Tuesday, October 14, 2025

व्हीव्हीपॅटवरून रणकंदन! कोण खेळतंय रडीचा डाव?

व्हीव्हीपॅटवरून रणकंदन! कोण खेळतंय रडीचा डाव?

बॅलेट पेपरची मागणी ते व्हीव्हीपॅटचा हट्ट: 'महाकन्फ्यूज आघाडी' गोंधळलेली

मुंबई : महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आज राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आयोगाच्या कारभारावर त्यांनी गंभीर आक्षेप घेतले. विरोधकांनी सवाल केला आहे की, जी निवडणूक २०२२ मध्ये व्हायला हवी होती, ती आता २०२६ मध्ये होतेय. या चार वर्षांत आयोगाने कोणती तयारी केली? हजारो कोटी रुपये खर्च करून मागवलेले व्हीव्हीपॅट नेमके कुठे आहेत? सामान्य जनतेचा ईव्हीएमवर विश्वास नाही, आणि व्हीव्हीपॅट हेच त्यांच्या विश्वासाचं एकमेव माध्यम आहे. त्यामुळे, व्हीव्हीपॅटचा वापर अनिवार्य असावा, ही त्यांची ठाम मागणी आहे.

तसेच आयोगाने जर व्हीव्हीपॅट सुविधा असलेली ईव्हीएम मशीन्स दिली नाहीत, तर मग मुंबई महापालिकेसह सर्व निवडणुका थेट बॅलेट पेपरवरच घ्याव्यात, अशी रोखठोक मागणी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने केली आहे.

दरम्यान, इकडे विरोधकांनी आयोगाला धारेवर धरलं, तर तिकडे महायुतीमधील शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षांवर पलटवार केला. शिंदे यांनी विरोधकांच्या या कृतीला थेट 'रडीचा डाव' असं संबोधलं आहे. शिंदेंनी स्पष्ट म्हटलंय की, ही महाविकास आघाडी नाही, तर 'महाकन्फ्यूज' आघाडी आहे. त्यांच्यात कोणताही समन्वय नाही. विधानसभेत महायुतीच्या जोरदार यशानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही आपला पराभव निश्चित दिसू लागल्याने हे व्हीव्हीपॅटचे नाटक सुरू आहे.

शेतकऱ्यांसाठी केलेली भरीव मदत आणि विकासकामांमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असा ठाम दावाही एकनाथ शिंदेंनी केला. शिंदेंनी विरोधकांच्या दुटप्पी भूमिकेवर बोट ठेवत, त्यांचा राजकीय स्वार्थ उघड केला. ते म्हणाले, जेव्हा महाविकास आघाडीला विजय मिळतो, तेव्हा आयोग बरोबर असतो; पण पराभव दिसू लागला की, ते निवडणूक आयोग आणि न्यायालयांवरही आरोप करतात. पूर्वी हेच लोक ईव्हीएम मशिन्सविरोधात होते, निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या म्हणत होते, आणि आता व्हीव्हीपॅटची सुविधा असलेल्या ईव्हीएम मशिन्ससाठी हट्ट धरत आहेत. हा विरोधाभास जनतेला स्पष्ट दिसतोय. महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे. विरोधकांच्या या गोंधळलेल्या भूमिकेचा अर्थ जनता नक्कीच ओळखेल आणि येत्या निवडणुकांमध्ये महायुती सरकारला पाठिंबा देऊन प्रचंड विजय मिळवून देईल, असा ठाम विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >