Saturday, October 11, 2025

टीनएजरसाठी व्हिज्युअलायझेशन तंत्र

टीनएजरसाठी व्हिज्युअलायझेशन तंत्र

आनंदी पालकत्व: डॉ.स्वाती गानू

मुलांची नेहमी अशी अडचण असते की, आम्हाला अभ्यासासाठी अजिबात मोटिव्हेशन नसतं. अभ्यास करावासाच वाटत नाही. स्वयंप्रेरणा नसते मग इच्छा होत नाही अभ्यासाची.

अशा वेळेस मुलांसाठी गोल सेटिंग केलेलं असलं तरी ध्येयप्राप्तीसाठी मुलं काहीही हालचाल करण्यास उत्सुक नसतात. टीनएजर्स मुलांकरता मग ‘व्हिज्युअलायझेशन तंत्र’ खूप उपयोगाला येते. हे तंत्र कौन्सिलिंगमध्ये वापरताना त्यांच्या यशस्वी होण्याचं जणू एक सजीव चित्र मुलांच्या डोळ्यांसमोर उभं केलं जातं. या तंत्रातून मुलांच्या मेंदूला जणू हे सारखं बजावलं जातं की तुम्ही वार्षिक परीक्षेत अमुक टक्के गुण मिळवले आहेत. अभ्यासाबरोबरच इतर क्षेत्रातही चांगले यश प्राप्त करण्यासाठी हे तंत्र मुलांना खूप उपयुक्त ठरतं.

अभ्यासासाठी व्हिज्युअलायझेशन प्रभावी का आहे?

जेव्हा तुम्ही अभ्यासाच्या प्रतिमा मानसिकदृष्ट्या तयार करता तेव्हा तुम्ही फक्त वाचत नसता. तुम्ही जणू मनाने त्याची एक प्रतिकृती, मॉडेल तयार करत असता. या मॉडेलमुळे कल्पनांशी तुम्ही जोडले जाता आणि माहिती चांगली लक्षात राहते.

संशोधन असं सांगतं की जेव्हा तुमच्यासमोर दृक आणि श्राव्य अशा पद्धतीने ज्ञान येते तेव्हा मेंदू त्याचा अर्थ सहज सोप्या पद्धतीने लावू शकतो. या दोन्ही प्रकारच्या माहितीचा अर्थ लावल्याने अभ्यास अधिक गतीने आणि खोलवर लक्षात राहतो.

आता पाहू या विषयवार हे व्हिज्युअलायझेशन टेक्निक कसे वापरू शकतो?

१) गणित - यामध्ये पिक्चर ग्राफ्स, भौमितिक आकार आणि इक्वेशन्स.

२) सायन्स - उदाहरणार्थ मॉलिक्युल्सना व्हिजुलाईज करा सेल्सना किंवा प्रयोगशाळेत केलेले प्रयोग डोळ्यांसमोर आणा.

३) भाषा - पात्रांच्या, कथांच्या मानसिक प्रतिमा तयार करा.

४) इतिहास - जणू एखादी डॉक्युमेंटरी उलगडावी तशी ऐतिहासिक चित्रकथा डोळ्यांसमोर आणा.

५)भूगोल - नकाशे आणि स्थाने आपल्या स्पेक्टिक मेमरीने व्हिज्युअलाइज करा. विषय नीट समजून घेण्यासाठी ड्रॉइंगचा वापर करा. आकृत्या ,तक्ते काढणे, तयार करणे, माईंड मॅप्स काढणे या पद्धतीने तुम्हाला अभ्यासातील गुंतागुंतीचा भाग समजून घ्यायला प्रभावीपणे मदत करतात.

कमी संघर्ष आणि अधिक प्रभावी असे हे अभ्यासासाठीचे व्हिज्युअलायझेशन टेक्निक म्हणजे निव्वळ कल्पना करणे किंवा संकल्पनांना कल्पनेत आणणे नाही, तर समजून अभ्यास करणे आहे.

कसे करायचे व्हिज्युअलायझेशन

१)स्पेसिफिक राहा. नुसतं मी चांगलं करणार आहे असं न म्हणता तुम्ही उत्तम रितीने प्रश्नपत्रिकेतील प्रश्न यशस्वीपणे सोडवत आहात असे म्हणा. चित्र तयार करा.

