
मुंबई : "अतिशहाणा त्याचा बैल रिकामा" या म्हणीचे उत्तम उदाहरण KBC शो मध्ये बघायला मिळाले. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा 'कौन बनेगा करोडपती' (KBC) या लोकप्रिय शोचा १७ वा सीझन सध्या सुरु आहे. या शोमध्ये नुकताच एक लहान स्पर्धक सहभागी झाला होता. गांधीनगर (गुजरात) येथील इशित भट्ट नावाच्या पाचवीत शिकणाऱ्या मुलाने हॉट सीटवर बसून बिग बींसोबत बोलताना केलेल्या असभ्य वर्तनामुळे तो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
कार्यक्रमात इशितने सुरुवातीलाच अमिताभ बच्चन यांना थेट म्हटलं, "मला नियम माहिती आहेत, आता तुम्ही मला नियम समजावत बसू नका." त्यानंतर, जेव्हा प्रश्न विचारण्यास सुरुवात झाली, तेव्हा त्याने पर्याय ऐकण्याआधीच उत्तर लॉक करण्यास सांगितले. इशितचा आत्मविश्वास खूप होता, मात्र अनेकांना त्याचे वागणे उद्धट वाटले.
एक कठीण प्रश्न आल्यावर इशितने बिग बींना पर्याय देण्याची विनंती केली. उत्तर देताना त्याने म्हटलं, "सर, एक काय, सगळी चार ऑप्शन्स लॉक करा, पण लवकर लॉक करा." अखेर त्याचं उत्तर चुकलं आणि तो कोणतीही रक्कम न जिंकता परत गेला.
या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. स्वतः अमिताभ बच्चन यांनीही हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून, त्याला “बोलण्यासारखं काही नाही…” अशी टिप्पणी दिली आहे.
अमिताभ बच्चन यांनी विचारलेला प्रश्न होता : "वाल्मिकी रामायणाच्या प्रथम कांडाचं नाव काय आहे?" पर्याय होते : अ. बाल कांड ब. अयोध्या कांड क. किष्किंधा कांड ड. युद्ध कांड
इशितने अयोध्या कांड लॉक करण्यास सांगितले, मात्र योग्य उत्तर होतं बाल कांड. हा प्रश्न ₹२५,००० च्या स्तरावरील होता.
इशितच्या या वागणुकीवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी लिहिलं आहे की, "ज्ञान असून उपयोग नाही जर वडीलधाऱ्यांशी वागणंच शिकवलं नसेल." काहींनी तर म्हटलं, "मी बच्चन साहेबांच्या जागी असतो, तर त्या त्या मुलाच्या मुस्कटात दिली असती."