Monday, October 13, 2025

राज्यात १५ ऑक्टोबरपासून वादळी पावसाचा अंदाज

राज्यात १५ ऑक्टोबरपासून वादळी पावसाचा अंदाज

मुंबईत पावसाची शक्यता कमी

ऑक्टोबर महिन्याची सुरुवात होताच नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्रातून निरोप घेईल, असा अंदाज हवामान खात्याच्या तज्ज्ञांनी वर्तवला होता. परंतु आताच्या ताज्या अहवालानुसार, राज्यात १५ऑक्टोबरपासून वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठं आवाहन केलं आहे. शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके पाऊस, वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावी, अशा सूचना सरकारने शेतकऱ्यांना दिल्या आहेत.

मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी हवामान पूर्णपणे कोरडं असल्याचं पाहायला मिळालं. नैऋत्य मान्सूनने राज्यातून निरोप घेतल्याचं चित्र निर्माण झालं होतं. मात्र १५ ऑक्टोबरपासून राज्यातील हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. १८ ऑक्टोबरपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान आणि दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता आहे. पाऊस पुन्हा एकदा विदर्भ आणि मराठवाड्याला झोडपून काढू शकतो. येथील अनेक भागात ढगाळ हवामान किंवा वादळी पावसाची शक्यता राहील. तर खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातही पावसाच्या जोरदार सरी बरसू शकतात.

मुंबई, पुणे, मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात पाऊस माघार घेईल, असा अंदाज होता. मुंबईतून पावसाने निरोप घेतल्याचं हवामान विभागाने जाहीर केलं होतं. दसऱ्यापर्यंत म्हणजेच २ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्राच्या अनेक भागात पावासाच्या सरी कोसळल्या होत्या. ५ किंवा ६ ऑक्टोबरपासून पाऊस परतीच्या प्रवासाला जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. पण अद्याप तरी मुंबईत पावसाने दडी मारली आहे. १५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वादळी पावसाचा मुंबईवर परिणाम होण्याची शक्यता कमी दिसत आहे.

Comments
Add Comment