Sunday, October 12, 2025

भारतीय आहाराविषयीच्या संशोधनात उघड झाली धक्कादायक माहिती

भारतीय आहाराविषयीच्या संशोधनात उघड झाली धक्कादायक माहिती

नवी दिल्ली : सध्या बहुसंख्य भारतीय जो आहार घेतात त्यात कर्बोदकांचे प्रमाण खूप जास्त आहे. या आहारात प्रथिने आणि हेल्दी फॅट्सचे प्रमाण कमी आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात आयसीएमआरने भारतीय आहाराविषयी केलेल्या ताज्या संशोधनाअंती हा धक्कादायक अहवाल दिला आहे. या असंतुलित आहारामुळे मधुमेह, स्थूलता, रक्तदाब अशा समस्यांनी त्रासलेल्यांची संख्या वाढू लागली आहे. नेचर मेडिसिनच्या जर्नलमध्ये आयसीएमआरचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

भारतातील पारंपरिक जेवण पद्धत संस्कृतीच्या मुळाशी खोलवर रुजलेली आहे. पण आधुनिक आहारातील पद्धतींमध्ये तातडीने सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. यासाठी आहारात प्रथिनेयुक्त पदार्थ आणि हेल्थी फॅट्सचा समावेश करणे गरजेचे आहे. हा बदल केला तर अनेक आजारांना आळा घालण्या मदत होईल. अंड, पनीर, ग्रीक योगर्ट, दही, कडधान्य, सोयाबीन किंवा टोफु, मासे, ड्रायफ्रुट्स यात प्रथिने आणि हेल्दी फॅट्स जास्त प्रमाणात असतात. यामुळे आधुनिक आहारात या पदार्थांचा समावेश करणे आवश्यक असल्याचे मत आयसीएमआरने व्यक्त केले आहे.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या अभ्यासात ३६ राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि राष्ट्रीय राजधानी प्रदेश (दिल्ली)मधील शहरी आणि ग्रामीण भागातील १.२१ लाखांहून अधिक प्रौढांचे सर्वेक्षण करण्यात आले. या अभ्यासात भारताच्या आहाराचा आणि पचनक्रियेत येणाऱ्या समस्यांचा सर्वात व्यापक आढावा घेण्यात आला. भारतीय आहारात दररोज ६२ टक्के फॅट कार्बोहायड्रेट्समधून येतात. हे कार्ब्स जास्त प्रमाणात पांढरा भात, दळलेले धान्य आणि साखरेतून येतात. त्यामुळे असे पदार्थ खाणे टाळावे, असे आयसीएमआरने आपल्या अहवालात नमूद केले आहे.

Comments
Add Comment