महामुंबईताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज
मुंबईतील इमारत बांधकामांचे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ऑडिट करा, भाजपची मागणी
October 13, 2025 12:54 PM
मुंबई खास प्रतिनिधी : मागील ८ ऑक्टोबर रोजी जोगेश्वरी पूर्व येथील पुनर्विकास स्थळावरून विट पडल्याने २२ वर्षीय संस्कृती अमीन यांच्या मृत्यूप्रकरणी मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार अमीत साटम यांनी बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहून या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. सुरक्षिततेच्या नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी सर्व बांधकाम सुरू असलेल्या जागांचे संपूर्ण मुंबईत ऑडिट करावे अशीही मागणी आमदार अमीत साटम यांनी महापालिकेला केली आहे.
दुर्घटनेच्या ठिकाणी सुरक्षा नियमांचे पालन होत नसल्याच्या तक्रारी यापूर्वी महापालिकेत केल्या होत्या. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. जर हे खरे असतील तर संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, असे आमदार अमीत साटम यांनी बीएमसी आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
आमदार अमीत साटम यांनी संपूर्ण शहरात कडक सुरक्षा तपासणी करण्याचीही मागणी केली आहे. सुरक्षा नियमांचे पालन होत आहे की नाही हे तपासण्यासाठी बीएमसीने सर्व बांधकाम सुरू असलेल्या जागांचे ऑडिट करावे. कोणतेही उल्लंघन आढळून आल्यास लवकरात लवकर त्यावर उचित उपाययोजना कराव्यात. सार्वजनिक सुरक्षेच्यादृष्टीने सुरक्षा नियमांचे पालन सुनिश्चित होईपर्यंत काम थांबवण्याच्या नोटीसा द्याव्यात, असे आमदार अमीत साटम यांनी पुढे सांगितले.