मराठी कादंबरीच्या इतिहासात श्री. ना. पेंडसे यांचे महत्त्वाचे स्थान आहे. गेल्या शंभर वर्षांतील मराठी कादंबरीकारात पेंडसे यांचे स्वतंत्र स्थान आहे. मराठी वाचकांच्या मनावर १९४० ते १९८० अशी चार दशके अधिराज्य गाजवले ते श्री. ना. पेंडसे या कोकणातील लेखकाने! त्यांनी कोकणच्या तांबड्या मातीतील सर्वसामान्य माणसाच्या चिवट लढाया वैश्विक केल्या. कोकणातील निसर्ग, तेथील सर्वसामान्य माणसे, संस्कृती त्यांच्या साहित्याच्या केंद्रस्थानी होते. त्यांच्या ‘रथचक्र’, ‘तुंबाडचे खोत’, ‘गारंबीचा बापू’ अशा एकापेक्षा एक कादंबऱ्या सरस ठरल्या. त्यांनी सर्वसामान्य माणसाच्या जगण्याचा नि मनाचा शोध त्यांच्या कादंबऱ्यांमधून घेतला.
कोकण आयकॉन: सतीश पाटणकर
मराठी कादंबरीच्या इतिहासात श्री. ना. पेंडसे यांचे महत्त्वाचे स्थान आहे. गेल्या शंभर वर्षांतील मराठी कादंबरीकारात पेंडसे यांचे स्वतंत्र स्थान आहे. मराठी वाचकांच्या मनावर १९४० ते १९८० अशी चार दशके अधिराज्य गाजवले ते श्री. ना. पेंडसे या कोकणातील लेखकाने! त्यांनी कोकणच्या तांबड्या मातीतील सर्वसामान्य माणसाच्या चिवट लढाया वैश्विक केल्या. कोकणातील निसर्ग, तेथील सर्वसामान्य माणसे, संस्कृती त्यांच्या साहित्याच्या केंद्रस्थानी होते. त्यांच्या ‘रथचक्र’, ‘तुंबाडचे खोत’, ‘गारंबीचा बापू’ अशा एकापेक्षा एक कादंबऱ्या सरस ठरल्या. त्यांनी सर्वसामान्य माणसाच्या जगण्याचा नि
मनाचा शोध त्यांच्या कादंबऱ्यांमधून घेतला.
कादंबरीकार, नाटककार म्हणून नावाजलेले श्री. ना. ऊर्फ श्रीपाद नारायण पेंडसे यांचा जन्म ५ जानेवारी १९१३ रोजी दापोली येथे झाला. १९२४ मध्ये पेंडसे मुंबईला स्थायिक झाले ते कायमचे. वयाच्या ११ व्या वर्षांपर्यंत त्यांनी जो कोकण पाहिला होता, आपल्या मनात साठवला होता, त्यावर ते आयुष्यभर लिहीत राहिले. मग तो साकव असेल, व्याघ्रेश्वराचे देऊळ असेल किंवा नारळी-पोफळीच्या बागा असतील. त्या त्यांच्या भावविश्वाचा अतूट भाग झालेल्या होत्या. श्री. ना. पेंडसेंना खासगीत शिरूभाऊ म्हणत. खासगीतील (कौटुंबिक) हे नाव त्यांच्या मित्रमंडळीत आणि पुढे लेखनाच्या क्षेत्रातही रूढ झाले. त्यांच्या नावाचा उल्लेख साहित्य प्रांतातही ‘पेंडसे’ असा होण्याऐवजी ‘शिरूभाऊ’ असाच होत होता, याची प्रचिती ‘श्री. ना. पेंडसे : लेखक आणि माणूस’ या त्यांच्या आत्मचरित्रातूनही येते. मुंबईत बेस्टमध्ये त्यांनी नोकरी केली. नोकरी करत असतानाच ते लिहीतही असत. वयाच्या विशितच त्यांनी लेखनाला सुरुवात केली. खडकावरील हिरवळ (१९४१) हे व्यक्ती चित्रांचे पहिले पुस्तक त्यांनी लिहिले. १९४६ च्या दरम्यान हिंदू-मुसलमानांचे दंगे होऊ लागले. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी एल्गार (१९४९) ही कादंबरी लिहिली. हद्दपार(१९५०), गारंबीचा बापू (१९५२), हत्या (१९५४), यशोदा (१९५७), कलंदर (१९५९), रथचक्र (१९६२), लव्हाळी (१९६६), ऑक्टोपस (१९७२), तुंबाडचे खोत (१९८८), गारंबीची राधा (१९९३), एक होती आजी (१९९५), कामेरू (१९९७) आदी अनेक कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. अनेक कादंबऱ्यांची नाट्य रूपांतरे केली. ‘हद्दपार’ या कादंबरीने त्यांचा आत्मविश्वास वाढवला. श्री.