
मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगर वेगाने वाढत आहे. नवनवीन पायाभूत सुविधा प्रकल्प, गृहनिर्माण व वाहतूक सुविधा निर्माण होत आहेत. झपाट्याने होणाऱ्या या विकासासोबत काही आव्हानेही निर्माण होत आहेत. विशेषतः बांधकामातील धूळ व उत्सर्जन हे घटक वायू प्रदूषणाचे सर्वात महत्वाचे कारण असल्याचे महानगरपालिकेचे उपायुक्त (पर्यावरण आणि वातावरणीय बदल) अविनाश काटे यांनी स्पष्ट केले.
बांधकाम स्थळांवर उद्भवणारे वायू प्रदूषण, कारणीभूत ठरणारे घटक तथा कामकाजाच्या पद्धती आणि वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांबाबत महानगरपालिका आणि डब्ल्यूआरआय इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ, इंडिया अलायन्स फॉर क्लीन कन्स्ट्रक्शन (आयएसीसी), नॅरडको (नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल), क्रेडाई-एमसीएचआय, प्रॅक्टिस इंजिनिअर्स आर्किटेक्ट्स अँड टाऊन प्लानर्स असोसिएशन (पिटा) यांच्या सहकार्याने ‘बांधकाम स्थळांवर वायू प्रदूषण शमन’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत सोमवारी १३ ऑक्टोबर २०२५ रोजी विचारमंथन करण्यात आले.
मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणाच्या अनुषंगाने, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर, या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
वांद्रे कुर्ला संकुल येथील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) नवीन प्रशासकीय इमारतीत आयोजित या कार्यशाळेत l महानगरपालिकेचे उपायुक्त (पर्यावरण आणि वातावरणीय बदल) अविनाश काटे, कार्यकारी अभियंता (पर्यावरण आणि वातावरणीय बदल) वर्षा आठल्ये, कार्यकारी अभियंता (विकास नियोजन) सुहास नेमाणे, तांत्रिकविषयक तज्ज्ञ (डब्ल्यूआरआय इंडिया) संदीप नारंग, लो कॉस्ट सेंसरचे विशेषज्ञ (तांत्रिक) संदीप मधवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी (क्रेडाई - एमसीएचआय) केवल वालंभिया , सहसचिव (नॅरडको) विशाल ठक्कर, अध्यक्ष (पेटा) संदीप इसोरे आदी उपस्थित होते.
यापसंगी बोलताना मुंबई महानगरपालिका उपायुक्त (पर्यावरण आणि वातावरणीय बदल) काटे पुढे म्हणाले की, या समस्येला एकत्रितपणे सामोरे जाण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी वायू प्रदूषण शमनासाठी तसेच नियंत्रणासाठी बांधकाम स्थळांवर उपाययोजना करणे आवश्यक आहे. बांधकाम स्थळावरील प्रदूषण रोखण्यासाठी महानगरपालिकेने निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्वांचा तंतोतंतपणे अवलंब केल्यास नक्कीच फायदा होईल. पर्यायाने, कामगार आणि नागरिकांसाठी विकासासोबतच आरोग्यदायी वातावरण राहील. यासाठी बांधकाम व्यावसायिक, बांधकाम संस्था, विकासक, अभियंता, प्रकल्प व्यवस्थापक, कंत्राटदार आणि प्रशासन आदी सर्वांनी मिळून एकत्रितपणे काम करावे, असे आवाहनही . काटे यांनी केले.
दरम्यान, संदीप नारंग यांनी, बांधकाम स्थळावर वायू प्रदुषणासाठी कारणीभूत घटक, मूलभूत स्त्रोत आणि नियंत्रणासाठी उपाययोजना याबाबत तांत्रिक पैलुंविषयी मार्गदर्शन केले. कार्यशाळेत एकूण १०८ बांधकाम व्यावसायिक, विकासक, अभियंता, प्रकल्प व्यवस्थापक आदी सहभागी झाले होते.