
नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात जिंकण्यासाठी भारताला शेवटच्या दिवशी ५८ धावांची आवश्यकता आहे. याआधी नाणेफेक जिंकून भारताने फलंदाजीचा निर्णय घेतला आणि पहिल्या डावात पाच बाद ५१८ धावा केल्या. यानंतर भारताने डाव घोषीत केला. नंतर वेस्ट इंडिजने पहिल्या डावात सर्वबाद २४८ धावा केल्या. भारताने फॉलोऑन दिल्यामुळे सलग दुसऱ्यांदा फलंदाजीसाठी आलेल्या विंडीजने नंतरच्या डावात सर्वबाद ३९० धावा केल्या आणि भारतापुढे जिंकण्यासाठी १२१ धावांचे आव्हान ठेवले.
दिल्ली कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारत शेवटच्या डावाची फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला. यशस्वी जयस्वाल आठ धावा करुन वॉरिकनच्या चेंडूवर अँडरसनकडे झेल देऊन परतला. केएल राहुल २५ आणि साई सुदर्शन ३० धावांवर खेळत आहे. आतापर्यंत भारताने एक बाद ६३ धावा केल्या आहेत. सामन्याच्या शेवटच्या दिवशी जिंकण्यासाठी भारताला ५८ धावांची आवश्यकता आहे.
याआधी विंडीजकडून दिल्ली कसोटीच्या दुसऱ्या डावात कॅम्पबेलने ११५ धावा, चंदरपॉलने १० धावा, अथानाझेने ७ धावा, होपने १०३ धावा, चेसने ४० धावा, इमलाचने १२ धावा, ग्रीव्हजने ५० धावा, पियरेने शून्य धावा, वॉरिकनने ३ धावा, फिलिपने २ धावा, सील्सने ३२ धावा केल्या. भारताकडून बुमराह आणि कुलदीप यादवने प्रत्येकी तीन तर मोहम्मद सिराजने दोन विकेट घेतल्या. रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी एक विकेट घेतली.
दिल्ली कसोटीत भारत जिंकला तर विंडीज विरूद्धच्या दोन कसोटी सामन्यांची मालिका भारत २-० अशी जिंकेल. विंडीजला व्हाईटवॉश देण्यात भारत यशस्वी होईल.
भारताने अहमदाबाद कसोटी एक डाव आणि १४० धावांनी जिंकली होती. आता दिल्ली कसोटी जिंकल्यास भारताची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील स्थिती सुधारण्यास मदत होणार होणार आहे. सध्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात भारत तिसऱ्या स्थानावर आहे. भारताने सहा पैकी तीन कसोटी सामने जिंकले आहेत. भारताचा दोन कसोटी सामन्यात पराभव झाला आहे आणि एक सामना अनिर्णित राहिला आहे. भारताने ४० गुण मिळवले आहेत.