नां.च्या आईचे एक चुलते मुंबईला प्रख्यात शिक्षक होते. ते दामले मास्तर म्हणून ओळखले जात. श्री.नां.ना त्यांच्याविषयी कृतज्ञतेने बोलणारी अनेक माणसे भेटली. दामले मास्तरांचे गोड बोलणे, त्यांचा मुलांना कधीही न रागावण्याचा स्वभाव ही वैशिष्ट्ये श्री.नां.च्या मनात कायमची कोरली गेली. ‘हद्दपार’मध्ये आलेले राजेमास्तरांबाबतचे अनेक प्रसंग व घटना या दामले मास्तर आजोबांच्या जीवनात घडलेल्या होत्या. पेंडसे यांच्या यशाचा आलेख त्यानंतरच्या काळात, ‘गारंबीचा बापू’, ‘हत्या’, ‘यशोदा’, ‘कलंदर’ या कादंबऱ्यांनी चढता ठेवला. ‘गारंबीचा बापू’ ही हर्णे बंदराच्या परिसरात घडलेली कादंबरी. १९७४ साली श्री. ना. पेंडसे लेखक आणि माणूस हे त्यांचे आत्मचरित्रही प्रसिद्ध झाले. जवळपास पन्नास वर्षांहून अधिक अखंड लेखन त्यांनी केले.
साखरपेंडी, दापोली, हर्णे, मुर्डी, अंजर्ले आदी परिसरातील कोकणी प्रदेश, तेथील मानवी स्वभाव वैशिष्ट्यांसह पेंडसे यांनी आपल्या कादंबऱ्यांतून मांडलेला आहे. म्हणून त्यांना प्रादेशिक कादंबरीकर असेही म्हटले गेले. पण ही मर्यादा पेंडसेंना मान्य नव्हती. श्री. ना. पेंडसे यांच्या सर्वच कादंबऱ्या मुळातून वाचण्यासारख्या आहेत. निसर्ग, माणूस आणि समाज यांच्या परस्पर संबंधांचा पट ते फार ताकतीने मांडतात. हत्या ही पेंडसे यांची लोकप्रिय कादंबरी. ‘हद्दपार ‘ही कादंबरीही महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांच्या मनावर स्वाभिमानाचे संस्कार करणाऱ्या राजेमास्तरांची ही जीवन कहाणी आहे. ‘गारंबीचा बापू’ ही पेंडसे यांची बहुतेक सर्वात जास्त गाजलेली कादंबरी. गारंबी हे कोकणातील एक गाव. सत्तर वर्षांपूर्वी लिहिलेल्या कादंबऱ्या आणि इतरही लेखन आजही रसरशीत वाटते हेच पेंडसे यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. पेंडसे यांना निसर्ग आणि समाज या घटकांचे महत्त्व लेखनात मोठे वाटते. कादंबरीत जरी माणूस सर्वोच्च स्थानावर असला तरी त्याच्यासह निसर्ग आणि समाज आलाच पाहिजे. निसर्ग आणि समाज यांच्याशिवाय आपण माणसाची कल्पनाच करू शकत नाही. म्हणूनच माणसाइतकेच निसर्ग आणि समाज हे कादंबरीचे अपरिहार्य घटक आहेत. पेंडसे यांची लेखनविषयक भूमिका पक्की होती. खासकरून कादंबरीबाबत त्यांची काही मते होती. तुंबाडचे खोत ही त्यांची तब्बल दीड हजार पानांची कादंबरी आहे. आपल्या काही कादंबऱ्यांवर आधारित नाटकेही पेंडसे यांनी लिहिली. रथचक्र ही दूरदर्शनवरील मालिकाही त्यांच्याच कादंबरीवरील होती. कोकणातील निसर्ग, जिवंत व्यक्तिचित्रणे, नाट्यपूर्ण संवाद आणि ओघवते प्रवाही निवेदन यामुळे पेंडसे यांची कादंबरी चैतन्यपूर्ण होते.
श्री. ना. पेंडसेंना त्यांच्या लेखनासाठी अनेक पुरस्कार मिळाले. त्यात महाराष्ट्र शासनाचे पाच पुरस्कार (हद्दपार, हत्या, कलंदर, संभूसाच्या चाळीत व चक्रव्यूह), साहित्य अकादमी पुरस्कार, महाराष्ट्र फाऊण्डेशनचा जीवनगौरव पुरस्कार, हे काही उल्लेखनीय पुरस्कार म्हणता येतील. अशा या श्रेष्ठ कादंबरीकाराचे २३ मार्च २००७ रोजी निधन झाले.
(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)