विचारसरणी आणि कलाशैली समजून घेण्याची ही एक विलक्षण संधी ठरते. चित्रकलेच्या माध्यमातून भावभावना, सामाजिक मूल्ये आणि मानवी संस्कार यांचे जिवंत दर्शन घडते. अशा प्रकारची सांस्कृतिक देवाणघेवाण दोन देशांतील लोकांमध्ये मैत्री, परस्पर सहकार्य आणि जागतिक सौहार्द वृद्धिंगत करते. भारत आणि इटली यांच्यातील या सांस्कृतिक सेतूचे प्रतीक म्हणजेच हे चित्रप्रदर्शन होय. या प्रदर्शनामुळे दोन्ही देशांमधील सांस्कृतिक नाते अधिक दृढ, समृद्ध होईल, असा विश्वास महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केला.
भायखळा येथील डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय व इटलीचे वाणिज्य दूतावास यांच्या संयुक्त विद्यमाने आणि इस्तितुतो इटालियानो दी कुल्तुरा या संस्थेच्या सहकार्याने छायाप्रकाशाचे किमयागार कारावाज्जो यांची 'भावमुग्ध मॅग्डलेन' कलाकृती आणि भारतीय चित्रकार रावबहादूर महादेव विश्वनाथ धुरंधर यांच्या हिंदू पुराणातील कथानकावर आधारित पाश्चात्य शैलीतील चित्रांचे प्रदर्शन डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय येथे भरविण्यात आले आहे. महाराष्ट्राचे पणन तथा राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी, इटलीचे वाणिज्यदूत वॉल्टर फेरारा, डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाच्या व्यवस्थापकीय विश्वस्त व संचालक तस्नीम मेहता, फ्रांचेस्का आर्मेदोला, आंद्रेआ आनास्तासिओ आदी यावेळी उपस्थित होते.
हे चित्रप्रदर्शन डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयातील कमलनयन बजाज कलादालन येथे दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ ते दिनांक २ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत खुले राहणार आहे. इटालियन चित्रकार अँजेलो मेरिसी दा कारावाज्जो यांची अजरामर कलाकृती आणि रावबहादूर महादेव विश्वनाथ धुरंधर यांच्या कलकृती आदींचा यात समावेश आहे.या प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते मंगळवारी १४ ऑक्टोबर २०२५ रोजी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
कलाप्रेमींसाठी आणि कला देवाणघेवाणीच्या दृष्टीने हा एक अत्यंत अभिमानास्पद क्षण आहे, असल्याचे स्पष्ट करत महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी म्हणाले की,आज इटलीतील महान कलाकार कारावाज्जो यांची दुर्मीळ, अमूल्य कलाकृती आपल्या देशात प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळत आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून जगातील कलासंपन्नतेला जवळून अनुभवण्याची अनोखी संधी मिळत आहे. आजच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात, आपल्या संवेदना काहीशा मंदावलेल्या जाणवतात. ज्या काळात वीजेचा शोध लागला नव्हता, त्या काळात कारावाज्जो यांनी आपल्या कलेतून 'स्पॉटलाइट'चा भास निर्माण केला होता. हेच त्यांच्या प्रतिभेचे खरे वैशिष्ट्य होय. जागतिक दर्जाचे कलाकार असलेल्या कारावाज्जो यांच्या कलाकृती पाहताना आपण केवळ सौंदर्य अनुभवत नाही, तर कलेचा आत्मा आणि प्रकाशाचा अर्थ नव्याने शोधतो. त्यामुळेच हे प्रदर्शन प्रत्येकासाठी महत्वाचे आहे, असे त्यांनी नमूद केले