पाण्यावर लहरी कशा निघतात?

कथा : प्रा. देवबा पाटील


बरं का मुला-मुलींनो! जगदेवरावांना दोन मुली होत्या. सीता आणि नीता. ह्या दोघी जुळ्या बहिणी होत्या. वयाने असतील अंदाजे तुमच्याच वयाच्या. रंगरूपाने तशा साधारणच पण दिसायला एकदम सारख्या नि बुद्धीनेही समसमान. शरीराने, चेह­ऱ्याने व आकारानेही तर हुबेहूब एकसमान. दोघीजणी जशा काही एकमेकीच्या झेरॉक्स प्रतीच. दोघींनी जर सारखेच कपडे घातले तर त्या इतक्या सारख्या दिसायच्या की ह्यातील सीता कोणती आणि नीता कोणती हे त्रयस्थांना ओळखणेच कठीण. अर्थात आईबाबा मात्र प्रत्येकीला वेगवेगळेपणे अचूक ओळखायचे. कारण त्यांच्यावर जीवापाड समसमान प्रेम करणारे ते त्यांचे आईबाबा होते ना!
अशा ह्या सीता आणि नीता दोघीही बहिणी आज अतिशय आंनदात होत्या. आज त्यांची मावशी त्यांच्या घरी आली होती. संध्याकाळ झाली तशी सीता आणि नीता यांची उत्सुकता शिगेला पोहोचली. त्यांनी मावशीच्या मागे लकडाच लावला. शेवटी आईची रजा घेऊन मावशी व त्या दोघीजणी गच्चीवर गेल्या. गच्चीच्या पश्चिमेकडील उंच भिंतीच्या सावलीतील चटईवर तिघीही खाली बसल्या नि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या.
“मुलींनो, तुम्हाला तरंगलांबी म्हणजे काय असते हे माहीत आहे का?” मावशीने प्रश्न केला.


“नाही मावशी.” दोघींनीही उत्तर दिले.
“तुम्ही नदीकिनारी किंवा एखाद्या तलावाच्या काठावर कधी गेल्या आहेत काय?” मावशीने विचारले.
“हो मावशी. आईसोबत धुणे धुण्यासाठी आम्ही नदीवर ब­रेचदा गेल्या आहोत. काठावरील उथळ पाण्यात मस्तपैकी खेळलो आहोत.” सीताने सांगितले.
“आणि काठाजवळील उथळ पाण्यात मस्तपैकी डुंबलोसुद्धा आहोत, पण पोहलो मात्र नाहीत.” नीताने सांगितले.
“का गं, तुम्हाला पोहणे येत नाही का?” मावशीने विचारले.
“आम्हाला आईने नदीत कधीच पोहू दिले नाही.” सीता बोलली.
“आणि पोहणेही कधीच शिकवले नाही. मग आम्हाला पोहणे कसे येईल?” नीताने मावशीलाच प्रश्न केला.
“बरे, त्याबद्दल मी आईशी उद्या बोलेन. पण तुम्ही नदीच्या संथ पाण्यामध्ये एखादा खडा टाकून बघितले आहे काय?” मावशीने विचारले.
“अनेकदा मावशी” दोघीही म्हणाल्या. “संथ पाण्यामध्ये एखादा खडा टाकल्यास काय घडते?” मावशीने प्रश्न केला.
“खडा टाकलेल्या जागेपासून पाण्याच्या गोलाकार अशा असंख्य लहरी पुन्हा पुन्हा निघतात.” नीताने उत्तर दिले व “पण त्या लहरी कशा काय निघतात मावशी?” असा प्रश्नही केला.
“पाण्याचे रेणू एकमेकांपासून थोडेसे अंतरावर असतात त्यामुळे त्यांच्यामधील आकर्षण किंचितसे कमी असते. पाण्यात जेव्हा आपण खडा टाकतो तेव्हा तो जेथे पडतो तेथील पाण्याच्या कणांमध्ये म्हणजे रेणूंमधील हालचाल वाढते व ते क्षणभर किंचितसे एकमेकांपासून दूर जातात. त्यामुळे त्यांच्या सभोवतालच्या सर्व बाजूंच्या रेणूंनाही त्यांचे धक्के बसतात. हा परिणाम सर्व दिशांनी सारखाच घडतो. त्यामुळेच तेथे वर्तुळाकार लहरी निर्माण होतात. लहरीलाच तरंगसुद्धा म्हणतात.” मावशीने खुलासा केला.


“पण त्या लहरी पाण्यात पुढे पुढे कशा जातात?” सीताने शंका काढली.
मावशी म्हणाली, “एकाच माध्यमात होणारी अनियमित स्वरूपाची आणि पुन्हा पुन्हा घडणारी हालचाल अशी तरंगाची व्याख्या होय. ह्या तरंगांची हालचाल होत असल्यामुळे म्हणजेच पाण्याच्या रेणूंमध्ये खेचाखेच होत असल्यामुळे प्रत्येकवेळी ते सभोवतालच्या रेणूंना धक्के देत राहतात. पाण्याच्या पृष्ठभागावर हे धक्के पसरत जातात. परिणामी वर्तुळाकार तरगांचा आकारही वाढत जातो. अशा त्या लहरी पाण्यात पुढे पुढे जात राहतात. तरंगाच्या दोन शिखरांमधील वा उंचवट्यांमधील अथवा खोलवट्यांतील किंवा कोणत्याही दोन समान अवस्थांमधील अंतर म्हणजेच तरंगलांबी होय. अथवा तरंगाच्या एका शिखरापासून ताबडतोब येणा­ऱ्या दुस­या शिखरापर्यंतची लांबी म्हणजे तरंग लांबी.”


“बरं का मुलींनो, आज मी प्रवास करून आले आहे. त्यामुळे खूप थकले आहे. तरी आपण आपली ही चर्चा आता थांबवू या व उद्या संध्याकाळी पुन्हा गच्चीवर येऊ. त्यावेळी मी तुम्हाला आणखी नवीन वेगळी छान छान माहिती सांगेल. चालेल ना?” मावशीने त्यांना विचारले. त्यांनीही हो म्हटले व त्या तिघीही गच्चीवरून खाली आल्या.


Comments
Add Comment

सरत्या वर्षाच्या उंबरठ्यावर...!

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ एक कथा कुठेतरी वाचल्याचे आठवत आहे, जी माझ्या पद्धतीने मी फुलवून सांगण्याचा

२०२५ वर्षात काय कमावले, काय गमावले

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर मानवी जीवनात प्रत्येक वर्ष हे अनुभवांचे दालन उघडते. २०२५ हे वर्षही तसेच

भाषणाची भीती

कथा : रमेश तांबे  एक होता राजा. त्याच्या राज्याचा एक नियम होता की जो कोणी चोर सापडेल त्याला भुकेलेल्या सिंहाच्या

सूर्य पूर्वेकडेच का उगवतो?

कथा : प्रा. देवबा पाटील सीता व नीता या दोन्ही बहिणी खूपच चौकस होत्या. सुट्टीनिमित्ताने त्यांची प्राध्यापिका

आकाश रात्री काळे का दिसते?

कथा : प्रा. देवबा पाटील आज शाळा सुटल्यांनतर घरी येताबरोबर सीता व नीता या दोघीही बहिणींनी “मावशी” म्हणून आनंदाने

मानवतावादी कलाकार...

कथा : रमेश तांबे बालमित्रांनो, ही गोष्ट आहे युरोपमधल्या एका प्रसिद्ध गायकाची आणि त्याच्या वागण्याची! एका देशात