
मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ओगदे गावाजवळील गारगाई नदी धरण बांधले जात असून या धरण प्रकल्पांतर्गत सहा गावांचे पुनर्वसन करून त्यांची पुनर्स्थापना करण्यात येणार आहे. त्यामुळे सहा गावांच्या ४०० हेक्टर जमिनींचे भौतिक सीमांकन आता केले जाणार आहे. यासाठी महापालिकेच्यावतीने सल्लागाराची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
मुंबईच्या पाणी पुरवठयामध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य शासनाने नेमलेल्या डॉ माधव चितळे यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनुसार मुंबई महापालिकेच्यावतीने शासनच्या मंजुरीने गारगाई पाणी प्रकल्पाचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला. सन २०१३ पासून म्हणजे तब्बल १२ वर्षांनंतरही या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झालेली नाही. गारगाई प्रकल्पामुळे ८५५ हेक्टर क्षेत्र बाधित होत असून यामध्ये खासगी वनेत्तर क्षेत्र १७० हेक्टर आहे तर वनक्षेत्र हे सुमारे ६७० हेक्टर एवढे आहे, रस्ते व इतर १५ हेक्टर एवढे आहे. हे वनक्षेत्र तानसा अभयारण्याचा विस्तारीत क्षेत्रात येत अभयारण्याच्या एकूण क्षेत्राच्या २टक्के एवढे हे क्षेत्र आहे. या प्रकल्पामुळे वाडा तालुक्यातील ओगदा व खोडदे ही गावे पूर्णत: बाधित आहेत. तर तिळमाळ, पाचघर व फणसगाव तसेच मोखोडे तालुक्यातील आमले ही गावे अंशत: बाधित होत आहेत.
तानसा अभयारण्यातील उत्तरेचा भाग पूर्णत: मानवविरहित करण्याकरता वन विभागाच्या अनुषंगाने तत्कालिन मुख्यमंत्र्यांनी ही सहा गावे पुनर्वसित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार देवळी येथील वनविकास महामंडळाच्या अखत्यारितील जागा सर्वानुमते मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे देवळी गावामध्ये सहा बाधित गावांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुनर्वसन केल्या जाणाऱ्या गावाच्या प्रत्यक्ष स्थळ निश्चितीसाठी येथील वृक्ष गणना करणे आणि तेथील जागेचे सीमांकन करणे गरजेचे असल्याचे नमुद केले आहे.
त्यामुळे डिफरेंशिअल ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम अर्थात डिजिपीएसच्या मदतीने हे सीमांकन केले जाणार असून जमिनी सिमेंटचे खांब रोवून ते रंगवणे आदी प्रकारची कामे सीमांकनाच्या कामांनुसार केली जाणार आहे. त्यामुळे प्रकल्प स्थळावर बसवलेल्या खांबांच्या निर्देशकांसह सीमांकनाचे नकाशे व क्षेत्रफळाची गणना वन विभागाकडून प्रमाणित करण्यात येणार आहे. या सीमांकनाच्या कामांसाठी पी.एन.शिधोरे सिव्हील इंजिनिअर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे. यासाठी सुमारे ८५ लाख रुपयांचा खर्च केला जाणार असून येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये सीमांकनाचे काम पूर्ण केले जाईल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या धरणाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर मुंबईकरांना दरदिवशी ४४० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होऊ शकतो,असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
गारगाई धारणाची वैशिष्ट्ये
धरणाची उंची : ६९ मीटर
धरणाची लांबी : ९५२ मीटर
गारगाई ते मोडकसागर दरम्यान बोगदा : २ किलोमीटर लांब
धरणामुळे बाधित क्षेत्र : ८५५ हेक्टर
धरणामुळे मुंबईला उपलब्ध होणारा पाणीसाठा : ४४० दशलक्ष लिटर
धरणामुळे बाधित कुंटुबांची संख्या : ६१९