
माणगाव-दिघी-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सुरू असलेल्या अवजड वाहतूक आणि अतिवृष्टीने पडलेले खड्डे भरून काढावेत तसेच खारगाव खुर्द आणि सकलप गावाजवळ एसटी पिकअप शेड उभारावी अशी मागणी माजी सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा चिटणीस महादेव पाटील यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ कार्यकारी अभियत्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिघी म्हसळा माणगाव रस्त्यावर अनेक छोटे मोठे पूल असून त्या पुलांवर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच रस्त्यालगत वाढलेल्या झाडांमुळे वळणांवर समोरून येणारी वाहने स्पष्ट दिसत नाहीत. परिणामी, अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने या रस्त्याची तातडीने डागडुजी व झाडांची छाटणी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. रस्त्यालगत असणारी खारगाव खुर्द आणि सकलप ही महसूली गावे असून येथील गावांची लोकसंख्या सुमारे दोन हजाराचे घरात आहे.
मात्र, आजपर्यंत या गावांना एसटी पिकअपसाठी एकही निवारा शेड उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे यापूर्वी शेड अस्तित्वात होती. मात्र, रस्त्याचे काम सुरू असताना ती हटवण्यात आली. नंतर ती पुनः उभारण्यात आलेली नाही. या संदर्भात माजी सभापती महादेव पाटील यांनी तत्कालीन कार्यकारी अभियंता निफाडे आणि संबंधित ठेकेदाराच्या प्रतिनिधींशी वेळोवेळी संपर्क साधला तसेच लेखी पत्रव्यवहाराद्वारेही ही मागणी लावून धरली होती. परंतु,आश्वासन दिल्यानंतरही प्रत्यक्षात काहीच काम झालेले नाही.
या पार्श्वभूमीवर, खारगाव खुर्द गावाजवळ आणि सकलप येथील तोंडसुरे बायपास भागात एसटी पिकअप निवारा शेड उभारण्यात यावा, अशी मागणी महादेव पाटील यांनी पुन्हा एकदा केली आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ कार्यकारी अभियंत्यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून लवकरच कार्यवाही होईल अशी अपेक्षा महादेव पाटील यांनी व्यक्त केली आहे.