
मुंबई (खास प्रतिनिधी) : दीपावलीच्या सणा निमित्त आता फटाक्यांच्या विक्रीला सुरुवात झाली असून अशाप्रकारची दुकाने ही गर्दीच्या ठिकाणी नसावी तसेच त्याबाबतची मुंबई अग्निशमन दलाची परवानगी घेत आग प्रतिबंधक सुरक्षेची काळजी घेणे हे बंधनकारक आहे. परंतु दादर पश्चिममधील डिसिल्व्हा रोडवर गर्दीच्या ठिकाणी रस्त्यावर मोठ्याप्रमाणात फटाक्यांची विक्री करण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात याठिकाणी फटाक्यांमुळे आगीसारखी दुघर्टना झाल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल रहिवाशांकडून केला जात आहे. सलन १९९७च्या सुमारास दादरच्या याच परिसरात फटाक्यांमुळे आग लागून अनेक दुकाने जळून खाक झाली आहे, याची पुनर्रावृत्ती करायची आहे का असाही सवाल नागरिकांसह दुकानदारांकडूनही केला जात आहे.
दादर पश्चिम रेल्वे स्थानकाच्या पश्चिम बाजुस असलेल्या डिसिल्व्हा रोडवरील मोठ्याप्रमाणात फेरीवाल्यांनी पदपथ अडवून ठेवलेल्या असून पदपथ आणि रस्तेही त्यांनी काबिज केल्यामुळे नागरिकांना पदपथ आणि रस्त्यावरुन चालणेही कठिण होवून बसले आहे. त्यातच आता दिवाळीच्या सणानिमित्त फेरीवाल्यांची संख्या अधिक वाढली गेली आहे. त्यात आता फटाके विक्रेत्यांची भर पडू लागली आहे. कमी आवाजाच्या फटाक्यांची विक्री करण्यास परवानगी असली तरी प्रत्यक्षात या रस्त्यावर पाऊस, विविध मोठ्या आवाजांचे फटाके आदींची विक्री सर्रासपणे केली जात आहे. फटाक्यांच्या विक्रीला आग सुरक्षा प्रतिबंधक नियमावलीनुसार बंदी असूनही दादरसारख्या गजबजलेल्या रस्त्यांवर मोठ्या आवाजांच्या फटाक्यांची विक्री होत असताना मुंबई अग्निशमन दल, महापालिका अधिकारी तसेच पोलिस यांचे याकडे लक्ष कसे नाही असा सवाल स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, दादरमधील याच गल्लीत १९९७साली फटाक्यांमुळे आग लागून काही दुकाने जळून खाक झाली होती. या दुघर्टनेनंतर याठिकाणी फटाक्यांची विक्री करण्यास पूर्णपणे बंदी होती, परंतु मागील वर्षांपासून याला हळूहळू सुरुवात झालेली आहे. आणि यंदा हे प्रमाण अधिक दिसून येत आहे. त्यामुळे मुंबई अग्निशमन दल आणि पोलिस तसेच महापालिकेचे अधिकारी अशाप्रकारच्या फटाक्यांच्या विक्रीवर कधी बंदी आणून कारवाई करणार असा प्रश्न नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.