महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे
कश्यप ऋषी व त्यांची पत्नी दिती यांना हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष व लहान बहीण होलिका अशी तीन अपत्ये होती. यापैकी हिरण्याक्षचा वध श्री विष्णूंनी वराह अवतारात केला. तेव्हा हिरण्यकश्यपू अतिशय क्रोधित झाला. त्याने आपल्या सेवकांना भगवान विष्णूचे नाव घेणाऱ्यांना ठार करण्याचा व त्रास देण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे त्याच्या राक्षस सेवकांनी पृथ्वीवर हाहाकार माजविला.
हिरण्यकश्यपू स्वतः अजय व अमर होण्याच्या उद्देशाने मंदराचलाच्या दरीत जाऊन ब्रह्मदेवाची तीव्र तपश्चर्या करू लागला. त्याच्या कठोर तपश्चर्येने प्रसन्न होऊन ब्रह्मदेव प्रकट झाले व त्याला वर माग म्हणाले. घोर तपश्चर्येने त्याच्या अंगावर वारूळ वाढले होते तसेच त्या वारुळातील मुंग्यांनी त्याचे शरीर खाऊन केवळ हाडांचा सापळा शिल्लक ठेवला होता. हे पाहून ब्रह्मदेवाने त्याच्या अंगावर मंत्रयुक्त पाणी प्रोक्षण करताच त्याचे शरीर पूर्ववत झाले. ब्रह्मदेवांनी त्याला वर मागण्यास सांगितले. प्रत्यक्ष ब्रह्मदेवाला पाहून हिरण्यकश्यपूला फार आनंद झाला. त्याने ब्रह्मदेवाची स्तुती करून त्यांना नमस्कार केला व “तुम्ही निर्माण केलेल्या कोणत्याही प्राण्यांपासून म्हणजे देव दानव वसू मानव नाग यांच्यापासून मला मृत्यू येऊ नये तसेच दिवसा, रात्री, घरात, बाहेर, जमिनीवर, आकाशात तसेच कोणत्याही शस्त्राने मला मृत्यू येऊ नये. युद्धात माझा सामना करणारा कोणीही नसावा मी सर्व प्राण्यांचा अधिपती असावा. तसेच मला इंद्र व अन्य सर्व लोकपालना ऐश्वर्य मिळते ते मला मिळावे ब्रह्मदेवाने तथास्तू म्हणून त्याची इच्छा पूर्ण केली.
ब्रह्मदेवाकडून मिळालेल्या वराने हिरण्यकश्यपूचे शरीर कांतीमान झाले. विष्णूने आपल्या भावाची हत्या केल्याचे आठवून तो भगवंताचा द्वेष करू लागला. त्याने सर्व लोकांत आपला अधिकार निर्माण केला व तीनही लोकांत भगवंताचे नाव घेणाऱ्या व्यक्तींची हत्या करण्यासाठी आपल्या सेवकांना आज्ञा केली. त्याप्रमाणे ऋषी, मुनी, असूर, नाग, यक्ष, विद्याधर आदी सर्वांवर विजय प्राप्त करून त्यांना आपले वश करून घेतले. त्याच्या समोर अप्सरा गंधर्व सुद्धा गायन करीत असत. त्याच्या भीतीने देव-देवता त्याला वंदन करीत. ब्रह्मदेवाच्या वराने त्याला पूर्ण ऐश्वर्याची प्राप्ती झाली होती. त्याने आता आपण स्वतःच ऐश्वर्या संपन्न व सामर्थ्यवान असल्याने सर्वांनी आपलीच पूजा करावी असा आदेश दिला. देवाचे नाव घेण्यास अथवा त्यांची पूजा करण्यावर त्यांने बंदी केली. त्याच्या या कृत्यामुळे तिन्ही लोकांत हाहाकार माजला. त्याच्या सैनिकांच्या अत्याचाराने त्रस्त व भयभीत झालेल्या देवतांनी भगवान श्रीहरीला साकडे घातले व हिरण्यकश्यपूच्या जाचातून मुक्त करण्याची विनंती केली. भगवान विष्णूने सुद्धा देवताना आधार देऊन योग्य वेळ येताच मी त्याचा नायनाट करीन असे आश्वासन दिले.
