Sunday, October 12, 2025

गोरेगावमध्ये खुलेआम कबुतरांना खाद्य देणे सुरूच

गोरेगावमध्ये खुलेआम कबुतरांना खाद्य देणे सुरूच

मुंबई : न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबईतील कबुतर खाने बंद केले जात असतानाच गोरेगाव पश्चिम भागातील जवाहर नगर परिसरातील हिराबाई पटेल मार्गावरील जैन मंदिराजवळील कबुतर खाना आजही सुरुच आहे. याठिकाणी कबुतरांना खुलेआम खाद्य टाकले जात असून एका बाजुला न्यायालयाच्या निर्देशानुसार सर्वच कबुतर खाने बंद करण्यात येत असतानाच गोरेगाव पश्चिममधील कबुतरखाना सुरु असतानाच महापालिकेच्या पी दक्षिण विभागाचे अधिकारी डोळेझाक का करत आहेत,असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मुंबईतील दादर कबुतर खान्यावर कारवाई करून मुंबई महापालिकेने न्यायालयाच्या निर्देशानुसारच सर्व कबुतर खाने बंद करण्याच्या सूचना प्रत्येक विभागातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मात्र, इतर विभागांमध्ये न्यायालयाच्या निर्देशाचे पालन होत असले तरी गोरेगाव पी दक्षिण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून हिराबाई पटेल मार्गावरील स्कायवॉक शेजारी असलेल्या जैन मंदिराच्या बाहेरील कबुतरांना सुरुच आहे.

याठिकाणी कबुतरांना दाणे देता यावेत यासाठी चोरीछुपे या दाण्यांची विक्री केली जात आहे. पिशव्यांमध्ये दाणे आणून याठिकाणी विकले जात आहे. विशेष म्हणजे याठिकाणी कबुतरांना दाणे टाकल्यानंतर दुपारी एक ते दीडच्या दरम्यान याची सफाई केली जाते. त्यामुळे सकाळच्या सत्रात याठिकाणी खुलेआम दाणे टाकले जात असल्याचे दिसून येत आहेत. याठिकाण खाद्य टाकले जात असल्याने सर्व कबुतरे ही स्कायवॉकच्या छतावर बसलेली आपल्याला पहायला मिळतात.

मुंबईत दादरसह सर्व महत्वाच्या ठिकाणची कबुतरखाने बंद करण्यात आले असून गोरेगाव पश्चिम येथील हिराबाई पटेल मार्गावरील कबुतरांना दाणे टाकणे आणि त्याची विक्री करणे असे प्रकार सुरू असतानाही याकडे महापालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष केले जाते. विशेष म्हणजे या कबुतरखान्यापासून हाकेच्या अंतरावरच महापालिकेचे पी दक्षिण विभाग कार्यालय आहे. त्यामुळे हाकेच्या अंतरावर महापालिकेचे कार्यालय असतानाही कबुतर खाना बंद केला जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Comments
Add Comment