
मुंबई : मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कबुतरखाने बंद केल्यामुळे मृत्यू झालेल्या कबुतरांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी जैन समुदायाकडून दादरच्या योगी सभागृह येथे प्रार्थना सभेचे आयोजन केले होते. या धर्मसभेत जैन मुनींनी राजकीय पक्षाची स्थापना केल्याची घोषणा केली. कबुतर आणि इतर प्राण्यांच्या संरक्षणासाठी ‘शांतीदूत जनकल्याण पक्ष’ स्थापन करत असल्याचे जैन मुनींनी जाहीर केले. जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी दादरच्या धर्मसभेनंतर पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली.
मुंबईतील जैन समाज सर्व समाजाच्या मदतीसाठी धावून जातो. आम्ही महाराष्ट्राच्या पूरग्रस्तांसाठी दोन कोटी रुपयांचा निधी देणगी स्वरूपात दिला. आमच्या मुद्द्यांसाठी कोणीही पुढे येताना दिसत नाही. यासाठी आम्हाला राजकीय पक्ष स्थापन करावा लागत आहे. शांतीदूत असलेले कबुतर हे चिन्ह असेल. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आम्ही उतरू. प्रत्येक वॉर्डात आमचे उमेदवार उभे राहतील,’ असे नीलेशचंद्र विजय म्हणाले.