२) तुमच्या सगळ्या संवेदना वापरा. तुम्ही काय पाहताय, काय ऐकताय, कसं जाणवते तुम्हाला? अगदी गंधही कसा येतोय याची कल्पना करा. अधिकाधिक वास्तवाशी खरे खरे जोडून राहिलात, तर तुम्हाला नक्कीच रिझल्ट्स मिळतील.

३) सकारात्मक राहा. आत्मविश्वास महत्त्वाचा आहे काल्पनिक चित्र मनात तयार केलं, तर तुम्ही यशस्वी व्हाल. कारण तुम्हाला त्यातून प्रेरणा मिळते.

अभ्यासासाठी व्हिज्युअलायझेशनची सगळ्यात चांगली टेक्निक्स तयार करा.

१) माइंड मॅप्स

सुरुवातीला मध्यभागी धड्याचे शीर्षक घ्या मग त्यांचे उपमुद्दे. मूळ झाडाच्या फांद्या जणू. रंग द्या. आकृत्या तयार करा. चिन्ह वापरा. जेणेकरून धडा तुमच्या लक्षात राहील. दोन आकृत्या आणि फ्लोचार्ट त्यामुळे तुम्हाला दोन घटक, प्रक्रिया याच्यातील संबंध लक्षात राहतील विशेषतः शास्त्र आणि इतिहासासाठी हे उपयोगाला येईल.

३) इनफोग्राफिक म्हणजेच माहिती देणारे डिझाइन्स तयार करा. डेटा आणि माहिती, चित्र, चिन्हे, चार्ट आकृत्याद्वारे कॉम्प्लिकेटेड कल्पना सोप्या पद्धतीने समजून घेता येतात. जणू गोष्ट सांगणे.

४) फ्लॅश कार्ड तयार करा छोट्या आकृती आणि छोटे की वर्ड्स, फ्लॅश कार्ड तयार करण्यासाठी वापरा. त्यातून तुमची आठवण अधिक पक्की होईल.

५) दृकश्राव्य साधनांचा वापर अभ्यासात करा. व्हिडिओ किंवा ॲनिमेशन जरूर पाहा विशेषतः फिजिक्स आणि जीवशास्त्रासाठी.

यासाठी मुलांना आधी त्यांचं ध्येय ठरवायला सांगितलं जातं जसं की एस. एस. सी.च्या परीक्षेत मी ९० % गुण मिळवणार आहे, ज्या वेळेला सेशन सुरू होतं त्यादरम्यान मुलांना खालील प्रमाणे सूचना दिल्या जातात.

डोळे बंद करून श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करा. एकदा का दहा सेकंदात श्वासाला नैसर्गिक लय प्राप्त झाली की कौन्सिलर सूचना देतात.

१) परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे.

२) मी वेळापत्रक तयार केले आहे.

३)वेळापत्रकानुसार शाळा, क्लासचा वेळ सोडून माझी स्वतःची अभ्यासाची बैठक चार तासांची आहे.

४) मी स्वतः नोट्स काढल्याने माझा आत्मविश्वास वाढला आहे.

५) मी लेखन कौशल्य अर्थात रायटिंग स्किल आकृत्या, नकाशे, निबंध, सूत्रे, नियम, व्याख्या यांचा रोज ठरवल्याप्रमाणे सराव, प्रॅक्टिस करतोय.

६) अभ्यास करताना पेपर पॅटर्न आणि गुणांचे वेटेज याला अनुसरून अभ्यास करतो आहे.

७) अखेरीस परीक्षेचा दिवस उगवला. हृदय धडधडतेय. पण प्रश्नपत्रिका पाहून मी खूश झालो. सगळे पेपर छान गेले. आज निकालाचा दिवस. ऑनलाइन रिझल्ट पाहिला. ९० टक्के मार्क्स मिळाल्याने मी आनंदी झालो माझे आणि माझ्या घरच्यांचे स्वप्न पूर्ण झाले.

अशा प्रकारे व्हिज्युअलायझेशन हे टेक्निक मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी खूप उपयोगी ठरते.

Comments
Add Comment