
नवी दिल्ली : अतिरेकी भिंद्रनवाला आणि समर्थक शस्त्रसाठा घेऊन शिखांच्या पवित्र सुवर्ण मंदिरात लपले होते. या अतिरेक्यांना जीवंत अथवा मृत अवस्थेत पकडण्यासाठी ऑपरेशन ब्लू स्टार करण्यात आले. या ऑपरेशनविषयी बोलताना काँग्रेस नेते आणि देशाचे माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी धक्कादायक वक्तव्य केले. अतिरेक्यांना पकडण्याची ती पद्धत चुकली, असे पी. चिदंबरम म्हणाले.
ऑपरेशन ब्लू स्टार तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मंजुरीनंतर राबवण्यात आले होते. पण या ऑपरेशनद्वारे अतिरेक्यांना पकडण्याची पद्धत चुकीची होती, असे म्हणणाऱ्या चिदंबरम यांनी पुढे आणखी एक धक्कादायक वक्तव्य केले. ऑपरेशन ब्लू स्टार संदर्भातले निर्णय घेणारे राजकारणी, गुप्तचर आणि लष्करी अधिकारी असे सर्वजण चुकले. त्यांच्या चुकांचे परिणाम नंतर भोगावे लागले, असे पी. चिदंबरम म्हणाले. या चुकांमुळेच तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना जीव गमवावा लागला होता, असेही पी. चिदंबरम म्हणाले.
पी. चिदंबरम यांच्या या वक्तव्यांमुळे काँग्रेसचे नेतृत्व चिदंबरम यांच्यावर नाराज असल्याचे समजते. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी असे भाष्य करणे बरोबर नाही या शब्दात काँग्रेसच्याच काही नेत्यांनी चिदंबरम यांच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली.
शनिवारी हिमाचल प्रदेशातील कसौली येथे झालेल्या खुशवंत सिंग लिटररी फेस्टिव्हलमध्ये चिदंबरम म्हणाले होते की, “ऑपरेशन ब्लू स्टार ही एक चूक होती आणि पंतप्रधान इंदिरा गांधींना या चुकीसाठी आपला जीव गमवावा लागला.”
भारतीय सैन्याने शीख धर्माच्या अतिशय पवित्र स्थळांपैकी एक असलेल्या सुवर्ण मंदिरावर कारवाई केली. या लष्करी मोहिमेत अकाल तख्ताचे मोठे नुकसान झाले, ज्यामुळे शीख समाजामध्ये तीव्र नाराजी आणि संताप उसळला.
ऑपरेशन ब्लू स्टार हा १ ते १० जून १९८४ दरम्यान अमृतसरमधील सुवर्ण मंदिरातून दमदमी टकसालचा प्रमुख भिंद्रनवाला आणि त्याच्या समर्थकांना हटवण्यासाठी राबवलेलय लष्करी कारवाईचा भाग होता. त्याच वर्षी ३१ ऑक्टोबर रोजी इंदिरा गांधी यांची त्यांच्या शिख अंगरक्षकांनी हत्या केली होती.