हिरण्यकश्यपूला चार मुले होती. सर्वात लहान मुलाचे नाव प्रल्हाद होते. तो सर्वात लहान असूनही गुणांच्या बाबतीत सर्वात श्रेष्ठ होता. तो विष्णुभक्त सदाचरणी सत्यवचनी व सद्गुणी होता. लहानपणापासूनच भगवंताच्या नामस्मरणात व ध्यानात तन्मय होत असे. भगवंताने आपल्याला मिठीत घेतले व आपण त्याच्याशी बोलतो आहे, असे त्याला सारखे वाटत असे. हिरण्यकश्यपूने त्याला गुरुकुलात शिक्षण घेण्यासाठी पाठविले. गुरुकुलातही प्रल्हाद श्रीविष्णूंच्या नामस्मरणात मग्न असे तो स्वतः नामस्मरण करीत असे तसेच इतरांनाही नामस्मरणासाठी प्रवृत्त करीत असे. गुरुजींनी प्रल्हादाला समजावण्याचा प्रयत्न केला; परंतु प्रल्हादाची ईश्वर भक्ती ते दूर करू शकले नाही. उलट प्रल्हादाने आपल्या सवंगड्यातही नामस्मरणाचा प्रसार केला. अखेर गुरुकुलाचे शिक्षण पूर्ण झाल्यावर तो घरी आला. हिरण्यकश्यपूने तू काय शिकले याची चौकशी केली असता त्याने श्री विष्णूंचे गुणगान करून दाखविले. ते एकून राग अनावर झालेल्या हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला ठार करण्याची आज्ञा दिली. सेवकांनी त्याला मदोमत्त हत्तीचे पायी दिले, विषारी साप डसविले, अभिचार कर्म करविले, पर्वताच्या कड्यावरून खाली ढकलले, अंधाऱ्या कोठीत बंद केले, विष पाजले, त्याचे खाणे-पिणे बंद केले; परंतु प्रल्हादाच्या विष्णू भक्तीत कोणताही बदल झाला नाही, या सर्व बाबीतून तो सुखरूप वाचला. तेव्हा हिरणयकश्यपूने आपली बहीण होलिका हिच्यासोबत त्याला चिता रचून जाळले. होलिकेला अग्नी काहीही अपाय करणार नाही असा आशीर्वाद होता; परंतु या वराचा उपयोग होलिका दुष्कृत्य करण्यासाठी वापरत असल्यामुळे होलिका जळून भस्म झाली व प्रल्हाद वाचला. आता हिरण्यकश्यपूला काळजी वाटू लागली. एके दिवशी प्रल्हाद हिरण्यकश्यपू समोर उभा असताना त्याने प्रल्हादाला तू कोणाच्या भरवशावर भीती नसल्याप्रमाणे वागतो? माझ्यापेक्षा मोठा जो कोणी जगाचा स्वामी आहे म्हणतोस व तो सर्वत्र आहे, म्हणतो तो या खांबात आहे का? असे म्हणून त्या खांबावर ठोसा मारला. तोच खांब दुभंगून भयंकर मोठी गर्जना करीत अर्धे शरीर मानवाचे व मुख सिंहाचे असलेल्या अवतारात भगवान श्री विष्णू प्रकट झाले. हिरण्यकश्यपू त्याला मारण्यासाठी गदा घेऊन सरसावला. तोच भगवान नृसिंहांनी त्याला पकडून दरवाजात नेले व आपल्या मांडीवर ठेवून आपल्या नखांनी त्याचे पोट फाडून ठार केले. हे पाहताच देव-देवतांनी आकाशातून भगवंतावर पुष्पवृष्टी केली. मात्र भगवंताचे ते क्रोधायमान रूप पाहून कोणालाही त्यांचे जवळ जाऊन त्यांचा राग शांत करण्याची हिंमत झाली नाही. तेव्हा ब्रह्मदेवांनी भक्त प्रल्हादाला त्यांचे समोर उभे केले. प्रल्हादाने त्यांची स्तुती केली तेव्हा त्यांचा राग शांत झाला. वास्तविक हिरण्यकश्यपू व हिरण्याक्ष हे पूर्वाश्रमीचे विष्णूचे द्वारपाल जय व विजय असून सनकादिक ऋषींच्या शापाने त्यांना तीन जन्म राक्षस योनीत जन्म घ्यावा लागला. पहिल्या जन्मात हिरण्यकश्यपू व हिरण्याक्ष, दुसऱ्या जन्मात रावण व कुंभकर्ण व तिसऱ्या जन्मात शिशुपाल व दंतवक्र झाले व प्रत्येक जन्मात विष्णूने अवतार घेऊन त्यांना मुक्ती दिली असे भागवतात सांगितले आहे.