Sunday, October 12, 2025

डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत आगामी मराठी चित्रपट 'आशा'ची विशेष स्क्रीनिंग! आशा सेविकांचा भरभरून प्रतिसाद

डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत आगामी मराठी चित्रपट 'आशा'ची विशेष स्क्रीनिंग! आशा सेविकांचा भरभरून प्रतिसाद

मुंबई: जागतिक कन्या दिनानिमित्त 'आशा' या चित्रपटचे विशेष स्क्रिनिंग आयनॉक्स, नरिमन पॉईंट येथे पार पडले. या विशेष स्क्रिनिंगला खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांची खास उपस्थित होती. तसेच केंद्रीय राज्य मंत्री प्रतापराव जाधव, शिवसेना राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन.सी देखील उपस्थित होते. महिलांच्या सामर्थ्याचा आणि आशा सेविकांच्या निःस्वार्थ कार्याला प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी दिग्दर्शक दीपक पाटील, निर्माते दैवता पाटील आणि निलेश कुवर यांनी केलेल्या प्रयत्नाला जवळपास ५०० आशा आणि अंगणवाडी सेविकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

या विशेष स्क्रिनिंगवेळी चित्रपटाच्या निर्मात्या दैवता पाटील म्हणाल्या, "एखादी स्त्री जेव्हा घराच्या चौकटीबाहेर पाऊल टाकते, तेव्हा तिला असंख्य अडचणींना सामोरे जावं लागतं. कधी घराबाहेरचा विरोध, तर कधी घराच्या आतलाच संघर्ष. तरीही ती थांबत नाही. प्रत्येक अडथळा ओलांडत, ती स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत पुढे जाते. 'आशा' चित्रपटातील नायिकाही अशीच आहे. आशा सेविका म्हणून काम करत असली, तरी ती हे फक्त नोकरी म्हणून करत नाही, तर तिच्यासाठी ते एक आवड आणि ध्यास आहे. म्हणूनच तिची कहाणी ही फक्त एका आशा सेविकेची राहत नाही, तर ती प्रत्येक स्त्रीची कहाणी बनते. बाईपणाच्या संघर्षाची आणि सामर्थ्याची गोष्ट ठरते."

तर डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, चित्रपट हे समाजप्रबोधनाचं एक प्रभावी आणि सशक्त माध्यम आहे. समाजातील विविध प्रश्न, भावना आणि संघर्ष जर चित्रपटाच्या माध्यमातून मांडले गेले, तर त्यातून दिला जाणारा संदेश नक्कीच लोकांच्या मनापर्यंत पोहोचतो. समाजात परिवर्तन घडवून आणण्याची ताकद सिनेमात आहे आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे 'आशा' हा चित्रपट. दिग्दर्शक दीपक पाटील आणि निर्माते निलेश कुवर आणि दैवता पाटील यांनी समाजातील अत्यंत महत्त्वाचा पण आजवर दुर्लक्षित राहिलेला घटक आशा सेविका यांच्या जीवनावर हा चित्रपट साकारला आहे. आपल्या गावखेड्यात आरोग्यसेवा, जनजागृती आणि समाजहितासाठी अखंड झटणाऱ्या या महिलांची कहाणी पहिल्यांदाच चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर येत आहे. या सुंदर उपक्रमाबद्दल आणि संवेदनशील प्रयत्नाबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक."

आरोग्यसेविकांच्या सेवाभावावर आधारित या चित्रपटाला ६१ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांत सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट, दिग्दर्शक, अभिनेत्री आणि सहाय्यक अभिनेत्री या विभागांत पारितोषिके मिळाली आहेत. चित्रपटात मुख्य भूमिकेत महाराष्ट्राची लाडकी रिंकू राजगुरू समवेत सायंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट, दिशा दानडे, हर्षा गुप्ते, आणि दिलीप घारे यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा