
प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ
दोन-तीन महिन्यांपूर्वी नाशिकच्या हेमंत आणि नेहा सावंत नावाच्या एका तरुण जोडप्याने चहासाठी घरी बोलावले होते. आठ माणसांच्या मोठ्या डायनिंग टेबलवर आम्ही पाच-सहा माणसे गप्पागोष्टी करत नाश्ता करत होतो. टेबलच्या एका टोकाला हेमंत तर दुसऱ्या टोकाला नेहा बसली होती. त्यांची पाच वर्षांची मुलगी मुग्धा समोरच्या सोफ्यावर बाहुलीशी खेळत बसली होती. अचानक ‘बाबा बाबा’ करत ती हेमंतकडे धावत आली. तिच्या आवाजाने संवादाच्या मध्ये सुद्धा हेमंतने पटकन टेबलच्या टोकावर आपला तळवा ठेवला. मुग्धाने त्याच्या हातामध्ये बाहुली दिली आणि दुसरे खेळणे घेऊन ती इकडेतिकडे फिरत बसली. दोन-तीनदा जेव्हा ती हेमंतकडे आली तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळेस त्याचा हात टेबलाच्या टोकावर तो ठेवायचा. ही क्रिया नैसर्गिकरीत्या घडून येत होती, हे माझ्या लक्षात आले. त्या टेबलाचे टोक तिला लागू नये ही त्याची इच्छा दिसून येत होती. माणसे कितीही कामात असली तरी आपल्या माणसाची काळजी त्यांच्या मनात कुठेतरी खूप खोल दडून बसलेली असते. ती काळजी त्यांच्याकडून आपोआप घेतली जाते.
पाच दिवसांपूर्वी ट्रेनमधून प्रवास करताना एक माणूस आपल्या बाळाला खांद्यावर घेऊन ट्रेनच्या आतल्या छोट्याशा येण्या-जाण्याच्या मार्गावरून चालत होता. त्याने चांगल्या पंधरा-वीस फेऱ्या मारल्या असतील. या फेऱ्या मारताना तो त्याच्या भसाड्या आवाजात, बहुधा तमिळ भाषेत कोणते तरी गाणे गुणगुणत होता. त्या गाण्याचे बोल काही कळत नव्हते; परंतु त्या गाण्यामुळे बाळ निश्चितपणे झोपेकडे वळत होते. आसपासची माणसे त्याच्यासाठी असून नसल्यासारखी होती. त्याची पूर्ण तंद्री या मुलाला झोपवण्याकडे लागलेली होती. जेव्हा बाळ झोपले तेव्हा त्याने त्या बाळाला अलगद सीटवर ठेवले. त्याची मान ठीक केली आणि त्याच्या डोक्याभोवती टॉवेल गुंडाळून ठेवला. त्याची पत्नी केव्हाच झोपून घोरायला लागलेली होती. बाळाच्या झोपेइतकीच त्याला पत्नीची काळजी होती त्यामुळे त्याच्या सगळ्या हालचाली हळुवारपणे चाललेल्या होत्या. त्याने बाळाच्या अंगावर चादर घातली तेव्हा पत्नीच्याही अंगावरची चादर ठीक केली. मग तो शांतपणे बाळाच्या बाजूला झोपला तेव्हा त्याचे पंचवीस टक्क्यांपेक्षा जास्त अंग सीटच्या बाहेर आलेले होते. बाळाला थोडाही आपला स्पर्श होऊन धक्का लागू नये याची काळजी घेऊन तो त्याच विचित्र आणि त्रासदायक अवस्थेत झोपलेला होता. मी सकाळी उठले तरी तो काहीसा त्याच अवस्थेत होता.
खरंतर ही दोन्ही उदाहरणे आपल्या खूप जवळच्या माणसांसाठीची आहेत; परंतु अनेकदा काही माणसे काही क्षणांसाठी भेटतात. त्यानंतर कदाचित ती भेटणारही नसतात तरीही ती माणसे सहजी आपल्यासाठी काहीतरी करतात आणि त्या आठवणी कायमस्वरूपी मनावर कोरल्या जातात. अलीकडेच शेगावला शब्दवेल साहित्य संमेलनासाठी गेले असताना आम्ही ट्रेनमधून उतरून सरळ कार्यक्रमाच्या सभागृहाकडे गेलो आणि सभागृहाच्या आवारात राहण्याची व्यवस्था असल्यामुळे आसपासचा परिसराविषयी काही फारशी माहिती मिळू शकली नव्हती. अगदी सहज जाता जाता या कार्यक्रमाची व्यवस्था पाहणारे आणि स्वागताध्यक्ष असणारे विनायक भारंबे सर यांना विचारले की इथून रेल्वे स्टेशनपर्यंत जाण्यासाठी रात्री उशिरा रिक्षा किंवा टॅक्सी मिळू शकेल का? ते म्हणाले रात्री पावणेदोनची तुमची ट्रेन आहे मग तुम्ही आमच्याच घरी जेवायला या आणि मग मी तुम्हाला स्टेशनपर्यंत सोडतो. त्यानंतर आम्ही त्यांच्यासोबत त्यांच्या घरी गेलो आणि जेवून तृप्त झालो. त्यांच्या पूर्ण परिवाराबरोबर खूप साऱ्या गप्पा करून त्यांच्याच गाडीतून स्टेशनपर्यंत गेलो. तरी हातात तासा दोन तासाचा वेळ होता. म्हणून वेटिंग रूममध्ये शांतपणे दोन दिवसांच्या कार्यक्रमात राहून गेलेल्या अनेक गोष्टींची पूर्तता हातात मोबाईल घेऊन करत राहिलो.
इतक्यात आम्हाला महाराष्ट्राचे लाडके कवी-गीतकार नितीन वरणकार यांचा फोन आला. त्यांना कळले की मी आणि अश्विनी दोघीच रात्री पावणेदोनच्या ट्रेनसाठी रेल्वे स्टेशनवर वेटिंग रूममध्ये आहोत. त्यांनी आम्हाला घरी घेऊन जाण्यासाठी येतो सांगितले पण इतक्या रात्री असे कोणाच्या घरी जाणे प्रशस्त वाटले नाही म्हणून आम्ही ‘नाही’ म्हणालो. त्यानंतर अर्धा तासात ते घरून गरम गरम ज्वारीचे गोड धपाटे आणि झणझणीत मिरचीचा ठेचा शिवाय प्रसाद आणि खाऊसुद्धा घेऊन सरळ वेटिंग रूममध्ये आले तेव्हा साधारण रात्रीचे १२.३० वाजून गेले होते. ही गाडी सकाळी १२ वाजता मुंबईला पोहोचते तेव्हा नाष्टा आपण करावा, असे सहज हसत हसत ते म्हणाले. काय म्हणावे? कार्यक्रमाच्या निमित्ताने वरणकार आणि भारंबे हे दोन्ही कुटुंबीय सकाळी ६ पासून दिवसभर आमच्यासोबत कार्यक्रमात होते. तरी त्यांनी आमची एवढी रात्री उशिराची सरबराई केली. दुसऱ्या दिवशी त्यांनाही नोकरी इत्यादी आपले व्यवहार होतेच की! आम्हाला ट्रेनसाठी जागे राहणे आवश्यक होते; परंतु आमच्या प्रवासाचा विचार करून ही दोन कुटुंबं नुसतीच जागली नाही तर राबलीसुद्धा! या प्रसंगाच्यानिमित्ताने खरंतर अशा अनेक माणसांची मी आठवण करते की ज्यांनी माझ्यासाठी खूप काही केले आहे, त्या बदल्यात त्यांच्यासाठी मला काही करण्याची संधी मिळाली नाही. असो... परंतु वयपरत्वे असेल अलीकडे मी माझ्या मनाला कशा तऱ्हेने समजावते ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. जसे आई-वडील आपल्या मुलांना जन्म देतात आणि त्यांना वाढवतात. त्यानंतर त्यांची मुले त्यांच्या अपत्यांना जन्म देतात आणि वाढवतात. त्यामुळे आपल्यासाठी कोणी काही केले असेल तर त्या बदल्यात आपल्याला त्यांच्यासाठी तेच किंवा आणखी काही करता येईलच असे नाही; परंतु आपल्याला निश्चितपणे अशा कोणासाठी तरी काहीतरी करता येईल ज्यांना त्या क्षणी, त्या गोष्टीची गरज असेल!
देणाऱ्याने देत जावे; घेणाऱ्याने घेत जावे; घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे !
विंदा करंदीकर यांच्या कवितेच्या या दोन ओळींचा मथितार्थ मात्र कायमस्वरूपी प्रत्येकाने लक्षात ठेवावा!
pratibha.saraph@ gmail.com