Saturday, October 11, 2025

आपसात भांडू नका

आपसात भांडू नका

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर

मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. एकमेकांशी जुळवून राहणे, परस्परांना सहकार्य करणे हेच मानवी जीवनाचे सौंदर्य आहे. परंतु जेव्हा आपण आपापसांत भांडतो, तेव्हा त्या भांडणात केवळ शब्द नव्हे, तर नातेसंबंधही तुटतात.

श्रेष्ठी जे जे मेळविले। त्यासाठी भांडत बैसले। मग जाणावे फावले। गलिमासी॥ छत्रपती संभाजीस पत्र

आपल्याकडे पराक्रम, शिस्तबद्धता, युद्धसामुग्री , माणुसकी यांची कमतरता कधीच नव्हती. मग आपण लढाया का हरलो ? थोडा विचार केला तर असे ध्यानात येईल की निःसंशयपणे आपला घात आपणच केला. आपापसातील भांडणं आपल्या नाशास कारणीभूत ठरली.

औरंगजेब सात लाख फौज घेऊन जेव्हा शिवछत्रपतींचे स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी महाराष्ट्रात आला, त्यावेळी शिवाजी महाराजांच्या नंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण ? संभाजी की राजाराम ? यावरून वादंग चालला होता. हे दोन्ही गट आपापसात भांडत बसले होते. त्याचा लाभ औरंगजेबाला मिळाला. औरंगजेबाला फितूर झालेल्या माणसांनी संभाजी राजांना पकडून देण्यास मदत केली. म्हणून शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांना लिहिलेल्या पत्रात समर्थांनी वरील उपदेश त्यांना केला. आपण आपापसात कसे भांडतो व आपण आपसातच भांडलो तर शत्रू युद्ध न करता विजय मिळवेल हे सत्य त्यांनी स्पष्ट केले. शत्रू त्याचा कसा फायदा करून घेतो हे सांगणारी ही घटना पाहा

१६२४ साली अहमदनगर येथे निजामाचा दरबार भरला होता. दरबारात अनेक सरदार जमले होते. दरबार संपला. सारे जण आपआपल्या घरी निघाले. वाटेत खंडागळे नामक सरदाराचा हत्ती उधळला. तो सैरावैरा धावू लागला. माणसे हत्तीच्या पायाखाली चिरडली जाऊ लागली. सर्वत्र एकच हलकल्लोळ! आरडाओरडा सुरू झाला. एव्हढ्यात संभाजी राजे भोसले व शहाजी राजे भोसले हे दोघे बंधू म्हणजे जिजाबाईचा दीर आणि पती त्या हत्तीला अडवण्यासाठी पुढे सरसावले. पण जिजाबाईचा भाऊ दत्ताजी जाधव त्यांना म्हणाला “तुम्ही हत्तीला मारू नका. आम्ही हत्तीला शांत करतो.” हत्ती कुणालाच आवरेना. अखेर संभाजीने हत्तीला ठार केले.त्यावरून भोसले व जाधव यांचे भांडण जुंपले. त्याचे लढाईत रुपांतर झाले. संभाजीने दत्ताजीस ठार केले. आपले सुपुत्र मारले गेल्याचे कळताच दत्ताजीचे वडील लखुजी जाधव खुद्द आपल्या जावयावर तुटून पडले. सहजी राजे जखमी झाले. संभाजी भोसले मारले गेले. जिजाबाईचा दीरही मरण पावला.जिजाबाईनी दिरासाठी लढावे की भावासाठी? पण आपापसातील भांडणाने त्या स्वराज्याचे नुकसान झाले. जिजाबाईंसारखी दृढता ठेवली पाहिजे.

भांडणामुळे मनात कटुता निर्माण होते, राग वाढतो, आणि शांतता नष्ट होते. शाळेत मुलं जर एकमेकांशी भांडली, तर त्यांचा अभ्यास बिघडतो, मैत्री कमी होते. घरात भांडण झालं, तर कुटुंबातील प्रेम हरवतं. समाजात भांडण झालं, तर विकास थांबतो. भांडणाऐवजी संवाद साधा, एकमेकांचे विचार ऐका. “क्षमाशीलतेतच मोठेपण असते” हे लक्षात ठेवा. जिथे प्रेम, सहकार्य आणि समजूतदारपणा आहे, तिथे भांडणाला स्थान नसते. म्हणूनच “आपसात भांडू नका, मनापासून जुळा, सहकार्य करा आणि एकत्र चला.” एकतेत शक्ती आहे हे आपल्याला इतिहासातूनही शिकायला मिळते. जेव्हा लोक एकत्र येतात, तेव्हा कितीही मोठं काम सहज पार पाडता येतं. पण जेव्हा प्रत्येकजण वेगळं वागतो, तेव्हा शक्ती कमी होते.

मुंग्या बघा एकटी मुंगी काही करू शकत नाही, पण सगळ्या मुंग्या मिळून डोंगराएवढा अन्नसाठा तयार करतात. पक्षी मिळून घरटे बांधतात, सैनिक मिळून देशाचं रक्षण करतात, शिक्षक आणि विद्यार्थी मिळून शाळेचं नाव उज्वल करतात. संघटन म्हणजे फक्त लोक एकत्र येणे नव्हे; तर समान हेतू, सामायिक प्रयत्न आणि परस्पर विश्वास. जिथे संघटन असते, तिथे प्रगती निश्चित असते. “एकतेने चाललो तर यश आपले, फुटलो तर सगळं हरवेल.”

Comments
Add Comment