Sunday, October 12, 2025

भारताविरुद्धच्या कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर विंडीज ९७ धावांनी पिछाडीवर

भारताविरुद्धच्या कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर विंडीज ९७ धावांनी पिछाडीवर

नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना दिल्लीच्या जेटली स्टेडियमवर सुरू आहे. याआधीचा अहमदाबादचा कसोटी सामना भारताने एक डाव आणि १४० धावांनी जिंकला आहे. आता दिल्लीच्या कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर विंडीज ९७ धावांनी पिछाडीवर आहे. यामुळे भारताची बाजू सध्या वरचढ दिसत आहे.

दिल्ली कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या भारताने पाच बाद ५१८ धावा करुन पहिला डाव घोषीत केला. नंतर विंडीजचा डाव २४८ धावांत आटोपला. फॉलोऑन मिळाल्यामुळे पुन्हा फलंदाजीसाठी आलेल्या वेस्ट इंडिजने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दोन बाद १७३ धावा केल्या. अद्याप वेस्ट इंडिज ९७ धावांनी पिछाडीवर आहे. शाई होप ६६ आणि जॉन कॅम्पबेल ८७ धावांवर खेळत आहे. मोहम्मद सिराजने टी. चंदरपॉलला (१० धावा) शुभमन गिलकरवी झेलबाद केले तर अ‍ॅलिक अथानाझे सात धावा करुन वॉशिंग्टन सुंदरच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला.

वेस्ट इंडिजकडून पहिल्या डावात अ‍ॅलिक अथानाझेने सर्वाधिक ४१ धावा केल्या होत्या. कॅम्पबेलने १०, चंदरपॉलने ३४, होपने ३६, कर्णधार असलेल्या चेसने शून्य, यष्टीरक्षक इमलाचने २१, ग्रीव्हजने १७, पिअरेने २३, वॉरिकनने १, सील्सने १३ आणि फिलिपने नाबाद २४ धावांचे योगदान दिले. भारताकडून कुलदीप यादवने पाच, रवींद्र जडेजाने तीन तर मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी एक विकेट घेतली.

भारताची फलंदाजी

भारताने पहिल्या डावात पाच बाद ५१८ धावा केल्या आणि डाव घोषीत केला. भारताकडून यशस्वी जयस्वालने १७५, केएल राहुलने ३८, साई सुदर्शनने ८७, कर्णधार शुभमन गिलने १२९, नितीश रेड्डीने ४३, यष्टीरक्षक ध्रुव जुरेलने ४४ धावांचे योगदान दिले. वॉरिकनने तीन आणि चेसने एक बळी घेतला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >