राऊतांच्या 'त्या' विधानावर मनसे नेत्यांची तीव्र नाराजी; मनसे 'शिवतीर्थ'वर आक्रमक!
मुंबई: ठाकरे बंधू म्हणजेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीच्या चर्चांना जोर पकडलेला असतानाच, खासदार संजय राऊत यांच्या एका विधानामुळे मोठा राजकीय मिठाचा खडा पडल्याचे चित्र आहे. राज ठाकरे हे महाविकास आघाडीसोबत यावेत आणि त्यांना काँग्रेससोबत जाणे आवश्यक वाटते, ती त्यांची भूमिका आहे, असे सूचक वक्तव्य राऊत यांनी केले आणि मनसेत तीव्र नाराजी पसरली.
राज ठाकरेंच्या भूमिकेवर राऊतांनी काय म्हटले?
आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांना, राज ठाकरे महाविकास आघाडीत सामील होणार का आणि काँग्रेस त्यांना स्थान देणार का, असे प्रश्न विचारण्यात आले. यावर उत्तर देताना राऊत म्हणाले की, "स्वतः राज ठाकरे यांची अशी इच्छा आहे की, आपल्याला महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचे आहे. त्यांची ही भूमिका आहे. निर्णय नाही!" राऊत यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली.
मनसे नेत्यांकडून थेट 'शिवतीर्थ'वर आक्षेप
संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे मनसेमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटला आहे. राऊतांनी केलेले हे विधान मनसे नेत्यांना अजिबात मान्य नसल्याचे दिसत आहे. आज मनसे नेत्यांनी थेट राज ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या 'शिवतीर्थ' येथे तातडीची बैठक घेतली. याच बैठकीत नेत्यांनी राऊत यांच्या विधानाबद्दल थेट पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याकडे आक्षेप नोंदवला आणि नाराजी व्यक्त केली.
पत्रकारांशी बोलताना मनसेचे पक्षनेते संदीप देशपांडे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. "आमच्या पक्षाची भूमिका आम्ही योग्य वेळी मांडू. काँग्रेसला आम्ही कोणताही प्रस्ताव दिलेला नाहीये. आमच्या पक्षाची भूमिका पक्षाचे प्रमुख राज ठाकरेच स्पष्ट करतील," असे स्पष्टीकरण देत त्यांनी राऊतांचे विधान फेटाळले.
रुग्णालयातून राऊतांचा 'तो' मेसेज
दरम्यान, या राजकीय नाट्यमय घडामोडींदरम्यान आज दुपारी खासदार संजय राऊत यांना मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या इथे काही चाचण्या झाल्या होत्या. आज पत्रकार परिषदेतही त्यांची प्रकृती अस्वस्थ दिसत होती. पत्रकार परिषद आटोपल्यानंतर त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
महत्वाचे म्हणजे, आपल्या वक्तव्यामुळे मनसेत गैरसमज निर्माण झाल्याचे लक्षात येताच, राऊत यांनी रुग्णालयातूनच तातडीने राज ठाकरे यांना मोबाईलवरून मेसेज केल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे. "मी असे काहीही बोललो नाही," असा मेसेज संजय राऊत यांनी राज ठाकरेंना पाठवला आहे. आपल्या वक्तव्याचा तसा अर्थ नसल्याचे त्यांनी मेसेजमध्ये स्पष्ट केल्याची माहिती आहे.
काँग्रेसची मुंबईत स्वबळावर लढण्याची तयारी?
एकीकडे युती-आघाडीची चर्चा सुरू असतानाच, दुसरीकडे काँग्रेस पक्षातही मोठी घडामोड झाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत आज एक महत्त्वाची बैठक पार पडली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत या बैठकीत चर्चा झाली. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक काँग्रेसने स्वबळावर आणि स्वतंत्रपणे लढवावी, अशी चर्चा बैठकीत झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यामुळे महाविकास आघाडीतील संभाव्य जागावाटप आणि युतीचे समीकरण अधिक गुंतागुंतीचे होण्याची शक्यता आहे.